राज्य बँकेने बदलला कर्ज वितरणाचा ‘गिअर’

इथेनॉल प्रकल्पांनाही देणार ९५ टक्के कर्ज
Ethanol
EthanolAgrowon

कोल्हापूर : साखर कारखान्यांना कर्ज (Sugar Mill Loan) देण्यात अग्रेसर असणाऱ्या राज्य सहकारी बँकेने यंदापासून कर्ज वाटपाचा ‘गिअर’ बदलला आहे. साखर कारखान्यांना इथेनॉलच्या (Ethanol) विक्रीमुळे तातडीने रक्कम मिळत आहे. त्यामुळे कारखान्यांनी बँकेकडून साखर तारण कर्ज (Sugar Mortgage Loan) घेण्यास काहीसे दुर्लक्ष केले आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य बँक आता इथेनॉल प्रकल्पांना (Ethanol Project) प्रकल्प उभारणीच्या ९५ टक्के कर्ज देणार आहे.

याच बरोबर अन्य उद्योगधंदे, अन्न महामंडळ, महावितरण यांनाही जास्तीत जास्त कर्जपुरवठा करण्यासाठी बँक प्रयत्नशील राहणार आहे. साखर कारखान्यांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाल्याने व्याजातून मिळणारा नफा कमी झाला आहे. तरीही कर्ज देण्याचे घटक वाढविल्याने हा तोटा भरून निघू शकतो, असा आशावाद बँक व्यवस्थापनाला आहे.

राज्य बॅंकेकडे ३१ मार्चअखेर कर्ज मागणीत सुमारे १६०० कोटी रुपये इतकी घट आली. येणाऱ्या हंगामात ही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य बँकेने कर्ज वितरणातील तुटीची रक्कम अन्य घटकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. तसेच इथेनॉल प्रकल्पांनाही त्यांच्या विविध बाबींवर कर्ज देण्यासाठी बँकेने नियोजन केले. कारखान्यांना साखरेवर कर्ज दिल्यानंतर जोपर्यंत साखर विक्री होत नाही, तोपर्यंत त्याचे व्याज बँकेला मिळत असते. यामुळे बँकेला मुदलाबरोबरच व्याजाचा ही फटका बसणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी बँकेने कंबर कसली आहे. विविध घटकांना कर्ज देण्याचा सपाटा लावला आहे.

आतापर्यंत अन्न महामंडळाला ५०० कोटी ‘महावितरण’ला १९६७ कोटी रुपयांचे कर्जवितरण केले आहे. साखर कारखान्यांकडून मागणी कमी आली असली तरी तितकीच कर्जाची शिल्लक रक्कम या उद्योगधंद्यांना देऊन बँकेने कर्जवितरणाचे सूत्र कायम राखले आहे.

राज्य बँकेकडे कर्जाची मागणी थंडावली

राज्य सहकारी बँकेकडून अनेक साखर कारखाने उत्पादन होणाऱ्या साखरेवर पूर्वहंगामी कर्ज घेतात. ही रक्कम घेऊन शेतकऱ्यांची ऊस बिले भागविली जातात. त्यानंतर उत्पादित होणारी साखर विक्री करून बँकेचे हप्ते फेडले जातात. सुमारे ६ हजार कोटी रुपयांची कर्जे राज्यभरातील विविध कारखाने राज्य बँकेकडून साखरेच्या तारणावर घेत असतात. गेल्या दोन वर्षांमध्ये इथेनॉल निर्मिती व विक्री वाढल्याने अनेक कारखान्यांनी यातून येणाऱ्या रकमेवरच ऊस उत्पादकांना पैसे देण्याची तजवीज केली. परिणामी, राज्य बँकेकडे कर्जाची मागणी थंडावली.

गृह कर्ज वितरणातूनही होणार नफा

कर्ज वितरणासाठी वेगवेगळे घटक शोधत असताना रिझर्व्ह बँकेने राज्य बँकेला दोन दिवसांपूर्वीच २००० कोटी रुपयांचे गृह कर्ज वितरण करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. हाउसिंग सोसायट्या पुनर्निर्माण कामासाठी या कर्जाचा लाभ घेऊ शकणार आहेत. कारखान्यांनी जरी कर्ज घेण्याचे प्रमाण कमी केले असले, तरी अशा विविध बाबीतून अपेक्षेपेक्षा जास्त कर्जवाटप होईल, असा आम्हाला विश्‍वास असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com