कृषी बाजारात जोरदार उलथापालथ

अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक शहाणपणा असे सांगतो, की महिन्याभरापूर्वीच्या किमतींकडे न पाहता महिन्याभराने काय होऊ शकेल आणि ते आपल्याला पचेल का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आणि त्या आधारावरच आपण आपल्याकडील मालाबाबत निर्णय घ्यावा.
Commodities
CommoditiesAgrowon

श्रीकांत कुवळेकर

बाजाराच्या भाषेत बोलायचे तर वर्षभराहून अधिक चाललेल्या तेजीच्या वारूला ब्रेक लागण्यासाठी ‘ट्रिगर’ म्हणजे एक निमित्त हवे होते. ते व्याजदरवाढीने दिले इतकेच. मागील लेखामध्ये आपण मंदीच्या चाहुलीची शंका व्यक्त करताना जागतिक बाजारातील हेज फंडांच्या हालचालींकडे बारीक लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे, असे सुचवले होते. याबाबतची माहिती (डेटा) येण्यास अजून थोडा वेळ लागेल. परंतु हेज फंड विक्रीचा सपाटा लावतात, तेव्हा बाजारातील प्रत्यक्ष कमोडिटीच्या (Agricultural Commodities) मागणी- पुरवठा समीकरणाला फारसा अर्थ उरत नाही.

हे लक्षात येईपर्यंत बाजारात मंदी आलेली देखील असते. सध्या देखील तसेच झाले आहे, असे वरील आकडेवारी दर्शवते. अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक शहाणपणा असे सांगतो, की महिन्याभरापूर्वीच्या किमतींकडे न पाहता महिन्याभराने काय होऊ शकेल आणि ते आपल्याला पचेल का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आणि त्या आधारावरच आपण आपल्याकडील मालाबाबत निर्णय घ्यावा.

सुमारे एक-दीड वर्षे जागतिक कमोडिटी बाजारामध्ये, त्यातही मुख्यतः शेतीमाल बाजारपेठेमध्ये मोठ्या तेजीचे वातावरण होते. त्यामुळे व्यापारी जगतच नव्हे तर ग्राहक आणि सरकारेदेखील हवालदिल झाली होती. त्यातच ही महागाई नैसर्गिक तसेच बरेचदा कृत्रिम कारणांनी पुरवठ्यात घट आल्यामुळे झालेली आहे. त्यामुळे कच्च्या मालात देखील त्याच प्रमाणात महागाई होती. त्यामुळे उत्पादक वर्गालाही म्हणावा तसा फायदा झालेला नाही. भारतात देखील मूठभर शेतकऱ्यांना या महागाईचा लाभ मिळाला असावा.

तीस-चाळीस वर्षांतून एखादवेळेस येणारी अशा प्रकारची तेजी नक्की कुठपर्यंत चालणार याचा कुणालाच अंदाज येत नव्हता. सुरुवातीला कोरोना नंतर आंतरराष्ट्रीय वाहतुकीतील अडथळे, जोडीला विषम हवामान, परत कोरोनाचा उद्रेक अशा एक ना अनेक कारणांनी तेजी वाढतच गेली. तिने एवढे टोक गाठले की शेवटी विकसित देशांच्या मध्यवर्ती बँकांना वेगाने आणि मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करण्याची पाळी आली. मग एकामागोमाग व्याजदर वाढीचा सपाटा चालू झाला. नेतृत्व अर्थातच अमेरिकेच्या मध्यवर्ती बॅंकेकडे म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडे आहे.

भारतालाही शेवटी तोच कित्ता गिरवावा लागला. गेल्या चार-सहा आठवड्यांत दोनदा व्याजदर वाढ झाली आणि अजून दोन-तीन वेळा होईल, असे संकेत आहेत. याचा थोडा उशिरा का होईना परंतु व्हायचा तो परिणाम झालाच. आणि कमोडिटी बाजारात काय चाललंय याचा अंदाज येण्यापूर्वी मोठी घसरणदेखील झाली आहे. अर्थात, एक वर्षापूर्वीच्या भावपातळीशी तुलना करता अजूनही तेजी कायम आहे, असे वाटू शकते. परंतु मागील चार-सहा आठवड्यांमध्ये किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत.

खालील तक्त्यात सिबॉट या अमेरिकन कमोडिटी एक्स्चेंजवरील काही प्रमुख कमोडिटीजमधील घसरणीची आकडेवारी दिली आहे:

कमोडिटी घसरण (टक्क्यांमध्ये)

नैसर्गिक वायू ३०

कच्चे तेल ६

गहू ३०

सोयाबीन १०

सोयातेल १६

पाम तेल २६

कापूस २९

अर्थात, भारतात शेतीमालाच्या घाऊक किमती याच प्रमाणात बदललेल्या नाहीत, परंतु कल साधारणपणे असाच आहे. मॉन्सूनच्या प्रभावामुळे येथे देखील किमतींमध्ये थोडी नरमाई दिसून येत आहे.

याव्यतिरिक्त इतर शेतीमालदेखील बऱ्यापैकी स्वस्त झाला आहे. वरील आकडेवारी एकंदरीत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आश्‍वासक वाटत असली, तरी कच्चे तेल अजूनही मजबूत आहे. तर दुसऱ्या बाजूला रशिया-युक्रेन युद्धदेखील थांबण्याचे संकेत नाहीत. त्यामुळे अनिश्‍चितता अजूनही संपलेली नाही. तरीसुद्धा पुढील महिन्याभरामध्ये महागाई काबूत येण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

शिवाय व्याजदरवाढीची ही सुरुवात आहे. अजून दोन-तीन दरवाढी झाल्या तर काय होईल किंवा अचानक आलेली ही मंदी पुढील दरवाढ विचारात घेऊनच झाली का, हे काही काळात स्पष्ट होईलच. चीनमध्ये मात्र या उलट स्थिती असून, तिथे आर्थिक पॅकेजवर काम चालू आहे. परंतु चीन जागतिक कमोडिटी बाजारामध्ये खरेदीच्या बाबतीत तटस्थ राहून, तर कधी सोयाबीनची राष्ट्रीय साठ्यातून विक्री करून बाजारातील मंदीला हातभारच लावतोय.

व्याजदरवाढीचा ट्रिगर

बाजाराच्या भाषेत बोलायचे तर वर्षभराहून अधिक चाललेल्या तेजीच्या वारूला ब्रेक लागण्यासाठी ‘ट्रिगर’ म्हणजे एक निमित्त हवे होते. ते व्याजदरवाढीने दिले इतकेच. मागील लेखामध्ये आपण मंदीच्या चाहुलीची शंका व्यक्त करताना जागतिक बाजारातील हेज फंडांच्या हालचालींकडे बारीक लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे, असे सुचवले होते. याबाबतची माहिती (डेटा) येण्यास अजून थोडा वेळ लागेल. परंतु हेज फंड विक्रीचा सपाटा लावतात तेव्हा बाजारातील प्रत्यक्ष कमोडिटीच्या मागणी- पुरवठा समीकरणाला फारसा अर्थ उरत नाही. हे लक्षात येईपर्यंत बाजारात मंदी आलेलीदेखील असते. सध्या देखील तसेच झाले आहे, असे वरील आकडेवारी दर्शवते.

पारंपरिक शहाणपण

अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक शहाणपणा असे सांगतो, की महिन्याभरापूर्वीच्या किमतींकडे न पाहता महिन्याभराने काय होऊ शकेल आणि ते आपल्याला पचेल का हा प्रश्‍न स्वतःला विचारला पाहिजे. आणि त्या आधारावरच आपण आपल्याकडील मालाबाबत निर्णय घ्यावा. कारण हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात काही दिवसांपूर्वी १३,००० रुपयाला, म्हणजे हमीभावाच्या जवळ-जवळ दुप्पट किमतीला आपला कापूस न विकणाऱ्यांना आता ११,००० रुपयांना कापूस विकणे जीवावर येणे साहजिकच आहे.

परंतु पुढील दोन महिन्यांत हाच भाव १२,००० रुपये होण्याच्या शक्यतेपेक्षा ८,०००- ९,००० रुपयांना येण्याची शक्यता जास्त आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. अर्थात, तेजी-मंदीचे टायमिंग साधण्याची अयशस्वी कसरत करण्यापेक्षा पारंपरिक शहाणपणा कसा वापरावा याचे हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे. बाकी कमोडिटी बाजारातील अनिश्‍चितता म्हणजे नक्की काय असते हे आपण नेहमीच पाहत असतो. वरील माहिती एका विशिष्ट कमोडिटीला डोळ्यासमोर ठेवून दिली नसून, बाजारातील एकंदरीत कल स्पष्ट होण्यासाठी दिली आहे.

शेतकऱ्यांची कडधान्यांकडे पाठ

देशातील खरीप पेरण्यांचा कल पाहता शेतकरी कडधान्यांकडे पाठ फिरवताना दिसत आहे. सरकारच्या धोरणांमुळे कडधान्य पिकांचे दबावाखाली राहिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी इतर पिकांना पसंती देत आहेत. अर्थात, हवा तसा पाऊस झाला नसल्यामुळेही कडधान्यांचा पेरा घटला आहे. परंतु सरकारी मानसिकता आणि सततची मंदी याचा मोठा परिणाम दिसतो आहे. त्यामुळे यंदा कडधान्यांची आतापर्यंतची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ टक्के कमी झाल्याची सरकारची आकडेवारी आहे. तूर आणि उडदाचे क्षेत्र अनुक्रमे ५४ टक्के आणि ५२ टक्के कमी आहे. याची कारणेदेखील आपण मागील लेखात दिलीच आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर २०२३ हे वर्ष कडधान्यांसाठी चांगले राहील, हे नक्की.

(लेखक कृषी व्यापार आणि कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com