यंदाच्या शिल्लक उसाला अनुदान देणार ः पवार

शेतकरी आंदोलनांतील दाखल गुन्हे मागे घेण्याचीही ग्वाही
यंदाच्या शिल्लक उसाला अनुदान देणार ः पवार
SugarcaneAgrowon

मुंबई : ‘‘शेतकरी आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Aijt Pawar) यांनी बुधवारी (ता. ८) दिली. तसेच ‘‘यंदाच्या हंगामातील ऊस शिल्लक राहिला तर त्यास अनुदान (Sugarcane Subsidy) देण्यात येईल,’’ असेही पवार म्हणाले.

पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. खासदार सदाशिवराव लोखंडे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेण्यात आला. शेतकरी समाधानी होण्यासाठी, शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यंदाच्या गळीत हंगामातील अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी वाहतूक अनुदान व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यंदा राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन व गाळप झाले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये, यासाठी शासनाने सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. यंदाच्या गाळप हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही. या उपरही ऊस शिल्लक राहिला, तर शिल्लक उसाला भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.’’

‘‘दुग्धविकास विभागामार्फत दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना संकटाच्या काळातही दूध व्यवसायाला मदत करण्यात आली. दूध उत्पादन वाढीसाठी देशी गाईंच्या जातींवर विशेषत्वाने लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. दुधाला एफआरपी देण्यासंदर्भातील प्रस्ताव संबंधित समितीसमोर ठेवून अभ्यासा अंती त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. कांदाचाळी आणि शीतगृहांद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा देण्यात येत आहेत. कांदा निर्यातीवरील बंदीसंदर्भात ठराव करून तो केंद्र सरकारकडे सादर करण्यात येईल,’’ असेही त्यांनी सांगितले. मंत्री थोरात, भुसे, केदार, पाटील यांनीही संबंधित विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. या वेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com