उसाच्या एफआरपीत प्रतिटन १५० रुपये वाढ करावी

कृषिमूल्य आयोगाची केंद्र शासनाकडे शिफारस
उसाच्या एफआरपीत प्रतिटन १५० रुपये वाढ करावी
SugarcaneAgrowon

कोल्हापूर : येणाऱ्या साखर हंगामात (Sugar Season) तुटणाऱ्या उसाच्या एफआरपीत (Sugarcane FRP) प्रतिटन १५० रुपये वाढ करण्याची शिफारस कृषिमूल्य आयोगाने केंद्राकडे केली आहे. या शिफारशीचा प्रस्ताव कृषी मंत्रालयाने (Agriculture Department) केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवला आहे. मात्र, एफआरपी ठरवताना साखर उताऱ्याचा (Sugar Recovery) बेस रेट १० ऐवजी १०:२५ टक्के केल्याने शेतकरी संघटनांनी मात्र कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीवर टीकेची झोड उठवली आहे.

केंद्राने गेल्यावर्षी एफआरपीची रक्कम १० उताऱ्याला २८५० वरून २९०० रुपये केली होती. यंदा १५० रुपये वाढ करीत ३०५० रुपये केली आहे. यंदा एफआरपीचा दर ठरवण्यासाठी उताऱ्याचा बेस १० ऐवजी १०.२५ टक्के ठेवण्यात आला आहे. हे समीकरण गृहीत धरले तर वाढ १५० ऐवजी फक्त ७५ रुपयांची मिळते ही सरळ सरळ फसवणूक असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

गेल्यावर्षीच्या हंगामात हा बेस १० टक्के धरण्यात आला होता. यावर्षीच्या तोडणी-ओढणी खर्चातही वाढ करून तो प्रतिटन ७२५ रुपये करण्यात आला आहे. एकूण एफआरपीतून तोडणी-ओढणीचा खर्च वजा होऊन १०.२५ साखर उतारा असेल तर ३०५० रुपये एफआरपी होईल. यातून तोडणी खर्च वजा झाल्यास २३२५ रुपये उत्पादकांना मिळणार आहेत. जसा साखर उतारा जास्त येईल तशी वाढीव रक्कम उत्पादकांना मिळेल.

...ही सरळ फसवणूकचसाखर उताऱ्याचा बेस वाढवून कृषिमूल्य आयोगाने शेतकऱ्यांची सरळसरळ फसवणूक केली आहे. कशी तरी आकडेमोड करायची ऊस उत्पादकांना दर वाढवून दिला असे सांगायचे ही केंद्राची भूमिका चुकीची आहे. उत्पादन खर्चाच्या बाबतीतच बोलायचे झाले तर गेल्या वर्षभरात त्यांना ला रासायनिक खताचा खर्च २१४ रुपयांनी वाढला. मशागत खर्च वगळता उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या तुलनेत वाढविलेली एफआरपी एकदम तोकडी आहे. ऊस उत्पादकावर हा सरळसरळ अन्याय आहे
राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना
मोदी सरकार आल्यापासून रिकव्हरीचा बेस रेट १:२५ टक्क्यांनी वाढवला आहे याचा अर्थ प्रतिटन ४२५ रुपयांनी उसाचा दर अप्रत्यक्षरीत्या कमी केला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करून सत्तेत आलेल्या या सरकारने उत्पादन खर्च दुप्पट होईल असे कृषी धोरण अवलंबले पण दर मात्र आहे तोच राहील याकडे लक्ष ठेवले. सरकारच्या या बोटचेप्या धोरणाचा परिणाम म्हणून शेती आणि शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होत आहे.
धनाजी चुडमुंगे, अध्यक्ष, आंदोलन अंकुश
एफआरपीत वाढ करताना त्या तुलनेत साखरेचा किमान विक्री दर व इथेनॉलचे दर ही वाढवणे क्रमप्राप्त आहे. तसे सुत्रच आहे. गेल्या दोन वर्षापासून एफआरपी वाढली पण किमान विक्री दर ३१०० रुपयेच राहिले. हे सूत्र बिघडल्याने कारखान्यांना वाढलेली एफआरपी देताना साखर कारखान्यांची दमछाक होणार आहे.
प्रकाश नाईकनवरे,व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ


अंमलबजावणी पुढील हंगामातील उताऱ्यावरच
पूर्वी गेल्यावर्षीच्या उताऱ्यावर पुढील वर्षीच्या हंगामाचा दर दिला जात होता. त्यात यावर्षीच्या हंगामापासून महाराष्ट्र शासनाने बदल करून ज्यावर्षीचा उतारा त्याचवर्षीची एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नव्या एफआरपी वाढीची अंमलबजावणी पुढील हंगामातील उताऱ्यावरच होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com