प्रेषित पैगंबर वादाचा आर्थिक, राजकीय परिणाम

भारत सरकारला देशाबाहेरील, बिगर हिंदूधर्मियांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजकीय/ आर्थिक शक्तींना काय रुचते, काय खटकते हे लक्षात घेऊनच देश चालवावा लागणार आहे; मग सत्तेत कट्टर हिंदुत्ववादी असले तरी. सगळे जग, परकीय आणि भारतीय कॉर्पोरेट्स भारतातील हिंदुत्ववादी प्रकल्पात काय काय राबवले जात आहे यावर लक्ष ठेवून आहे.
प्रेषित पैगंबर वादाचा आर्थिक, राजकीय परिणाम
Nupur Sharma & Naveen JindalAgrowon

संजीव चांदोरकर

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि भाजपचे बडतर्फ दिल्ली मिडिया प्रमुख नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे सध्या वातावरण तापले आहे. अरब राष्ट्रांसह अनेक देशांत त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली. या विषयाला राजकीय, आर्थिक आणि धार्मिक कंगोरे आहेत.

नव्वदीच्या सुरवातीला दोन मोठे ‘प्रकल्प' भारतात लॉन्च केले गेलेः १. बाबरी मस्जिद पाडून सुरू करण्यात आलेला हिंदुत्ववादी प्रकल्प आणि २. काँग्रेसी पंतप्रधान नरसिहराव आणि अर्थमंत्री डॉ मनमोहनसिंह यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला (Indian Economy) जागतिक अर्थव्यवस्थेत एकजीव करत नेण्याचा प्रकल्प. तुमची इच्छा असो वा नसो; जागतिकीकरणाने नाव घेण्याजोग्या- ज्यात भारत वरच्या क्रमांकावर आहे- देशांचे अर्थकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण, लष्करी संबंध, देशात येणाऱ्या व देशाबाहेर जाणाऱ्या स्थलांतरितांचे इश्यू यांना आंतरराष्ट्रीय परिमाण दिले. आणि ती प्रक्रिया अजून सुरूच आहे.

३० वर्षांपूर्वी देशातून जितका माल निर्यात व्हायचा, जितका आयात व्हायचा, जितके भांडवल देशात यायचे, जितके स्थलांतरित देशाबाहेर जायचे, त्या सर्व आकड्यांत अक्षरशः काही पटींनी वाढ झाली आहे. हे प्रत्येक क्षेत्र न ओळखता येण्याएवढे बदलले आहे. लक्षात घ्या वरील सर्व व्यवहार हे ‘क्रॉस बॉर्डर' व्यवहार आहेत आणि ते सर्व बिगरहिंदु बहुसंख्याक असणाऱ्या (मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध इत्यादी) देशांशी होत आहेत. तुम्ही म्हणाल आमचा माल घ्या, आम्ही पैसे घेतो; आम्हाला माल द्या, आम्ही पैसे देतो मामला खतम. कोण हिंदू, कोण बिगर हिंदू याचा आर्थिक व्यवहारांशी काय संबंध?

‘आर्थिक व्यवहार' शुद्ध असतात, असले पाहिजेत हा नवउदारतावादाने केलेला ब्रेनवॉश आहे. अगदी अमेरिका आपल्या आर्थिक व्यवहारांना राजनैतिक, लष्करी निकष लावत आली आहे. कोणतेच आर्थिक व्यवहार कधीच शुद्ध आर्थिक व्यवहार नव्हते, भविष्यात देखील नसणार आहेत.

आधीच थिजलेली जागतिक अर्थव्यवस्था अजून मंदावणार आहे. चीनची अर्थव्यवस्था थकली आहे. अशा पार्शवभूमीवर जागतिक कॉर्पोरेट भांडवल भारतीय अर्थव्यवस्थेकडे एक उमेदवार म्हणून बघत आहे. भारतातदेखील पुढच्या १० वर्षांत जीडीपी काही पटींनी वाढवण्याच्या घोषणा होत असतात. भारत म्हणजे काही व्यायामशाळेत जाऊन स्नायू कमावू शकेल अशी व्यक्ती नाहीये.

जागतिक कॉर्पोरेट भांडवलाच्या सक्रिय सहकार्याशिवाय, आयात-निर्यातीशिवाय हे शक्य नाही. मोठ्या कॉर्पोरेट्स, बड्या कंपन्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय हे शक्य नाहीये. २०२२ मध्ये भारताबाहेरच्या आर्थिक , राजकीय शक्तींचा जेवढा प्रभाव भारताच्या आर्थिक, राजकीय धोरणांवर पडत आहे; तो भविष्यात आणखी वाढेल. इथे ३० वर्षांपूर्वी सुरु केलेला हिंदुत्ववादी प्रकल्प आणि ३० वर्षानंतर भारताच्या संदर्भात बदललेली/ अजून बदलणारी ‘ग्राउंड रियालिटी' यात रक्तरंजित तणाव येणे अपरिहार्य आहे.

भारत सरकारला देशाबाहेरील, बिगर हिंदूधर्मियांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजकीय/ आर्थिक शक्तींना काय रुचते, काय खटकते हे लक्षात घेऊनच देश चालवावा लागणार आहे; मग सत्तेत कट्टर हिंदुत्ववादी असले तरी. सगळे जग, परकीय आणि भारतीय कॉर्पोरेट्स भारतातील हिंदुत्ववादी प्रकल्पात काय काय राबवले जात आहे यावर लक्ष ठेवून आहे. आणि भारतात जे काही घडेल त्याच्या प्रतिक्रिया येतच राहणार आहेत. त्यांना भाव द्यायचा की नाही, हा ऑप्शनल प्रश्न नाहीये नक्कीच. आंतराराष्ट्रीय राजनीतीचे हे वैशिष्ट्य आहे की, कोणीच कधीच लगेच प्रतिक्रिया देत नाहीत; वेळ येण्याची वाट बघितली जाते.

देशाची शोकांतिका

हिंदुत्ववादी शक्तींनी माहौल असा बनवला आहे की त्यांच्या आपसामध्ये कोण अधिक हिंदुत्ववादी किंवा कोण अधिक इस्लाम विरोधी हे सिद्ध करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यात आपल्या पक्ष, संघटनांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून वरची पदे मिळवयाची लालसाही असते. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. परंतु देशाची आयात, निर्यात, विदेशी गुंतवणूक अशा सर्व गोष्टींत ज्यांचे लाखो कोटी रुपयांचे स्टेक्स आहेत, ज्यांना आंतराराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे माहित आहे ते लोक, त्यांच्या कंपन्या, त्यांचे प्रवक्ते, मुख्य प्रवाहातील ओपिनियन मेकर्स ही मंडळी जे काही सुरु आहे त्याबद्दल एक अक्षर बोलत नाहीत, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com