
१) सोयाबीनची दरपातळी स्थिर (Soybean Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु आहेत. अर्जेंटीनात यंदा सोयाबीन उत्पादन घटणार आहे. मात्र ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या दोन देशांतील उत्पादन अंदाजानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सध्या दरात चढ उतार होत आहेत.
आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे (Soya Meal) वायदे ४९४ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील सोयाबीनची दरपातळी आजही ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान काय होती.
देशातून सोयापेंड निर्यात वाढली. त्यामुळं सोयाबीन दरातही सुधारणा होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
२) कापूस दरात चढ उतार सुरुच (Cotton Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे आज नरमले होते. आयसीईवरील वायदे आज दुपारपर्यंत ८१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील दरपातळी आजही ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. तर वायद्यांमध्येही आज नरमाई पाहायला मिळाली.
आज एप्रिलचे वायदे ६३ हजार ७६० रुपये प्रतिखंडीवर होते. सध्या बाजारातील कापूस आवक वाढली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळं कापूस दरातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) काकडीला उठाव वाढला
राज्यात दुपारी उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला मागणी येत आहे. मात्र सध्या बाजारातील काकडीची आवक कमी आहे. त्यामुळे काकडीच्या दरात वाढ झाली. मोठ्या बाजार समित्या वगळता सध्या काकडीची बाजारातील आवक सरासरी २० क्विंटलपेक्षाही कमी आहेत.
त्यामुळे काकडीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपयांचा दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) कांद्याचे दर दबावातच
राज्यातील बाजारांमधील कांद्याची आवक सध्या वाढली आहे. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवकेचा दबाव वाढला. त्यामुळं काद्यांचे भावही दबावात आले. कांद्याला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते ९०० रुपये दर मिळतोय.
काही बाजारांमधील दर १०० रुपयांपासून सुरु झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्याच्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कांदा आवकेचा दबाव पुढील काही दिवस राहण्याचा अंदाज आहे.
त्यामुळं सध्याची दरपातळी आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
५) सध्या नव्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय?
देशात यंदा हरभरा लागवड जवळपास अडीच टक्क्यांनी कमी राहिली. हरभऱ्याने यंदा ११२ लाख हेक्टरवर क्षेत्र व्यापलं. रब्बीतील हरभरा पेरा फेब्रुवारीच्या सुरुवातीला संपला. तर देशातील विविध भागांमध्ये हंगामाच्या सुरुवातीला पेरा झालेला हरभरा आता बाजारात येत आहे.
केंद्र सरकारने यंदा दुसऱ्या सुधारित अंदाजात देशातील हरभरा उत्पादन १३६ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज जाहीर केला. केंद्राचा पहिला अंदाज १३७ लाख टनांचा होता. सरकारने हरभरा उत्पादनाच्या अंदजात जास्त कपात केली नाही.
तर हरभरा पिकाची स्थिती चांगली असल्याचे केंद्रीय अन्न सचिवांनी सांगितले. देशातील बाजारांमध्ये आता नवा हरभरा दाखल होत आहे. पण या हरभऱ्याला नाफेडच्या विक्रीमुळे हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय.
केंद्राने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या नव्या हरभऱ्याचे दर ५ हजारांचाही टप्पा गाठताना दिसत नाहीत. हरभऱ्याला सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ९५० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. यंदा नाफेडकडे हरभऱ्याचा स्टाॅक आहे.
त्याचीही विक्री सुरु आहे. त्यामुळं बाजारातील आवक नगण्य असूनही हरभरा दर दबावात आहेत. नाफेडची हरभरा खरेदी सुरु झाल्यास आवकेचा दबाव वाढल्यानंतर दर हमीभावाच्या दरम्यान टिकतील.
पण नाफेड खरेदीचे किती उद्दीष्ट ठेवते? यावर शेतकऱ्यांना मिळणारा भाव बऱ्यापैकी अवलंबून आहे, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.