यंदाच्या उन्हाळ्यात लिंबाने खाल्ला भाव

पुणे -गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये उन्हाळ्यात पुण्यासह शेजारील जिल्ह्यांमधून लिंबाची आवक कमी झाली. परिणामी, दरांत मोठी वाढ झाली. गेल्या एप्रिल महिन्यात किलोला २०० रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. गेल्या ४० ते ५० वर्षांतील हे उच्चांकी दर असावेत. काकडीचीही आवक सध्या जोमात असून, मागील दोन वर्षे कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दोन्ही शेतमालांमधून चांगला आर्थिक आधार मिळत आहे.
Lemon Market
Lemon MarketAgrowon

बाजारात वर्षभर उपलब्ध होणाऱ्या फळपिकांमध्ये लिंबाचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. अलीकडील काळात तर क जीवनसत्त्वामुळे लिंबूवर्गीय फळांना मागणी वाढली आहे. पावसाळ्यात पोषक वातावरण झाल्यानंतर लिंबाचे उत्पादन अधिक होत असल्यामुळे बाजारात त्याची आवक जास्त असते. शहरासह, ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडे बाजारांत किंवा भाजी मंडईत लिंबाच्या दरात चांगलीच घट होते. पुण्याच्या मार्केटमध्ये या काळात दररोज पाच ते सहा हजार गोण्यांची (प्रति १५ ते २० किलोची) आवक होते. त्यामुळे दरांमध्ये चांगलीच घसरण होऊन दर प्रति किलो ८ ते १५ रुपयांपर्यंत खाली येतात. त्या वेळी पुण्यातील व्यापारी सुरत, बडोदा, अहमदाबाद, दिल्ली, जयपूर या भागांत लिंबू पाठवितात. यंदा फेब्रुवारीपासून काहीशी पाणीटंचाई सुरू झाली. त्यामुळे आवक कमी होऊ लागल्याने दरांत वाढ होऊ लागली आहे.

यंदा उच्चांकी दर

उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेचा फटका लिंबाच्या बागेला बसून उत्पादनात घट झाल्याचे दिसून येते. हैदराबाद, चेन्नई, विजापूर या भागातील आवकही कमी झाली. त्यामुळेच यंदा उन्हाळ्यात दर गगनाला भिडल्याचे दिसून आले. एप्रिलमध्ये पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये दररोज ८०० ते १००० हजार गोण्यांची आवक झाल्याने दरांत मोठी वाढ झाली. तीन- चार दिवसांपूर्वी १५०० ते १८०० गोण्यांची आवक झाली. गेल्या एप्रिलमध्ये किलोला २०० रुपयांपर्यंत उच्चांकी दर पोचले होते. सध्या दर प्रति किलो ८० ते १०० रुपयांपर्यंत तर सरासरी दर ८५ रुपये आहे. मागील अनेक वर्षांचा हा उच्चांक असल्याचे व्यापारी सांगतात. किरकोळ विक्रेते व्यापाऱ्यांकडून खरेदी करून ग्राहकांना प्रति किलो १०० रुपयांहून अधिक दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे थोड्याफार पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना अजून एक महिना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवण्याची संधी आहे.

लिंबू मार्केट (दृष्टिक्षेपात)

- वर्षभर चांगले उत्पन्न मिळवून देणारे किफायतशीर पीक.

- कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे पीक.

- पुणे बाजार समितीत नगर, पुणे, सोलापूर या भागांतून कागदी, सीडलेस लिंबाचा पुरवठा

- आंध्र प्रदेशातून बालाजी जातीच्या लिंबांचीही आवक काही प्रमाणात.

- लिंबाला उन्हाळ्यात सरबत, रसवंती, गुऱ्हाळ, हॉटेलचालक आदी व्यावसायिकांकडून चांगली मागणी. दर कमी झाल्यानंतर लोणचे प्रक्रियादारांकडून मागणी.

लिंबाचे अर्थशास्त्र

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एक एकर लागवडीसाठी वेगवेगळ्या अंतरानुसार सुमारे ११० ते ३०० झाडे बसतात. लागवडीनंतर तीन ते चार वर्षांपासून उत्पादन सुरू होते. एकरी दरवर्षी (सुमारे पाच वर्षांनंतर) प्रति झाड २५ ते ५० किलो तर दहा वर्षांनंतर प्रति झाड ५० ते १०० किलोपर्यंत उत्पादन मिळते. उन्हाळी बहराचे योग्य नियोजन केल्यास उत्पादनात वाढ होऊन दरही चांगले दर मिळतात. बाजारात सरासरी २५ ते ३० रुपये प्रति किलो दर मिळाल्यास वर्षाला दीड- दोन लाख वा त्याहून अधिक उत्पन्न मिळू शकते.

बाजारात गावरान लिंबाची आवक जास्त असते. माझ्याकडे सध्या दररोज ७०० ते ८०० गोण्यांची आवक होत आहे. पुणे शहरात पिंपरी- चिंचवड मार्केट, हडपसर येथे व आवक जास्त असल्यास परराज्यात विक्री करतो.
रोहन विलास जाधव, व्यापारी, ९८५०३५९०९९

काकडीलाही चांगली मागणी

उन्हाळ्यात काकडीलाही मोठी मागणी असते. गुलटेकडी बाजार समितीत वर्षभर

विशेषतः मार्च ते जून काळात सर्वाधिक मागणी असते. शेतकरी त्यादृष्टीने लागवडीचे नियोजन करीत असतात. सध्या मार्केटमध्ये काकडीची दररोज सुमारे ७ ते ८ टेम्पो आवक होत असून, प्रति किलो १५ ते २० रुपये दर मिळत आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत चालू महिन्यात दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसाठी ती जमेची बाजू आहे. काकडी खाल्ल्याने शरीरात शीतलता व उत्साह निर्माण होतो. निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे घटक काकडीत आहेत. बहुतांश लोक सॅलड म्हणून याचा आहारात वापर करतात.

आवक दृष्टिक्षेपात

पुणे मार्केटमध्ये पुणे जिल्ह्यासह नाशिक, सोलापूर, सांगली, नगर आदी भागांतून काकडीची आवक होते. आवक बऱ्यापैकी असली तरी मागणी अधिक असल्याने दर देखील तेजीत आहेत असे अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. पाऊस जास्त असेल, तर बाजार समितीत काही प्रमाणात आवक कमी होते. त्या वेळी दर काही प्रमाणात कमी असतात. मात्र कमी पाऊसमान काळात आवक चांगली असते. त्यावेळी प्रति किलो ८ ते १२ रुपये दर असतात. उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात मागणी कमी होते. त्यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक तोटाही सहन करावा लागतो.

बाजार समितीतील उलाढाल

लिंबू ----दर रुपये---वर्ष -- आवक -- किमान कमाल सरासरी - उलाढाल, (कोटी)

२०२०-२१ -- ७६४२४ --- १००० --- २५०० -- १७८५ -- १३.६४

२०१९-२० -- १५७७४९ --- ४०० -- ४००० -- २२०० -- ३४.७०

२०१८-१९ -- ९५७१४ -- ५०० -- ४००० -- ३१७५ -- ३०.३८

काकडीची उलाढाल

दर---वर्ष --- आवक किमान कमाल सरासरी उलाढाल (कोटी)

२०२०-२१ -- १०८६६६ --- ८०० --- २००० -- १८०० -- १९.५५

२०१९-२० -- २१८९८० --- ७०० -- १४०० -- ९०० -- १९.७०

२०१८-१९ -- १९०३६६ -- ५०० -- २००० -- १३०० -- २४.७४

-आवक क्विंटलमध्ये. (स्रोत - गुलटेकडी मार्केट समिती, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com