महागाईविरोधी युध्दात शेतकऱ्यांचे नुकसान

दलवाई म्हणाले, की शेतीमालाला योग्य भाव मिळायचा असेल तर बाजारसमित्यांची मक्तेदारी मोडून पर्यायी बाजार व्यवस्था असायला हवी. त्यासाठी एक मजबूत, पारदर्शी आणि नियंत्रित कृषी वायदे बाजार असणे महत्त्वाचे आहे.
Inflation and farmer
Inflation and farmerAgrowon

श्रीकांत कुवळेकर

महागाईविरोधातील लढाईमध्ये शेवटी शेतकऱ्यांचेच सर्वांत जास्त नुकसान होणार आहे. सरकारच्या धडपडीतून अर्थशास्त्राच्या दृष्टीने काही निर्देशांक थोड्या प्रमाणात नियंत्रणात येतीलही आणि आंतरराष्ट्रीय पतबाजारातील मानांकनात देशाला काकणभर फायदादेखील होईल; परंतु ढोबळपणे पाहिल्यास गहू, साखर, लोखंड, पोलाद, पेट्रोल आणि डिझेल इत्यादींच्या बाबतीत केलेल्या धोरण बदलातून मूल्यसाखळीतील तळाचा घटक म्हणजे शेतकरी किंवा उत्पादकच कसा नागवला जातो हे स्पष्ट होईल.

Inflation and farmer
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा नवा पर्याय

मागील आठवड्यात शेतीमाल वायदे बाजारात एक महत्त्वाची घटना घडली. एनसीडीईएक्स या देशातील प्रथम क्रमांकाच्या कमोडिटी एक्स्चेंजने या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा ठेवला होता. त्यामध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या अशोक दलवाई यांनी व्यक्त केलेले मत महत्त्वाचे आहे. दलवाई म्हणाले, की शेतीमालाला योग्य भाव मिळायचा असेल तर बाजारसमित्यांची मक्तेदारी मोडून पर्यायी बाजार व्यवस्था असायला हवी. त्यासाठी एक मजबूत, पारदर्शी आणि नियंत्रित कृषी वायदे बाजार असणे महत्त्वाचे आहे. ते असेही म्हणाले, की मूल्यसाखळीतील सर्व घटकांना जोखीम व्यवस्थापनासाठी फ्यूचर्स आणि ऑप्शन्स या साधनांचा वापर महत्त्वाचा असला तरी खास करून शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळीच आपल्या शेतीमालाचे विक्रीमूल्य निश्चिती करणे शक्य असलेल्या ऑप्शन्स या अत्यंत कमी खर्चिक साधनाचा वापर करणे गरजेचे आहे. लक्षात घ्या दलवाई हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आणि कृषी धोरण निश्‍चितीच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.

एकीकडे ही घटना तर दुसरीकडे मागील दोनेक आठवड्यांपासून सरकारने महागाईविरोधात पुकारलेले युद्ध आणि त्यातून कृषी आणि बिगरकृषी कमोडिटी बाजारात वेगाने होत असलेले धोरण बदल आणि त्यामुळे निर्माण झालेली विचित्र परिस्थिती आहे. या दोन गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यात असलेल्या अनेक विसंगती लक्षात आल्या. तसेच या महागाईविरोधातील लढाईमध्ये शेवटी शेतकऱ्यांचेच सर्वांत जास्त नुकसान होणार असल्याचेही स्पष्ट झाले. या धडपडीतून अर्थशास्त्राच्या दृष्टीने काही निर्देशांक थोड्या प्रमाणात नियंत्रणात येतीलही आणि आंतरराष्ट्रीय पतबाजारातील मानांकनात देशाला काकणभर फायदादेखील होईल; परंतु ढोबळपणे पाहिल्यास गहू, साखर, लोखंड, पोलाद, पेट्रोल आणि डिझेल इत्यादींच्या बाबतीत केलेल्या धोरण बदलातून मूल्यसाखळीतील तळाचा घटक म्हणजे शेतकरी किंवा उत्पादकच कसा नागवला जातो हे स्पष्ट होईल.

Inflation and farmer
‘एनसीडीईएक्स’कडून ‘अॅग्रोवन’चा गौरव

गहू निर्यातबंदी

आपण पाहिले, की वाढत्या निर्यातीमुळे आणि सुरुवातीच्या सरकारी पाठबळामुळे गव्हाच्या किमती वाढल्या. एरवी कसाबसा १५-१६ रुपये प्रतिकिलो भाव मिळण्याची मारामार असताना गहू २२-२३ रुपये किलोने विकला जाऊ लागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रथमच हास्य दिसायला लागले होते. परंतु केंद्र सरकारने अचानक केलेल्या निर्यातबंदीमुळे १५-१६ लाख टन गहू बंदरांवर अडकला. देशातील तसेच बहुराष्ट्रीय निर्यातदार कंपन्यांनी हात वर केल्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. व्यापाऱ्यांनी बाजार समितीतील खरेदी त्वरित थांबवली. त्यामुळे शेवटी किमती कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नाही म्हणायला सरकारी हमीभाव खरेदी चालूच असल्यामुळे काही शेतकऱ्यांना तो भाव तरी मिळत आहे.

साखर निर्यातीवर मर्यादा

या मागोमाग साखरनिर्यातीवर १० दशलक्ष टनाची मर्यादा घातली गेली तर सूर्यफूल आणि सोयातेल यांच्या आयातीवरील शुल्क आणि अधिभार काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी जी.एम. सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यामुळे आधीच सोयाबीन आणि मोहरीच्या किमती दबावाखाली होत्या; त्यावरील शुल्क कपातीमुळे अधिकच नरम झाल्या. एकीकडे आयात शुल्क रद्द केल्यामुळे सरकारचे ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान तर दुसरीकडे किमती पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. फायदा कुणाचा तर परदेशी शेतकऱ्यांचा. महागाईविरोधातील सरकारी उपाययोजनांचा अप्रत्यक्ष तोटा मक्याला झाला आहे. विक्रमी २४ रुपये किलोपर्यंत पोहोचलेला मका आता निर्बंधाच्या केवळ भीतीपोटीच २०-२१ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

उत्पादकांची पिळवणूक

एकंदरीत पाहता मूल्यसाखळीतील बहुतेक घटक आपले नुकसान दुसऱ्यावर टाकत असला तरी उत्पादक हा शेवटचा घटक असल्यामुळे शेवटी त्यालाच सर्व नुकसान सहन करावे लागत आहे. हे केवळ शेतीमालातच नव्हे तर लोखंड, पोलाद, इतर धातू, रसायने आणि पेट्रोल-डिझेल या सर्वच गोष्टींच्या उत्पादकांबाबत असेच घडते. बरं एवढं करून किरकोळ ग्राहकांना त्याचा किती फायदा होतो याबद्दल न बोलणंच बरं. महागाईने भरडून निघालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महागाईविरुद्ध युद्ध पुकारणे योग्य असले तरी त्यामुळे उत्पादकांचे होणारे प्रचंड मोठे नुकसान टाळण्यासाठी काही उपाययोजनांची तजवीज करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. शेवटी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादक ते ग्राहकांपर्यंतच्या मूल्यसाखळीतील सर्वच घटक तेवढेच महत्त्वाचे आहेत. अचानक केलेल्या धोरण बदलांमुळे होणाऱ्या नफा-नुकसानीमध्ये सर्वांनाच सारख्या प्रमाणात सामावून घेतले जावे, ही माफक अपेक्षा. त्यासाठी एक सक्षम यंत्रणा असणे महत्त्वाचे आहे.

वायदे बाजाराची आवश्यकता

या संदर्भात अशोक दलवाई यांनी मांडलेल्या मताचे महत्त्व लक्षात येते. जर इतक्या वर्षात आपण सक्षम, मजबूत, पारदर्शी आणि नियंत्रित कमोडिटी वायदे बाजार पूर्ण क्षमतेने विकसित केला असता तर निर्यात निर्बंधामुळे लोखंड, पोलाद, रसायने, आणि आयात शुल्क कपातीमुळे पेट्रोरसायने, खाद्यतेले यासारख्या वस्तूंचे भाव कोलमडल्याने झालेले नुकसान भरून काढणे शक्य झाले असते. या उलट जेमतेम क्षमतेने चालणारा कृषी वायदे बाजारदेखील अलीकडेच नऊ कमोडिटी वायद्यांच्या व्यवहारांवर बंदी घालून पूर्णपणे लंगडा करून टाकल्याचे आपण पाहिले आहे. त्याचादेखील शेवटी शेतकऱ्यांनाच फटका बसला आहे. अन्न महागाईच्या काळात हरभरा हमीभावापेक्षा १५-२० टक्के खाली असून, अनेकांना उत्पादनखर्च मिळताना मारामार झाली आहे.

जागतिक बाजारात पाहिले तर अमेरिका आणि चीनसारख्या प्रथम आणि द्वितीय क्रमांच्या अर्थव्यवस्थांकडे स्वतःचे विकसित कमोडिटी वायदे बाजार असल्यामुळे तेथीलच नव्हे तर इतर देशांमधील उत्पादकदेखील त्यांच्या वायदे बाजाराच्या माध्यमातून आपले जोखीम व्यवस्थापन करीत आहेत. एकीकडे आपण या देशांशी आर्थिक स्पर्धा करण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे आपल्याकडे स्थानिक कमोडिटी बाजार विकास करणे तर सोडाच, परंतु परदेशी बाजारात जोखीम व्यवस्थापन करायला देखील मोजकेच अपवाद वगळता कायदेशीर बंदी आहे.शेवटी अशोक दलवाईंच्या भाषणातील मुद्दे आणि सरकारी कृती यांच्यातील विसंगती दूर करण्याची इच्छा सरकारला होवो आणि त्यामधून सक्षम कमोडिटी वायदे बाजार यंत्रणा निर्माण होवो, हीच अपेक्षा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com