देशात खाद्यतेलांचा औद्योगिक वापर रोखण्याची गरज

कृषी संशोधन परिषदेचे सहायक संचालक डॉ. संजीव गुप्ता यांचे मत
Edible Oil
Edible OilAgrowon

नागपूर ः देशातील पेंट उद्योगात (Paint Industry) २३ टक्‍के खाद्यतेलाचा उपयोग (Use Of Edible Oil) केला जातो. देशात सध्या ६० टक्‍के खाद्यतेलाची आयात (Edible Oil Import) होत असताना, ही बाब अनावश्‍यक ठरते त्यामुळे खाद्यतेलाचा औद्योगिक वापर थांबविण्याची गरज असल्याचे मत, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक संचालक (तेलवर्गीय पिके) डॉ. संजीव गुप्ता (Sanjiv Gupta) यांनी व्यक्‍त केले.

भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या ५२ व्या वार्षिक आढावा बैठकीला उपस्थित राहण्याकरिता आलेल्या डॉ. गुप्ता यांनी बुधवारी (ता. १८) अनौपचारिक चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला. डॉ. गुप्ता म्हणाले, तेलाच्या बाबतीत आपण आजही परावलंबी आहोत. केंद्र सरकार तेलाच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा या करिता विविधस्तरावर उपाययोजना करीत आहे. परंतु अद्याप त्यात अपेक्षित यश आले नाही. सध्या देशात एकूण गरजेच्या ६० टक्‍के खाद्यतेलाची आयात करावी लागते. त्यावर सुमारे १.१७ लाख कोटी रुपये खर्च होतो. आयात तेलापैकी सुमारे २३ टक्‍के खाद्य तेल पेंट, वार्निश आणि अन्य उत्पादन तयार करणाऱ्या उद्योगांकडून वापरले जाते. हे त्वरित थांबले पाहिजे, असे ते म्हणाले.

गुप्ता म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेलवर्गीय पिकांची लागवड विस्तार आणि आयात कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच प्रयत्नांतर्गत त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेला तेलवर्गीय क्षेत्र विस्तार, या पिकांची उत्पादकता वाढ या संबंधी आराखडा सादर करण्याची सूचना केली आहे. खाद्य तेलांच्या बाबतीत आपण परावलंबी असतानाच रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका खाद्यतेल आयातीला बसला. या देशातूनच सूर्यफुलाच्या ८५ टक्‍के तेलाची आयात होते. हाच भाग आता युद्धामुळे प्रभावित झाल्याने त्याचा तेल आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आयसीएआर सूर्यफुलाचे उत्पादन वाढविण्याच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या योजनेवर काम करण्यासाठी सरसावले आहे.

गुप्ता यांनी सांगितले, की इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर प्रतिबंध लावले. त्याचाही फटका खाद्यतेलाची स्थानिक गरज भागविण्याच्या प्रयत्नांना बसला. त्यामुळे देशांतर्गत ताड झाडांखालील सध्याचे चार लाख हेक्‍टर क्षेत्र वाढविण्याचे प्रस्तावित आहे. हे क्षेत्र ४० लाख हेक्‍टरपर्यंत नेण्याकरिता आराखडा तयार केला आहे. शास्त्रज्ञांनी कर्नाटक, पंजाब, हरियाना तसेच पूर्व क्षेत्रातील राज्यांकरिता वातावरणातील बदलानुसार कोणत्याही परिस्थितीत तग धरणाऱ्या सोयाबीन वाणांच्या संशोधनावर भर दिला पाहिजे. त्यातूनच देशात तेलवर्गीय पिकांखालील क्षेत्रांचा विकास शक्‍य होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com