
Food Price Pune News : किरकोळ महागाई अन्नधान्यामुळे वाढल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. किरकोळ महागाईचा संबंध शेती (Agricultural) आणि संलग्न क्षेत्र, बांधकाम, कापड, औषध निर्माण आदी क्षेत्रांशी असतो.
परंतु मागील तीन वर्षांमध्ये अन्नधान्यामुळे महागाई वाढल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. अन्नधान्याची महागाई कमी करण्यासाठी सरकारने जी धोरणं आखली त्याचा शेती आणि शेतकऱ्यांवर दूरगामी परिणाम करणारी ठरली. यामुळे शेतीमालाचे दर पडले.
अन्नधान्याच्या किमती २०२३ मध्ये ७ टक्क्यांपर्यंत वाढल्या. २०२२ च्या आर्थिक वर्षात अन्नधान्यातील महागाई ३.८ टक्के होती. अन्नधान्यामध्ये भाजीपाला, धान्य, दूध आणि मसाला पदार्थाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या.
त्यामुळे अन्नधान्य महागाई वाढल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेनेही पुढील काही काळ धान्य आणि मसाल्यांची टंचाई निर्माण होऊन वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच पशुखाद्याचे दर वाढल्याने दुधाचेही दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला.
उत्पादन खर्च वाढला
कोरोनामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. त्यामुळे सर्वच मालाचे दर वाढले होते. त्याचा सर्वात मोठा फटका शेतीक्षेत्राला बसला. खतांच्या टंचाईमुळे देशातील अनेक भागांमध्ये वेळेवर खते मिळाली नाहीत. सरकारने अनुदान देऊन खतांची दरवाढ कमी केली.
मात्र बियाणे, सिंचन सामग्री, किटकनाशके, अवजारे, यंत्रे, ट्रॅक्टर, इंधनाचे वाढते दर यामुळे उत्पादन खर्च वाढला. यंदा उत्पादनखर्चात जवळपास २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे शेतकरी सांगतात.
उत्पादन खर्च वाढला तरी शेतकऱ्यांना त्यातुलनेत दर मिळाला नाही, मात्र याचा सविस्तर उल्लेख अहवालात आढळला नाही.
सरकारची धोरणं
धान्याची महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने गहू आणि तांदूळ निर्यातीवर बंदी घातल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले. एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या काळात टोमॅटोच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.
या काळात कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम किमतींवर झाला. आयातीमुळे कडधान्याचे दर सरकारला नियंत्रणात ठेवता आले.
काही कडधान्य पिकाचे देशात विक्रमी उत्पादन झाले. तर सरकारने बफर स्टाॅक केला तसेच आयात शुल्कात कपात केली त्यामुळे कडधान्याचे दर नियंत्रणात ठेवता आले. सरकारने आयात करून महागाई नियंत्रणात ठेवल्याचे, अहवालात स्पष्ट करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.