
सिंधुदुर्गनगरी ः हापूस हंगाम (Hapus Season) अंतिम टप्प्यात असताना मॉन्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rain) जोरदार हजेरी लावल्यामुळे हतबल झालेल्या बागायतदारांनी शिल्लक आंबा कॅनिंगकडे (Mango Canning) वळविला आहे.या आंब्याला प्रतिकिलो २८ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे बागायतदारांचे काही अंशी नुकसान टळणार आहे.
हापूस हंगाम अंतिम टप्प्यात असताना पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह काही भागांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. धास्तावलेल्या आंबा बागायतदारांनी शिल्लक आंब्याची काढणी करून तो कॅनिंगकडे वळविण्यास सुरुवात केली आहे. दररोज ३० ते ४० ट्रक आंबा सध्या कॅनिंग व्यवसायाला जात आहे. या आंब्याला प्रतिकिलो २८ रुपये दर मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी प्रतिकिलो ३३ रुपये दर बागायतदारांना दिला जात होता. परंतु आता मोठ्या प्रमाणात आंबा कॅनिंगला जात असल्यामुळे दरात काहीशी घसरण झाली आहे.
दरम्यान, कॅनिंग व्यवसायामुळे आंबा बागायतदारांच्या नुकसानीचे प्रमाण कमी राहणार आहे. सलग दोन तीन दिवस परिपक्व आंब्यावर पाऊस पडल्यानंतर आंबा पिकताना तो खराब होण्याची अधिक शक्यता असते. त्याऐवजी कॅनिंगला कच्चा आंबा दिला तर त्यातून नुकसान होत नाही. त्यामुळे बहुतांशी आंबा बागायतदारांनी अंतिम टप्प्यातील आंबा कॅनिंगकडे वळविला आहे. अजूनही सात ते आठ दिवस आंबा कॅनिंगला येईल, अशी अपेक्षा कॅनिंग व्यावसायिकांना आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.