
पुणेः राज्यात येत्या ऊस गाळप हंगामासाठी (Sugarcane Season) उपलब्ध होणाऱ्या उसाचा पहिला अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केला आहे. यंदा साखर कारखान्यांना एकूण १३४३ लाख टन ऊस मिळण्याची शक्यता आहे.
साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अभ्यासातून उत्पादनाचे पहिले अंदाज हाती आलेले आहेत. कृषी विभाग व राज्यातील सर्व खासगी व सहकारी साखर कारखान्यांसोबत झालेल्या बैठका, राज्यातील खोडव्याची उपलब्धता व नवी लागवड तसेच मॉन्सूनची वाटचाल या सर्व मुद्द्यांचा आढावा घेतल्यानंतर अंदाज काढण्यात आलेला आहे.
२०२१-२२ मध्ये राज्यात विक्रमी १४,८७,८३६ हेक्टरवर ऊस लागवड (Sugarcane Cultivation) झाली होती. यंदा २०२२-२३ लागवडीत किंचित वाढ झाली असून, एकूण १४,८८,७७० हेक्टरवर ऊस उपलब्ध असेल, असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे.
यंदा उसाची उपलब्धता सरासरी हेक्टरी ९५ टनांपर्यंत असेल. त्यातून १४१३ लाख टन ऊस तयार होईल, असे अंदाज अहवालातून स्पष्ट होते आहे. लागवड झालेला सर्व ऊस मात्र साखर कारखान्यांना (Sugar Mills) उपलब्ध होत नाही. जनावरांसाठी चारा, गूळ उद्योग आणि रसवंतीसाठी ५-७ टक्के ऊस वापरला जातो. त्यामुळे परिपक्व उसापैकी कारखान्यांना अंदाजे एकूण १३४३ लाख टन ऊस मिळण्याची शक्यता आहे.
आगामी गाळप हंगामासाठी राज्याचा साखर उतारा ११.२० टक्के गृहीत धरण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूण १५० लाख टन साखर तयार करण्याची क्षमता राज्याची असेल. परंतु साखरनिर्मितीला मर्यादित ठेवत इथेनॉल (Ethanol) तयार करण्याकरिता राज्यातील कारखाने यंदाही तयारी करीत आहेत. परिणामी, किमान १२ लाख टन साखर यंदा इथेनॉलकडे वळविली जाईल, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
१३८ लाख टन साखरनिर्मिती शक्य
‘‘इथेनॉलकडे अपेक्षित साखर वळविली गेल्यास संभाव्य साखर उतारा ११.२० टक्क्यांऐवजी १०.३० टक्क्यांपर्यंत मिळू शकेल. त्यामुळे आगामी हंगामात इथेनॉल (Ethanol) वगळून तयार होणारे राज्यातील निव्वळ साखर उत्पादन (Sugar Production) १३८ लाख टनाच्या आसपास राहील,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.