देशातील तूर उत्पादनात मोठी घट

देशात तूर पिकाला यंदा सततचा पाऊस, मर रोग, बुरशीचा प्रादुर्भाव यामुळं मोठा फटका बसलाय. त्यामुळं उत्पादन ३० ते ३५ लाख टनांपर्यंत राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहे
देशातील तूर उत्पादनात मोठी घट
Arhar Tur

पुणे : देशात तूर पिकाला यंदा सततचा पाऊस, मर रोग, बुरशीचा प्रादुर्भाव यामुळं मोठा फटका बसलाय. त्यामुळं उत्पादन ३० ते ३५ लाख टनांपर्यंत राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहे. तसचं यंदा तूर (Arhar Pulse Tur) आयात ४ लाख २७ हजार टनांवर पोचल्यानं एकूण पुरवठा ४० लाख टन होण्याचा अंदाज आहे. परंतु देशाची (India) गरज ४३ लाख टनांची असूनही दर हमीभावाच्या आसपास राहतील, असंही जाणकारांनी सांगितलंय. त्यामुळं शेतकऱ्यांनी (Farmers) बाजारातील दराचा आढावा घेऊन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय. (Tur Production in Country may decrese)

देशात दरवर्षी तुरीची ४३ लाख टनांची आवश्यकता असते. मागील वर्षी देशात ३८ लाख टन तूर उत्पादन झालं होतं. तर केंद्र सरकारच्या (Central Government) अंदाजानुसार यंदा देशात ४४ लाख ३० हजार टन उत्पादनाचा अंदाजये. देशात तुरीचं आंतरपीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कापूस आणि सोयाबीन पिकात मुख्यतः आंतरपीक म्हणून शेतकरी तुरीलाच पसंती देतात.

परंतू तूर उत्पादनात अग्रेसर असलेल्या कर्नाटक (Karnataka) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) सततचा पाऊस, बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसलाय. मर रोगामुळं पीक वाळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. तर सततच्या पावसानं शेतात पाणी साचून राहिल्यानं बुरशीचाही प्रादुर्भाव झाल्याचं कृषी विभाग (Agruculture Department) आणि शेतकऱ्यांच म्हणणंये. 

ज्या भागात पाण्याचा (Water) निचरा होणारी जमीन आहे तेथे पीक काही प्रमाणात बरे आहे. मात्र पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत पिकाला मोठा फटका बसलाय. तसं पाहिलं तर एकाच जिल्ह्यात सरसकट नुकसान नाहीये. वेगवगेळ्या भागात नुकसानीची पातळी वेगळीये. नांदेड (Nanded) जिल्ह्याचाच विचार करता अनेक भागांत तूर पिकाचं मोठं नुकसान झालंय. देगलूर तालुक्यातील तेलखेड भागात तूर पिकाला ६० ते ७० टक्के फटका बसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. जालना जिल्ह्यातही अनेक भागात तूर पिकाचं मोठं नुकासान झालंय. उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही काही तालुक्यांत तूर पिकाचं उत्पादन घटणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पहा व्हिडिओ 

अमरावती जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात तुरीवर परिणाम झालाय. अकोला जिल्ह्यात अकोट आणि शेजारच्या तालुक्यांसह अनेक भागांत सुरुवातीच्या काळात तूर पीक फुलोऱ्यात असताना जोमात होतं. मात्र सततचा पाऊस आणि मर रोगामुळं शेंगा खुपच कमी लागल्या. यवतमाळ जिल्ह्यातही अनेक भागांत मर रोगामुळं तुरीचं पीक हातचं गेल्याचं शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी सांगितलंय. मराठवडा आणि विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे याबाबत तक्रारीही दिल्या आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक राज्यातही हीच परिस्थिती आहे. अनेक भागात तूर पिकाला मोठा फटका बसलाय. सततचा पाऊस आणि पीक वाढीच्या काळातील पावसाचा ताण यामुळं उत्पादकतेवर परिणाम झालाय. गुलबर्गा, बिदर, बागलकोट, विजापूर, यादगीर आणि रायचूर भागात तूर पिकाला मोठा फटका बसल्याचं जाणकारांनी सांगितलंय. यात गुलबर्गा जिल्ह्यात पिकाला सर्वाधिक फटका बसलाय.

काय आहे तूर उत्पादनाचा अंदाज? केंद्र सरकारनं यंदाच्या हंगामात देशात ४४ लाख ३० हजार टन तुरीचं उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केलाय.  परंतु व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिकाला मोठा फटका बसल्यानं यंदा २९ ते ३० लाख टनांपर्यंत तूर उत्पादन होईल. तर काहींच्या मते तूर उत्पादन ३५ लाख टनांपर्यंत स्थिरावेल.

कर्नाटक सरकारच्या मते यंदा १२ लाख टन तूर उत्पादीत होईल. मागील वर्षी कर्नाटकात १२ लाख ३८ हजार टन तूर उत्पादन झाले होते. महाराष्ट्र सरकारने यंदा राज्यात १० लाख ८४ हजार टन तूर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या हंगामात ११ लाख ७८ हजार टन तूर उत्पादन झाले होते.जाणकारांच्या मते उत्पादनातील घट विचारात घेता कर्नाटकात यंदा ९ लाख टनांपर्यंत उत्पादन होईल. तर महाराष्ट्रात ९ लाख ५० हजार टन तूर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

आयातीमुळे दरावर दबाव

सरकारनं यंदाच्या हंगामात तूर आयातीला परवानगी दिल्यानं दर सध्या दबावात आहेत. केंद्र सरकारनं परवानगी दिल्यानंतर २०१९-२० मध्ये एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षात ४ लाख ५० हजार टन तूर आयात झाली होती. तर २०२०-२१ मध्ये ४ लाख ४२ हजार टन तूर आयात झाली होती. मात्र यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर, म्हणजेच पहिल्या सात महिन्यांतच ४ लाख २७ हजार टन तूर आयात झालीये. मागील वर्षाची शिल्लक आणि आयात तूर बाजारात दाखल झाल्यानंतर दरावर दबाव आलाय. ऐन हंगाम सुरु होण्याच्या आधीच दर हमीभावाच्याही खाली आहेत. नोव्हेंबरपर्यंत देशात ४ लाख २७ हजार टन तुरीची आयात झाली आहे. तर नुकसान झाल्यानं यंदा ३५ लाख टनांपर्यंत उत्पादन होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. म्हणजेच यंदा ४० लाख टन तुरीचा देशात पुरवठा होईल. तर मागणी सरासरी ४३ लाख टनांची असते. त्यामुळं पुरवठा मागणीच्या तुलनेत कमीच राहण्याचा अंदाजये. सध्या तुरीचे दर हमीभावापेक्षा कमीच असले तरी बाजारात आवक मर्यादीत राहिल्यास दर हमीभावाचा टप्पा गाठू शकतात, असं जाणकारांनी सांगितलंय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.