सेंद्रिय उसाच्या रसापासून मूल्यवर्धित उत्पादने

नैसर्गिक शेतीविषयी (Natural Farming) आयोजित प्रशिक्षणाची संधी या भागातील सुमारे वीस शेतकऱ्यांना मिळाली. तेथूनच सेंद्रिय-नैसर्गिक शेती करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
Value Added Products
Value Added ProductsAgrowon

शेरी चिकलठाण (ता. राहुरी, जि. नगर) येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीसंबंधीचा (Organic Farming) गट तयार केला. त्या माध्यमातून फळपिके व उसाची शेती सुरू केली. त्यापुढे जाऊन उसाच्या रसावर आधारित विविध मूल्यवर्धित उत्पादने (Value Added Products) निर्मितीचा स्टार्टअप सुरू केला आहे. यात गूळ, पावडरीसह कुल्फी, चहा, कॉफी, चटणी आदी नावीन्यपूर्ण उत्पादनांचा समावेश असून, त्यास बाजारपेठही मिळविण्यास सुरुवात केली आहे.

नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील शेरी चिकलठाण हे पश्‍चिम भागातील संगमनेर तालुक्याच्या सीमेवरील गाव आहे. मुळा धरणाचा फुगवटा गावशिवारात पसरला असल्याने तशी बारमाही पाण्याची उपलब्धता राहते. त्यामुळे ऊस, फळपिके, भाजीपाला उत्पादनाला येथील शेतकरी प्राधान्य देतात. अनेक प्रयोगशील शेतकरी या भागात आढळतात.

नैसर्गिक शेतीविषयी (Natural Farming) आयोजित प्रशिक्षणाची संधी या भागातील सुमारे वीस शेतकऱ्यांना मिळाली. तेथूनच सेंद्रिय-नैसर्गिक शेती करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. कृषी विभागाच्या ‘आत्मा’चे तालुक्याचे समन्वय धीरज कदम व तत्कालीन प्रकल्प संचालक भाऊसाहेब बराटे यांची मदत या शेतकऱ्यांना मिळाली. त्यातून राधाकिसन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली हेमंत गायकवाड सचीव असलेला सेंद्रिय शेती गट स्थापन झाला.

गटाची सेंद्रिय शेती

गटातील शेतकऱ्यांनी खरबूज, टरबूज, पपई, मिरची, पेरू, लिंबू, सीताफळ व ऊस आदी पिकांचे
सेंद्रिय पद्धतीने (Organic Farming) उत्पादन घेण्यास सुरुवात केली. सध्या पंचवीस ते तीस शेतकरी शंभर एकरांहून अधिक क्षेत्रावर उत्पादन घेत आहेत. सामूहिक पद्धतीचे ‘पीजीएस’ प्रमाणीकरण घेण्यात आले आहे.

शेतीमाल उत्पादनाबरोबरच सर्वच ठिकाणी मागणी असलेल्या सेंद्रिय गूळ निर्मितीचाही विचार गटाने केला. त्यानुसार शेतकऱ्यांनी इगतपुरी भागातील स्वाती सोनार यांच्या प्रकल्पाला भेट दिली.
अधिक अभ्यास करताना उसाच्या रसावर आधारित चहा, कॉफी तयार करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या अंबाला (हरियाना) येथील विपिन सरीन यांच्याशी गटाचा संपर्क झाला. दरम्यान कोरोना लॉकडाऊनचा कालावधी सुरू झाला होता.

या काळात विपिन यांनी महिनाभर शेतकऱ्यांना उत्पादने निर्मितीचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले. त्यानंतर गटातील राधाकिसन काकडे, माउली गायकवाड (गट उपाध्यक्ष), डॉ. अशोक गायकवाड, रवी काकडे, सुमीत गायकवाड, गोकूळ काकडे, अमोल काकडे, गजानन काकडे, ऋषिकेश काकडे, विजय कासाळ (जुन्नर), व दिनेश दरेकर (नाशिक) हे ११ शेतकरी
एकत्र आले. त्यांनी ‘गन्ना मधुरम सेलिब्रेटिंग फार्मर्स’ या ऊसविषयक गटाची स्थापना केली.

विविध मूल्यवर्धित उत्पादने
विपिन यांच्या मार्गदर्शनातून आज गटाने उसाच्या रसावर आधारित चहा, कॉफी आदी पेये तयार करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पाणी, साखर, गूळ आदी पदार्थांचा समावेश केला जात नाही. संगमनेर येथे पेयविक्रीचे आउटलेट सुरू केले आहे. त्यास ग्राहकांची पसंती असून, दररोज तीनशेपर्यंत चहा कपांची विक्री होत आहे. नगर शहरातही अशा प्रकारचे आउटलेट सुरू करण्यासाठी विचारणा झाली आहे.

या व्यतिरिक्त फळांपासून जेली, जॅमनिर्मिती देखील केली जात आहे. त्यासाठी गरजेनुसार करवंद परिसरातील जंगलातून उपलब्ध करण्यात येतो. उसाचा रस, चिंच आणि मसाला यांच्या वापरातून चटणी तयार केली जाते. त्यास ‘गन्ना इमली चटणी’ असे नाव दिले आहे. उसाच्या रसापासून कुल्फीदेखील तयार केली असून, यंदाच्या उन्हाळ्यात त्याची चांगली विक्री झाली आहे. याशिवाय सेंद्रिय गूळ व त्याची पावडरदेखील तयार केली आहे.

प्रक्रिया व अन्य यंत्रणा
विक्रीसाठी अथवा साठवणीसाठी उसाचा रस काढून व त्याची गाळणी करून त्याचे तापमान नियंत्रित केले जाते. त्यासाठी ‘क्रशर’, तापमान थंड करण्यासाठी, उसाच्या रसाच्या वड्या (ब्लॉक्स) तयार करण्यासाठी यंत्रे व दोन फ्रिज अशी सामग्री घेतली आहे.

प्रदर्शनात उत्पादनांना पसंती
नाशिक, संगमनेर भागांत उसाचा रस व अन्य उत्पादन पाठवली जात आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे पुसा- नवी दिल्ली येथे अलीकडेच कृषी महोत्सव पार पडला. यात गटातील काही सदस्य सहभागी झाले होते. तेथे काही उत्पादनांना चांगली मागणी राहिली. देशभरातून आलेल्या स्टॉलमध्ये उसाच्या रसापासून चहा, कॉफी तयार करणारा एकमेव स्टॉल या गटाचा होता. रस अथवा अन्य उत्पादने अन्यत्र ठिकाणी पाठवण्यासाठी तापमान नियंत्रित ठेवणाऱ्या फूड ग्रेड बॅगांचा वापर केला जातो. त्यात काही तासांपर्यंत रस आहे त्या स्थितीत राहू शकतो.

शेतकऱ्यांत प्रसार
गटाचा आदर्श घेऊन अन्यत्रही असे गट तयार झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनीही शेरी चिकलठाण परिसरातील सेंद्रिय शेतीला भेट दिली आहे. राज्यभरात यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्‍न गंभीर झाला. काही ठरावीक कारखान्यांचा अपवाद वगळता दोन हजार रुपये प्रति टनाच्या आतच उसाला दर मिळाला. मात्र सेंद्रिय उसाला या गटाने प्रति टन पाच हजार रुपये दर देण्याचे धोरण ठरवले आहे. शेतकऱ्यांनी स्वतः तोडणी करून गटाकडे ऊस पोच करायचा आहे. गटाचे माऊली गायकवाड म्हणाले की सेंद्रिय शेती व्यवस्थापनातून उत्पादित शेतमालाचा दर्जाही सुधारला आहे. टिकवण क्षमता वाढली. त्यामुळे या भागात व्यापारी येऊन भाजीपाला, फळांची खरेदी करतात. आमच्या शेतीमालाला मागणीही वाढली असून दरही बऱ्यापैकी मिळत आहेत.

संपर्क ः डॉ. अशोक गायकवाड, ९८८१७१६१३१,
माउली गायकवाड, ९७६७२३७६८२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com