गव्हाच्या पुढील हंगामात काय दडलंय?

आंतरराष्ट्रीय बाजारात इतर शेतीमालांतील तेजीला ब्रेक लागत असताना गव्हाची घोडदौड मात्र कायम आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर आंतरराष्ट्रीय पटलावर गहू भाव खाऊ लागला.
Wheat Export
Wheat ExportAgrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात इतर शेतीमालांतील (Agriculture Commodity) तेजीला ब्रेक लागत असताना गव्हाची (Wheat Market) घोडदौड मात्र कायम आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia Ukraine War) आंतरराष्ट्रीय पटलावर गहू भाव (Wheat Rate) खाऊ लागला. युद्ध, अनेक देशांतील उत्पादन घट, वाहतुकीतील अडथळे आणि वाढलेली मागणी यामुळे गहू दराला (Wheat Price) झळाळी मिळाली. गहूटंचाई (Wheat Shortage) आणि दरवाढ नवीन हंगामातील माल बाजारात आल्यानंतर कमी होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र पुढील हंगामातही जागतिक बाजारात गहूटंचाई आणि दरवाढ कायम राहू शकते, असा कयास अनेक देश, जाणकार आणि संस्था व्यक्त करत आहेत. त्यामुळे जागतिक गहू बाजारातील (Global Wheat Rate) स्थिती काय आहे? पुढील हंगामासाठी काय शक्यता व्यक्त केल्या जात आहेत? याचा घेतलेला आढावा...

जागतिक पातळीवर २०२२ हे वर्ष गहूटंचाई घेऊन आले. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जगात गव्हाचा पुरवठा विस्कळीत झाला. त्यातच उष्णतेच्या लाटेमुळे अनेक देशांतील गहू उत्पादनात घट झाली. त्यामुळे अन्न आणि कृषी संघटनेने २०२२ मध्ये जागतिक गहू उत्पादन ०.८ टक्क्यानी घटण्याची शक्यता व्यक्त केली. संघटनेच्या मते मागील चार वर्षांतील ही पहिलीच उत्पादन घट असेल. २०२१ मध्ये ७७७.१६ दशलक्ष टन गहू उत्पादन झाले होते. त्यात २०२२ मध्ये ६.१६ दशलक्ष टनांची घट होईल, आणि ७७१ दशलक्ष टनांवर स्थिरावेल. तर अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते (यूएसडीए) २०२०-२१ या हंगामात जगामध्ये ७७५.७१ दशलक्ष टन गहू उत्पादन झाले होते. ते २०२१-२२ मध्ये ७७९ दशलक्ष टनांवर पोहोचले. चालू हंगामात म्हणजेच २०२२-२३ मध्ये गहू उत्पादन ७७३.४३ दशलक्ष टनांपर्यंत कमी होईल. म्हणजेच जागतिक गहू उत्पादन चालू हंगामात जवळपास ६ दशलक्ष टनांनी कमी राहील. चालू हंगामात ऑस्ट्रेलिया, भारत, मोरोक्को आणि युक्रेन या देशांमध्ये उत्पादन घटले. यापैकी भारतात अति उष्णतेमुळे गहू पिकाला फटका बसला आणि उत्पादनात मोठी घट झाली. तर ऑस्ट्रेलिया आणि मोरोक्कोमध्ये दुष्काळी स्थिती आणि तापमानवाढीमुळे उत्पादन घटले. युक्रेनमध्ये युद्धामुळे पीक काढणी होऊ शकली नाही. तर पुढील हंगामासाठीची पेरणी घटली. परिणामी, जागतिक पातळीवर गव्हाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २०२२-२३ च्या हंगामात कॅनडा, इराण आणि रशियात गहू उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली.

जागतिक गहू उत्पादन (दशलक्ष टन)

२०१४-१५…७२८.३

२०१५-१६…७३५.९

२०१६-१७…७५६.५

२०१७-१८…७६१.५४

२०१८-१९…७३१.४१

२०१९-२०…७६२.२

२०२०-२१…७७५.७१

२०२१-२२…७७९

२०२२-२३…७७३.४३*

(* अंदाजित उत्पादन)

जागतिक गहू निर्यात वाढण्याची शक्यता

जगात गहू निर्यातीत रशिया आघाडीवर आहे. मात्र २०२१-२२ मध्ये महत्त्वाच्या निर्यातदार देशांची निर्यात घटली आणि भारताची निर्यात वाढली होती. ‘यूएसडीए‘च्या मते २०२०-२१ च्या हंगामात भारतातून केवळ २.५ दशलक्ष टन (२५ लाख टन) गहू निर्यात झाली होती. मात्र २०२१-२२ मध्ये महत्त्वाच्या निर्यातदार देशांतून निर्यात कमी झाल्यानंतर भारतातून निर्यात वाढली. या वर्षात भारताने ८ दशलक्ष टन गहू निर्यात केला. जागतिक गहू निर्यातीचा विचार करता २०२०-२१ मधील निर्यात २०३.२ दशलक्ष टन होती. ती २०२१-२२ मध्ये कमी होऊन १९९.३ दशलक्ष टनांवर आली. तर २०२२-२३ मध्ये पुन्हा वाढून २०४.५ दशलक्ष टनांवर पोहोचण्याची शक्यता यूएसडीएने व्यक्त केली.

२०२१-२२ मध्ये देशनिहाय गहू निर्यात (दशलक्ष टन)

रशिया…३३

युरोपीय महासंघ…२९.५

ऑस्ट्रेलिया…२७.५

युक्रेन…१९

अर्जेंटिना१६.५

कॅनडा…१५.५

भारत…८

इतर…५०.३

Wheat Export
भारत गहू पीठ निर्यातीवर निर्बंध लादणार?

रशियाची निर्यात का वाढू शकते?

जागतिक बाजारात गहू निर्यातीत सध्या युद्धात अडकलेल्या रशिया आणि युक्रेनचा वाटा मोठा असतो. २०२१-२२ मध्ये रशियाने एकूण जागतिक निर्यातीपैकी तब्बल १६.५५ टक्के गहू निर्यात केला. रशिया गहू निर्यातीत प्रथम क्रमांकावर राहिला. रशियाने ३३ दशलक्ष टन गहू जगाला पुरवला. रशियात मागील हंगामात ७५.१ दशलक्ष टन गहू उत्पादन झाले होते. तर २०२२-२३ मध्ये ८१ दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. रशियाची निर्यातही ४० दशलक्ष टनांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येथे पेरणी वाढल्याने आणि युद्धानंतर निर्यात ठप्प झाल्याने निर्यात आणि पुरवठा वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी रशियाची निर्यात केवळ ७ दशलक्ष टनांनी वाढू शकते. मात्र मागणी पुरवठ्यातील तूट जास्त आहे.

रशियातून गव्हाची निर्यात (टक्के)

मंगोलिया…१००

बेनिन…१००

अर्मेनिया…९९.८

जॉर्जिया…९९.५

कझागिस्तान…९९.२

टर्की…६४.२

इजिप्त…५४.५

युक्रेनची निर्यात निम्म्यावर येणार?

युक्रेन देशाचा २०२१-२२ मध्ये जागतिक निर्यातीत १० टक्के वाटा होता. युक्रेनने १९ दशलक्ष टन गहू निर्यात केला. येथील उत्पादन ३३ दशलक्ष टनांवर होते. मात्र रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर येथील अनेक गोदामांतील गव्हाचे नुकसान झाले. शेतातील पिके काढता आली नाही. काळा समुद्र मार्गातून निर्यात ठप्प झाली. तसेच युद्धामुळे युक्रेनमधील वसंत ऋतूतील पेरणी घटली. शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते, बियाणे आणि इंधनाची मोठी टंचाई भासत होती. त्यामुळे पेरा घटला. तसेच युक्रेनच्या निर्यातीतील अडथळे दूर होताना दिसत नाही. त्यामुळे २०२२-२३ च्या हंगामात युक्रेनमधील गहू उत्पादन २१.५ दशलक्ष टनांपर्यंत घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर निर्यात जवळपास ५० टक्क्यांनी कमी होईल. या हंगामात युक्रेन १० दशलक्ष टन गहू निर्यात करेल, असा अंदाज ‘यूएसडीए‘ने व्यक्त केला.

युक्रेनमधून गव्हाची निर्यात (टक्के)

लेबनॉन ८०

मोल्दोव्हा…८०.३

कतार…६५.५

पाकिस्तान…४५.७

इजिप्त…१४.७

टर्की…१०.६

Wheat Export
पुढील हंगामातही गहू टंचाई भासणार?

युरोपीय महासंघामध्ये उत्पादन घटीचा अंदाज

१) युरोपीय महासंघामध्ये २०२१-२२ च्या हंगामात १३८.४ दशलक्ष टन गहू उत्पादन झाले होते. तर निर्यात २९.५ दशलक्ष टन झाली होती. मात्र चालू हंगामात युरोपीय महासंघामधील देशांना कमी पावसाचा फटका बसला आहे. अनेक देशांत दुष्काळी स्थिती आहे. याचा गहू पिकावर मोठा परिणाम होत आहे. येथील पिकाला पावसाची नितांत गरज आहे. आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर येथील गहू उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दोन्ही देशांतील उत्पादन घटल्यास जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल. कारण आधीच युक्रेनमधील निर्यात घटली.

२) युरोपीय महासंघामध्ये २०२१ च्या हंगामात विक्रमी गव्हाचे उत्पादन झाले होते. त्यात रोमानिया, बल्गेरिया, फ्रान्स आणि स्पेनमधील उत्पादन वाढ जास्त होती. फ्रान्स उत्पादन वाढीत आघाडीवर राहिला. मात्र यंदा फ्रान्समधील उत्पादनात घटीची शक्यता व्यक्त होत आहे. दुष्काळामुळे कमी पेरणी आणि उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. जाणकारांच्या मते फ्रान्समधील गहू उत्पादन २० लाख टनांनी घटू शकते. मागील हंगामात फ्रान्समध्ये ३५५ लाख टन गहू उत्पादन झाले होते. यंदा ३३५ लाख टनांच्या दरम्यान उत्पादन स्थिरावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

३) इटली आणि स्पेनमध्येही दुष्काळी स्थितीचा परिणाम गहू पिकावर होत आहे. त्यामुळे गहू उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रोमानियाच्या कृषिमंत्र्यांनी तर यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमी उत्पादन हाती येईल अशी माहिती यापूर्वीच दिली. त्यांच्या मते रोमानियात मागील वर्षी ११.३ दशलक्ष टन गहू उत्पादन झाले होते. यंदा यापेक्षा कमी उत्पादन होईल. मात्र उत्पादन किती घटेल हे आत्ताच सांगता येणार नाही.

४) बल्गेरियात मागील हंगामात ७.१ दशलक्ष टन उत्पादन हाती आले होते. मात्र चालू हंगामात उत्पादन घटेल. तर जर्मनी आणि पोलंडमध्येही वसंत ऋतूतील पेरण्यांवर पावसाच्या खंडाचा परिणाम होत आहे. एकूणच काय तर यंदा युरोपीय महासंघामधील गहू उत्पादन घटीची शक्यता व्यक्त होत आहे.

५) ‘यूएसडीए‘नेही युरोपीय महासंघामधील गहू उत्पादन २०२२-२३ मध्ये १३६.१ दशलक्ष टनांवर स्थिरावेल असा अंदाज व्यक्त केला. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन २.३ दशलक्ष टनांनी कमी राहील. तर युरोपीय महासंघामधून ३६ दशलक्ष टन गहू निर्यात होऊ शकते, असा अंदाज ‘यूएसडीए‘ने व्यक्त केला. जागतिक मागणी लक्षात घेता येथून निर्यात वाढू शकते, असा अंदाज आहे. मात्र येथील उत्पादन कसे राहते? यावर येथून होणारी निर्यात अवलंबून आहे.

विविध देशांची गहू, पीठ आणि गहू पदार्थ निर्यात (दशलक्ष टन)

देश...२०१७-१८...२०१८-१९...२०१९-२०...२०२०-२१...२०२१-२२

युरोपीय महासंघ...२४.९...२४.७...३९.८...२९.८...३७.५

रशिया...४१.४...३५.९...३४.४...३९.१...३५

ऑस्ट्रेलिया...१५.५...९.८...१०.१...१९.७...२६

युक्रेन...१७.७...१६...२१...१६.८...२४.२

अमेरिका...२३.२...२६.२...२६.३...२६.७...२३

कॅनडा...२२...२४.४...२३.४...२७.७...१५.५

विविध देशांची गहू, पीठ आणि गहू पदार्थ आयात (दशलक्ष टन)

देश....२०१७/१८....२०१८/१९....२०१९/२०....२०२०/२१....२०२१/२२

इजिप्त....१२.४….१२.३....१२.८....१२.१....१३

टर्की....६....६.५....११....८....११

इंडोनेशिया....१०.७....१०.९....१०.५....१०.४....१०.७

अल्जेरिया....८.१....७.५....७.१....७.७....७.७

बांगलादेश....६.५....५.१....६.८....७.२....७.४

ब्राझील....६.७....७.४....७....६.३....६.५

भारतातील गव्हाची स्थिती काय?

१) भारतात मागील २०२०-२१ च्या हंगामात १११ दशलक्ष टन गहू उत्पादन झाले होते. तर चालू हंगामात १०६.७ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातून गहू निर्यात वाढली. त्यामुळे खुल्या बाजारात हमीभावापेक्षा ३०० ते ५०० रुपये अधिक दर होते. त्यामुळे सरकारी खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला.

२) सरकारने हंगामाच्या सुरुवातीला यंदा ४४ दशलक्ष टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानंतर मात्र त्यात कपात करून २५ दशलक्ष टनांवर आणले. मात्र शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याने ते १९.५ दशलक्ष टनांवर आणण्यात आले. मात्र आतापर्यंत सरकारला हेही उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आले नाही. सरकारला आतापर्यंत १८.७ दशलक्ष टनांची खरेदी करण्यात यश आले.

३) गहू खरेदी कमी झाल्यानंतर भारत सरकारने विविध योजनांसाठी गव्हाऐवजी तांदळाचा पुरवठा सुरू केला. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसाठी मागील वर्षी १८.२ दशलक्ष टन गहू दिला होता. यंदा मात्र केवळ ७.१ दशलक्ष टन गव्हाचा पुरवठा करणार आहे. त्याऐवजी तांदळाचा पुरवठा वाढविला. मात्र भारताला एप्रिल २०२३ पर्यंत गरीब कल्याण अन्न योजना आणि अन्नसुरक्षा योजनेसाठी ३२ दशलक्ष टन गव्हाची आवश्यकता आहे. मात्र सरकारची खरेदी उद्दिष्टापेक्षा जवळपास ५८ टक्के कमी झाली. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला.

४) गहू निर्यातबंदी करण्याआधी जवळपास ८ दशलक्ष टन गहू निर्यात भारतातून झाली होती. भारतीय गव्हाचा मुख्य ग्राहक बांगलादेश ठरला. सोबतच इंडोनेशिया, फिलिपिन्स, नायजेरिया, जपान, इजिप्त, टर्की, चीन, इटली, आदी देशांना भारताने गहू निर्यात केला.

भारताच्या निर्यातीत देशनिहाय वाटा (टक्के)

बांगलादेश…५५.९

श्रीलंका…७.९

संयुक्त अरब अमिराती…६.९

इंडोनेशिया…५.९

येमेन…५.३

फिलिपिन्स…५.१

नेपाळ..३.८

इतर…९.२

गहूटंचाईची शक्यता का वर्तविली जातेय?

जगात २०२२-२३ मध्ये गहू उत्पादन ७७३.४ दशलक्ष टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. तर वापर मात्र ७८६ लाख टनांपर्यंत वाढेल, असे युएसडीएने म्हटले आहे. म्हणजेच २०२२-२३ या हंगामात गव्हाचे उत्पादन कमी आणि वापर जास्त असे समीकरण असेल. असे असले तरी गव्हाचे उत्पादन पाऊस आणि दुष्काळी स्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे अनेक जाणकार गहू टंचाई आणि दरवाढ २०२२ आणि २०२३ या आर्थिक वर्षांतही कायम राहण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.२०२१ मध्ये अनेक देशांत गहू उत्पादन कमी झाले. तर रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्यात ठप्प झाली. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाचे दर ४० टक्क्यांनी वाढले होते.

युक्रेनसह युरोपियन युनियनमधील गहू उत्पादन यंदा घटण्याची शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलिया, भारत, मोरोक्को या देशांतील उत्पादनालाही फटका बसला. त्यामुळे जागतिक उत्पादन कमी राहून पुरवठा प्रभावित होऊ शकतो. परिणामी, पुढील वर्षात गहू भाव खाणार, असे वाटते. भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन आणि अर्जेंटिना या देशांनी देशातील साठ्याची केलेली तजवीज यावरून हा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर आयातीवर अवलंबून असणारे बांगलादेश, पाकिस्तान, इजिप्त, टर्की, इंडोनेशिया आणि ब्राझील यांच्या खरेदीवरून आंतरराष्ट्रीय बाजारात येणाऱ्या काळातील स्थिती लक्षात येते. या देशांनी वाढलेल्या दरानेही गव्हाची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु केली आहे. त्यामुळे पुढील हंगामातही आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाची टंचाई भासू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com