
Soybean Rate Update : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात (Soyameal Rate) नरमाई आली. सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांनी हंगामातील निचांकी टप्पा गाठला. तर सोयातेलाचे भावही (Soya Oil Rate) दबावात आहेत. याचाही परिणाम देशातील सोयाबीन बाजारावर जाणवत आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारावर ब्राझीलच्या सोयाबीनचा परिणाम होत आहे, असे जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारात सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून दबावात आले. सरासरी ५ हजार ४०० रुपयांपर्यंत पोचलेली दरपातळी पुन्हा कमी झाली. म्हणजेच मागील दोन आठवड्यांमध्ये दरात नरमाई दिसली.
आज अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचे सरासरी बाजारभाव ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर सोयाबीन दरात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांचे चढ उतार सुरु आहेत. बाजार एका भावपातळीवर टिकून दिसत नाहीत.
आंतरराष्ट्रयी बाजारात सोयाबीनचे वायदे १५.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवरून १४.१० डाॅलरपर्यंत कमी झाले. गेल्या दोन आठवड्यांमध्ये दरात नरमाई मोठी आहे. सोयाबीनच्या वायद्यांनी हंगामातील निचांकी दरपातळी गाठली.
तर सोयापेंडचे वायदेही ४२५ डाॅलरपर्यंत कमी झाले. सोयापेंडच्या दराचीसुध्दा ही यंदाची निचांकी पातळी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दरपातळी कमी झाल्याचा परिणाम भारतासह सर्वच देशातील बाजारांवर दिसत आहे.
ब्राझीलमध्ये यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली. ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन यंदा विक्रमी १ हजार ५३० लाख टनांवर पोचणार आहे. ब्राझीलच्या उत्पादनामुळं अर्जेंटीना आणि अमेरिकेतील उत्पादन घटीमुळं निर्माण झालेली पोकळी भरून काढली.
आता ब्राझीलमधील सोयाबीन काढणी ९८ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली. ब्राझीलमध्ये उत्पादन वाढल्यानं दरावर दबाव आला. ब्राझीलमध्ये दर कमी झल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारावरही दबाव निर्माण झाला. त्यामुळंच वायद्यांमध्ये घट झाली.
ब्राझीलमधून सोयाबीन निर्यातही वेगाने सुरु आहे. चीन ब्राझीलच्या सोयाबीनचा मुख्य ग्राहक आहे. यंदा ब्राझीलचं सोयाबीन स्वस्त मिळत असल्यानं चीनची मागणी वाढली. यंदा चीन सोयाबीन आयात वाढविण्याची शक्यता आहे.
अर्जेंटीनाही ब्राझीलमधून सोयाबीन आयात वाढवण्याचा अंदाज आहे. ब्राझीलच्या सोयाबीनचा पुढील काही दिवस दबाव राहील. ब्राझीलचं सोयाबीन निम्म बाजारात येऊन गेल्यानंतर दरावरील दबाव दूर होऊ शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.