रशियाने शब्द मोडल्याने गहू बाजारात तेजीचा भडका

रशियाने युक्रेनमधील मायकोलाईव बंदरावर नुकताच हल्ला केला. त्यामुळे रशियाने अन्नधान्य निर्यातीबद्दल दिलेल्या शब्दाला हरताळ फासल्याचे उघड झालं आहे.
रशियाने शब्द मोडल्याने गहू बाजारात तेजीचा भडका
Wheat ExportAgrowon

रशियाने युक्रेनमधील (Russia-Ukraine) मायकोलाईव बंदरावर नुकताच हल्ला केला. त्यामुळे रशियाने अन्नधान्य निर्यातीबद्दल (Food Export) दिलेल्या शब्दाला हरताळ फासल्याचे उघड झालं आहे. युध्दाच्या धामधुमीत काळ्या समुद्रातून होणारी शेतीमालाची वाहतुक सुरळीत करण्याची तयारी रशियाने दाखवली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र रशियाने आडमुठेपणा करून युक्रेनच्या बंदरांवरील हल्ले सुरूच ठेवल्याने स्थिती बिघडली आहे. त्यामुळे जगभरात गव्हाच्या दरातील तेजीचा (Wheat Market) आणखी भडका उडाला आहे.

युक्रेन जगाला गहू, सूर्यफुल तेल आणि इतर शेतमालाचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करतो. परंतु रशियाशी युध्द सुरू झाल्यामुळे युक्रेनमधली शेतीमाल निर्यात थंडावली आहे. त्यामुळे जगभरात अन्नधान्य टंचाईचं संकट उभं राहण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर याबद्दल चिंतेचं वातावरण आहे. युक्रेनमधील अनेक बंदरं रशियाच्या ताब्यात आहेत. तर काही बंदरं रशियाच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे रशियाने सामंजस्याची भूमिका घेतली तर अन्नधान्य निर्यातीचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो.

त्यामुळे अनेक बड्या देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला. रशियानेही त्याला होकार दिला. त्यानुसार असं ठरलं की रशिया काळ्या समुद्रातून होणारी शेतीमालाची निर्यात सुरळीत करण्यासाठी मदत करेल. परंतु प्रत्यक्षात मात्र रशियाने युक्रेमधील मायकोलाईव बंदरावर हल्ला केला. त्यामुळे रशियाच्या भुमिकेबद्दल संशय बळावला आहे. या घडामोडींचा परिणाम म्हणून सोमवारी (ता. ७) जगभरातील बाजारपेठांमध्ये गव्हाचे दर वाढले.

ॲग्रिसेन्सस या आंतरराष्ट्रीय कमोडिटी वृत्तसंस्थेने यासंबंधीची बातमी दिली आहे. रशियाने युक्रेनच्या दोन गोदामांवर रॉकेटचा मारा केला. रशियाची ही चाल आणि जागतिक पातळीवर तुटवड्याची स्थिती यामुळे गव्हाच्या दरात तेजी आली आहे. फ्रान्समध्ये दुष्काळ पडल्यामुळे आगीत आणखी तेल ओतलं गेलंय. अमेरिकेतील शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडिंग (सीबॉट) येथे गव्हाच्या फ्युचर्स दरात वाढ झाली.

रशियाने युक्रेनमधील बंदरावर हल्ला केल्यामुळे त्याचा खोटारडेपणा उघड झाला आहे; लोडिंग टर्मिनल नसेल तर कोणतंही जहाज समुद्रात पाठवता येणार नाही, असे मत विश्वेषकांनी व्यक्त केलं आहे. फ्रान्समध्ये दुष्काळाच्या स्थितीत फारशी सुधारणा झाली नसल्याने गव्हाचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे युरोपमध्ये होणारा पुरवठा आक्रसला आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या फ्रान्समध्ये गेल्या आठवड्यात मात्र मोठी गारपीट झाली. गव्हाच्या शेतात टेनिस बॉलच्या आकाराच्या गारा पडल्या. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com