
पुणेः रशियाने (Russia) हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये (Ukraine) गहू लागवड (Wheat Sowing) कमी झाली होती. त्यामुळे येथील गहू उत्पादन यंदा जवळपास ४१ टक्क्यांनी कमी राहील, अशा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) व्यक्त केला. जागतिक गहू निर्यातीत युक्रेनचा वाटा १० टक्के आहे. त्यामुळे येथील उत्पादन घटीने आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचा कमी पुरवठा होण्याची शक्यता आहे.
रशियाने आक्रमण केल्यानंतर युक्रेनमधील शेती व्यवस्था विस्कळीत झाली. युक्रेन गहू आणि सूर्यफुल उत्पादनात महत्वाची भुमिका पार पाडतो. येथे या दोन्ही पिकांची वसंत ऋतुत लागवड होते. परंतु पेरणीच्या काळातच येथे युध्दाची धग वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे, खते आणि इंधनाची टंचाई भासत होती. बराच भाग रशियन सैन्याच्या ताब्यात होता. त्यामुळे या भागात पेरण्या होऊ शकल्या नाहीत.
परिणामी गेल्यावर्षीच्या तुलनेत येथील पेरा निम्म्यावर पोचला. त्यातच पीक काढणीतही अडथळे येत आहेत. काही ठिकाणी रशियन सैन्याने गव्हाचे शेत जाळल्याचे वृत्त आले होते. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. येथील गहू उत्पादनात मोठी घट झाल्याचं युएसडीएने म्हटले आहे.
युएसडीएने नुकतेच जुलै महिन्याचा अंदाज जाहिर केला. या अंदाजात युक्रेनमधील गहू उत्पादन 41 टक्क्यांनी घटल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच येथील उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा १३५ लाख टनांनी घटले. गेल्यावर्षी येथे ३३० लाख टन गहू उत्पादन झालं होतं.
परंतु यंदा ते १९५ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच युध्दामुळे येथे धान्याची वाहतूक आणि खरेदी-विक्रीही विस्कळीत झाली. मागील हंगामातील अनेक गोदामे रशियन सैन्याच्या ताब्यात आहेत. त्यामुळे येथून आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा झाला नाही.
निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह
जागतिक गहू निर्यातीत युक्रेनचा वाटा १० टक्के आहे. युक्रेनने २०२१ मध्ये २० लाख टन गहू निर्यात केला होता. मात्र चालू वर्षात निर्यात बंद आहे. यंदा उत्पादन घटल्याने निर्यात होईल कि नाही याबाबत शाशंकता आहे. तर भारतातील उत्पादनही साडेतीन टक्क्यांनी कमी होऊन १०६० लाख टनांवर स्थिरावल्याचंही युएसडीएने म्हटले आहे.
त्यामुळे भारताने गव्हावर निर्यातबंदी लादली. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाची टंचाई आहे. ही टंचाई येणाऱ्या हंगामातही कायम राहू शकते, असा अंदाज काही देशांनी यापुर्वीच व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.