Cotton Rate : कापूस बाजार कधी तेजीत येणार? दरात किती वाढ होईल?

अमेरिकेच्या कृषी खात्याचा म्हणजे यूएसडीएचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झालाय. आगामी वर्षात म्हणजे २०२३ मध्ये अमेरिकेत कोणत्या पिकाची किती लागवड होईल, याचा अंदाज त्यात आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Market Update : अमेरिकेच्या कृषी खात्याचा म्हणजे यूएसडीएचा (USD) एक अहवाल नुकताच प्रकाशित झालाय. आगामी वर्षात म्हणजे २०२३ मध्ये अमेरिकेत कोणत्या पिकाची किती लागवड होईल, याचा अंदाज त्यात आहे.

तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? आपल्याकडचं कृषी खातंही पिकाची लागवड किती होणार आणि उत्पादन किती मिळणार याचे अंदाज देत असतंच की. ते कधी खरे ठरतात? मग यूएसडीएच्या अंदाजाचं काय कौतुक? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

आपल्या कृषी खात्याचे अंदाज बहुतेक वेळा चुकतात, हे खरं आहे. त्याला काही कारणं आहेत. शक्य असूनही आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जात नाही. माहिती गोळा करण्याची पारदर्शक आणि सक्षम व्यवस्था उभारली जात नाही. कारण त्यात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात.

शिवाय सरकारची काही राजकीय गणितंही असतात. त्यामुळे आपल्या कृषी खात्याचे आकडे बहुतांश वेळा बरोबर काही लागत नाहीत.

पण अमेरिकेच्या कृषी खात्याचं म्हणजे यूएसडीएचं मात्र तसं नाही. त्यांचे पीक लागवड आणि उत्पादनाचे अंदाज काही अपवाद वगळता बऱ्यापैकी अचूक ठरतात.

Cotton Rate
Cotton Market : बाजारात मेअखेरीस कापूस आवक वाढणार

तर यूएसडीएचा ताजा अहवाल नुकताच आलाय. त्यात अमेरिकेत कापसाचा पेरा २०२३ मध्ये तब्बल १८ टक्के घटेल, असा अंदाज दिलाय. कापसाचे लागवड क्षेत्र ११.३ दशलक्ष एकर राहण्याची शक्यता आहे. गव्हाचा पेरा ९ टक्के तर मक्याचा पेरा ४ टक्के वाढेल, असा यूएसडीएचा अंदाज आहे.

यूएसडीएचा हा अहवाल भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. कारण कापूस उत्पादन आणि निर्यातीत अमेरिका हा बडा खेळाडू आहे.

त्यामुळे अमेरिकेत कापसाच्या पिकाची काय स्थिती आहे, त्यावर जगाचा बाजार हेलकावे घेत असतो. आता तिथं उत्पादन कमी राहणार म्हणल्यावर मार्केटचे इंडिकेटर लागले आहेत.

बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमध्ये कापूस उत्पादनाला मोठा फटका बसलाय. पुढील काळात तिथे कापूस पुरवठ्याची स्थिती आणखी वाईट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आगामी वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा तुटवडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

त्यात चीनमध्ये कोरोनामुळे थंडावलेलं अर्थचक्र आता पुन्हा मूळपदावर आलं आहे. त्यामुळे चीनकडून कापसाची वाढती मागणी राहणार आहे. त्याचाही मोठा परिणाम कापसाच्या किंमतीवर होण्याची चिन्हे आहेत.

दुसऱ्या बाजूला भारतात टेक्सटाईल उद्योगाकडे आता कापसाचा पुरेसा साठा नाही. महिना-दोन महिने पुरेल एवढाच स्टॉक आहे. हंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने माल रोखून धरला.

तर उद्योगाने शेतकरी कुठवर थांबतील, कापसाचे दर पडल्यावरच बाजारातून कापूस खरेदी करू, असं गणित मांडून शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांत तसं घडलंही. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस बाजारात आणला.

कापसाचे दर घसरले. परंतु पॅनिक सेलिंगचा हा भर ओसरल्यावर आता आवक पुन्हा कमी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अपेक्षित दर मिळेपर्यंत कापूस विकायचा नाही, असं ठरवलंय. कापसाच्या बाजारात मुलभूत घटक म्हणजे फंडामेन्टल्स मजबूत असल्यामुळे दरातही सुधारणा दिसून येत आहे.

अशा स्थितीत टेक्सटाईल उद्योगाला आता बाजारातून कापूस खरेदी करण्यावाचून पर्याय नाही. आता नवीन हंगामातला कापूस थेट ऑक्टोबरमध्येच उपलब्ध होईल. आता हाताशी मोठा साठा नाही. मग वर्षभर मिल कशी चालवणार? त्यामुळे बाजारात कापसाला उठाव मिळून दर वाढतील, असा तज्ज्ञांचा होरा आहे.

अर्थात कापूस दराचा दीर्घकालिन ट्रेन्ड मॉन्सूनची स्थिती, एल-निनोचा पिकपाण्यावरील संभाव्य परिणाम, जागतिक अर्थकारणातील घडामोडी, मंदीचे मळभ, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया व आफ्रिकेतील उत्पादन आदी घटकांवर अवलंबून आहे.

परंतु पुढील काही महिने तरी कापूस पुन्हा उसळी मारेल आणि कापसाचे दर वाढत्या पातळीवर टिकून राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

या सगळ्या घडामोडींचा लगेचच बाजारावर काय परिणाम होईल, कापसाचे दर कधी वाढतील, असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत. तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात कापसाचे भाव आणखी वाढतील; क्विंटलमागे २०० ते ३०० रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. तर शेतीमाल बाजार अभ्यासक सुरेश मंत्री यांच्या अंदाजानुसार ३०० ते ४०० रूपयांनी दर वाढू शकतात.

Cotton Rate
Cotton, Soybean Rate Update : कापूस, सोयाबीन उभारी घेणार; तुरीतील तेजी कायम राहणार?
जवळपास ६५ टक्के कापसाची आवक झालेली आहे. आता फार तर ३५ टक्के कापूस शिल्लक आहे. कापूस बाजारात मंदी येण्याची शक्यता नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिती अनुकूल आहे. चीनकडून मागणी वाढत आहे. कापसाच्या दरात ३०० ते ४०० रूपये वाढ होऊ शकते.
सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार विश्लेषक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com