त्रिपक्षीय करार करताना...

अनेक वेळा बॅंकेमध्ये कर्जासंबंधी विचारणा करताना त्रिपक्षीय करार करण्याविषयी बोलले जाते. हा त्रिपक्षीय करार म्हणजे नेमके काय, करताना कोणती काळजी घ्यायची, त्याचे कर्जदार आणि बँक यांना काय फायदे होतात, याची माहिती घेऊ.
त्रिपक्षीय करार करताना...
BankingAgrowon

त्रिपक्षीय करार म्हणजे काय?

कर्जदार, कंपनी किंवा संस्था आणि बँक यांच्यामध्ये होणारा करार म्हणजे त्रिपक्षीय करार (Trilateral Agreement). एखादी कंपनी किंवा संस्था त्यांना आवश्यक असणारा शेतीमाल मिळविण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर करार करू इच्छिते. हा झाला द्विपक्षीय करार (Bilateral Agreement). मात्र या उत्पादनासाठी कर्जदारास (Debtor) काही पायाभूत सुविधा उभाराव्या लागतात. त्याच्या उभारणीसाठी आवश्यक प्राथमिक भांडवलाची गरज असते. भांडवलासाठी तो बॅंकेकडे जातो. म्हणजेच या व्यवसायामध्ये तिसरा पक्ष अंतर्भूत होतो. बॅंकेला ती या व्यवसायासाठी पुरवत असलेल्या भांडवलाच्या परतफेडीची हमी पाहिजे असते. म्हणजेच कंपनीला शेतीमाल हवा आहे. शेतकऱ्याला शेतीमालाच्या विक्रीची हमी हवी आहे, तर बॅंकेला परतफेडीची हमी हवी आहे. अशा वेळी कंपनी अथवा संस्था शेतकऱ्यांशी निविष्ठा पुरवणे, शेतीमाल खरेदीची हमी देण्याचा करार करते. तीच कंपनी बँकेला ही या व्यवसायासाठी शेतकऱ्यांने घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची शेतकऱ्याच्या (वा संभाव्य कर्जदाराच्या) वतीने हमी देते. अशा कराराला त्रिपक्षीय करार असे म्हटले जाते.

एखादी कंपनी जेव्हा शेतकऱ्यांकडून काही शेतीमालाची मागणी करते, त्या वेळी त्यांच्या काही अपेक्षा असतात. उदा.

१. शेतीमालाची प्रत चांगली असावी. उदा. एकसारख्या आकारमान, रंग, चव, कीड-रोगमुक्त इ.

२. शेतीमालाचा पुरवठा नियमित, वर्षभर किंवा हंगामानुसार व्हावा.

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कंपन्या

उदा. शेतीमाल निर्यात करणाऱ्या संस्था किंवा कंपन्या --- निर्यातक्षम उत्पादन घेणारा शेतकरी

बी-बियाणे उत्पादक संस्था किंवा कंपनी ---- शिफारशीप्रमाणे सर्व नियम व अटी पाळून बीजोत्पादन घेणारा शेतकरी

प्रक्रिया उद्योग वा मूल्यवर्धन करणारी संस्था --- प्रक्रियेसाठीची आवश्यकता लक्षात घेऊन, त्या विशिष्ट प्रकारच्या शेतीमालाचे उत्पादक. डेअरी किंवा दुग्ध प्रक्रिया उद्योग - दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी अंडी वा मांसासाठी कुक्कुटपालन उद्योग --- कुक्कुटपालन करणारा शेतकरी इ. अशा कंपन्या शेतकऱ्याबरोबर शेतीमालासंदर्भात करार करतात. हे करार पुढील प्रकारचे असतात.

१. शेतकरी माल उत्पादन करून कंपन्यांना किंवा संस्थांना देण्याविषयी.

यात उत्पादनाची सर्व जबाबदारी शेतकऱ्याची असते. उदा. दूध उत्पादन.

करारामध्ये उल्लेखलेल्या दर्जाचे उत्पादन तयार झाल्यानंतर त्याची खरेदी करण्याची जबाबदारी त्या संबंधित कंपनीची असते. उदा. डेअरी किंवा दुग्ध प्रक्रिया उद्योग.

२) कंपनीकडून शेतकऱ्यांना आवश्यक त्या निविष्ठा, तंत्रज्ञान, मार्गदर्शन वा वैद्यकीय सेवा पुरवण्याविषयीचा करार. उदा.

i) शेतीमाल उत्पादनासाठी आवश्यक ते बियाणे, खते, कीडनाशके, प्लॅस्टिक आच्छादन वा अन्य आवश्यक तंत्रज्ञान, मार्गदर्शन ती कंपनी पुरवणार असते.

ii) मांसासाठी कुक्कुटपालन व्यवसायात - एक दिवसाची पिले, खाद्य, औषधे कंपनीमार्फत पुरवली जातात.

काही उदाहरणे -

दुग्ध व्यवसाय ः

एखाद्या परिसरामध्ये दूध उत्पादन वाढवण्यासाठी सहकारी किंवा खासगी दूध संस्था प्रयत्नशील असते. या विभागामध्ये शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी तयार करतात. त्यासाठी या संभाव्य सभासदांना दुभती जनावरे घ्यावी लागतात. ती घेण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची आवश्यकता असते. या शेतकऱ्यांना भांडवलाचा पुरवठा करण्यासाठी ती सहकारी संस्था किंवा खासगी संस्था बॅंकेशी संपर्क साधते. आपल्या सभासदांना बँकेने भांडवल पुरवावे, यासाठी या व्यवसायातून उत्पादित होणाऱ्या दुधातून बँकेच्या कर्जाच्या वसुलीची हमी देतात. अशा वेळी बँक, दूध उत्पादन संस्था आणि शेतकरी यांच्यात करार केला जातो. त्यामध्ये कर्जदाराच्या कर्जाच्या परतफेडीची हमी बँकेला मिळते. दूध उत्पादक संस्थेला दूधपुरवठा वाढून त्यांची भरभराट होते. तर शेतकऱ्यालाही नव्या कृषिपूरक व्यवसायातून आर्थिक प्राप्तीचा मार्ग निर्माण होतो. या करारातील तीनही पक्षांचा फायदा होतो.

कुक्कुटपालन ः

मांसासाठी कुक्कुटपालन (ब्रॉयलर) करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांशी कोंबड्यासंदर्भात करार करतात. या करारामध्ये या कंपन्या एक दिवसाची पिल्ले देतात, खाद्य पुरवठा करतात, औषधोपचार पुरवितात, तसेच योग्य वाढ झालेल्या कोंबड्या वजन करून घेऊन जातात. ठरलेल्या कराराप्रमाणे त्याची रक्कम अदा केली जाते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेड बांधणी करून प्रत्येक बॅचच्या पक्ष्यांचे खाद्य, पाणी, औषधे यांचे व्यवस्थापन वेळच्या वेळी करणे अपेक्षित असते. शेतकऱ्यांना सुरुवातीला शेड बांधणी व त्यातील साहित्यांच्या खरेदीसाठी भांडवलाची आवश्यकता असते. त्यासाठी ते बॅंकेकडे कर्जाची मागणी करतात. या कर्जासाठी कंपनी कर्जफेडीची हमी बॅंकेला देऊ करते. तसा प्रत्येकाची जबाबदारी, कर्तव्ये ठरविली जातात. त्यानुसार बँक, कर्जदार आणि कंपनी अशा तिघांमध्ये त्रिपक्षीय करार होतो. बॅंकेला नवा कर्जदार ग्राहक व परतफेडीची हमी मिळते. शेतकऱ्याला भांडवल उपलब्ध होते. अशा प्रत्येक शेतकऱ्यासोबत कंपनीची वाढ व भरभराट होते.

त्रिपक्षीय कराराचे फायदे :

१) शेतकऱ्यासाठी ः

i) कराराप्रमाणे शेतीमालाची रक्कम मिळते. बाजारातील मागणी व दर काहीही असला तरी कराराप्रमाणे शेतीमालाची खरेदीची हमी व रक्कम मिळते.

ii) त्रिपक्षीय करारामुळे बँकेकडून कर्ज मिळणे सोपे होते.

iii) शेतकऱ्यांना शेतीमाल उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान, मार्गदर्शन मिळते.

iv) शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होते.

२. कंपनी आणि संस्थासाठी :

i) आवश्यक असणारा चांगल्या प्रतीचा शेतीमाल मिळतो.

ii) कच्चा माल शेतीमाल पुरवठा सुरळीत होतो.

३. बँकांसाठी ः

i) कर्जपुरवठा करणे सोपे होते.

ii) कर्ज वसुली १००% होण्याची हमी असते.

iii) बँकेचा कर्ज तपासणी, वसुली यावर होणारा वेळ आणि खर्च यात बचत.

iv) कृषी कर्जवाटपात वाढीमुळे बँकेचे प्राथमिकता क्षेत्राचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होते.

क्लस्टर कर्ज आणि त्रिपक्षीय करार

विभागनिहाय (क्लस्टर) कर्ज पुरवठा आणि त्याला त्रिपक्षीय कराराची जोड असेल तर बँकेच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे असते. कोणतीही कंपनी वैयक्तिकरीत्या कर्जदार शेतकऱ्याबरोबर करार करू शकते. मात्र क्लस्टरमध्ये एकत्रितरीत्या अनेक शेतकऱ्यांबरोबर करार केल्यास त्या विभागाचा विकास घडून येऊ शकतो. कंपनी/संस्था, शेतकरी - कर्जदार आणि बँक अशा सर्वांचाच फायदा होतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com