
Cotton Rate : देशातील बाजारात आज कापसाची आवक (Cotton Arrival) वाढली होती. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात (Cotton Rate) चढ उतार सुरुच आहेत. आजही बाजार दबावात होता. देशात कापूस दर वाढण्यास पोषक वातावरण आहे.
पण शेतकऱ्यांना दरवाढ देण्याची उद्योगांची मानसिकता दिसत नाही, असे शेतकरी सांगत आहेत. तर उद्योग जास्त दिवस कापूस दर जास्त दिवस दबावात ठेऊ शकत नाहीत, असे जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारात आज कापूस दरात सुधारणा दिसून आली. दोन दिवस कापूस दर किहीसे नरमले होते. मात्र आज दरात काहिशी वाढ झाल्यानं आवकही वाढली. काल देशभरात कापसाची १ लाख ३६ हजार गाठींची आवक झाली होती.
तर आज १ लाख ५६ हजार गाठींची आवक झाली होती. म्हणजेच आजची आवक २० हजार गाठींनी वाढली होती. महाराष्ट्रातील आवक आज सर्वाधिक ४५ हजार गाठींवर होती. त्यानंतर गुजरातमध्ये ४४ हजार गाठी कापूस झाली.
आज देशातील बाजारात कापसाला ७ हजार ९०० ते ८ हजार ४०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. पण अनेक बाजारांमधील किमान दर ७ हजारांपासून सुरु झाला. तर कमाल भाव ८ हजार ७५० रुपयांहोता.
वायद्यांचा विचार करता एमसीएक्सवर एप्रिलचे वायदे १४० रुपयांनी नरमले होते. एप्रिल डिलिवरीचे वायदे ६३ हजार ६४० रुपयांवर बंद झाले. तर जूनचे वायदे २२० रूपयांनी वाढून ६३ हजार ७८० रुपयांवर बंद झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सायंकाळपर्यंत वायदे नरमले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयसीईवरील वायदे ८१.७९ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर काॅटलूक एक इंडेक्स ९७.१० सेंट प्रतिपाऊंडवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चालू आठवड्यात नरमाई दिसली.
कापसामध्ये नफावसुली सुरु असल्याचे व्यापारी सांगत आहेत. वास्तविक पाहता यंदा जागतिक कापूस उत्पादन घटलं. तर चीनसह आयातदार देशांनी कापूस आयात सुरु केली. त्यामुळं बाजार टिकून राहणं अपेक्षित होतं. पण नफावसुलीमुळं दर दबावात असल्याचं जाणकार सांगत आहेत.
बाजारातील आवक कमीच
देशातही शेतकऱ्यांची परिक्षा पाहण्याचंच काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत निम्माही कापूस विकला नाही. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी जवळपास १ लाख ९६ हजार गाठी बाजारात आल्या होत्या. पण यंदा केवळ १ लाख ३२ हजार गाठी कापूस शेतकऱ्यांनी विकला.
शेतकऱ्यांनी बाजारात कमी कापूस आणल्यामुळं दर वाढतील असं वाटतं होतं. पण पुढे उद्योगांनी दर वाढवले नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांचाही धीर सुटताना दिसतोय.
बाजार दबावात का?
खरं तर या काळात कापसाला किमान ८ हजार ५०० रुपये दर असणं गरजेचं होतं. पण सध्या दरातही गरजेपुरता कापूस मिळतोय. त्यामुळं उद्योग दर वाढविण्यात रस दाखवत नाहीत. शेतकरी जास्त काळ कापूस ठेऊ शकत नाहीत, हे उद्योगांना माहीत आहे.
त्यामुळं शेतकऱ्यांना अपेक्षित दर देण्याची मानसिकता सध्यातरी दिसत नाही, अशी टिका शेतकऱ्यांनी केली.
दरवाढ होईल का?
शेतकऱ्यांनी कापसाची विक्री मर्यादीत ठेवल्यास बाजार टिकेल. उद्योगांच्या अंदाजप्रमाणं सध्याची १ लाख ५० हजार गाठींवर असलेली आवक २ लाख गाठींवर गेली की दर आणखी कमी केले जातील. शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत केली तशीच विक्री सुरु ठेवावी.
त्यामुळं दरात सुधारणाही शकते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कापसाचा किमान दर ८ हजार ५०० रुपयांपर्यंतही जाऊ शकतो. पण शेवटी बाजारातील घडामोडींवर सर्व अवलंबून आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.