Vegetables:भाजीपाला पीक पद्धतीतून युवकाने आणली समृद्धी

खांडगाव परिसरात प्रवरा नदीचे पाणी उपलब्ध होत असल्याने अनेक शेतकरी ऊसपीक (Sugarcane) घेतात. अलीकडील काळात काही शेतकऱ्यांनी बाजारपेठेची मागणी ओळखून भाजीपाला शेतीला (Vegetable Farming) प्राधान्य दिले आहे.
Vegetable Farming
Vegetable FarmingAgrowon

खांडगाव (ता. संगमनेर, जि. नगर) येथील संदीप गुंजाळ यांनी अनेक वर्षांचा अनुभव, अथक प्रयत्न व सातत्य यातून शेतीत समृद्धी आणली आहे. विविध हंगामांत विविध भाजीपाला (Vegetable Crops) पिकांची निवड व त्यांची उत्पादन- विक्री पद्धती तयार करून ती यशस्वी केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठीही ते मार्गदर्शक झाले आहेत.

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील काही भागांत पाण्याची उपलब्धता तर काही भागांत पाणीटंचाई असते. खांडगाव परिसरात प्रवरा नदीचे पाणी उपलब्ध होत असल्याने अनेक शेतकरी ऊसपीक (Sugarcane) घेतात. अलीकडील काळात काही शेतकऱ्यांनी बाजारपेठेची मागणी ओळखून भाजीपाला शेतीला (Vegetable Farming) प्राधान्य दिले आहे. गावातील संदीप व सुदर्शन या गुंजाळ बंधूंची वडिलोपार्जित नऊ एकर शेती आहे.

सुदर्शन नोकरीनिमित्त पुण्यात असतात. संदीप पूर्णवेळ शेती पाहतात. वडिलांचे आजारपण असल्याने संदीप यांनी वयाच्या १७ व्या वर्षी शेतीत लक्ष घातले. आई विमल, पत्नी जयश्री यांच्यासह सुदर्शन व त्यांची पत्नी दीपाली यांची मोठी मदत, चिकाटी, अथक प्रयत्न व सातत्यातून संदीप यांनी भाजीपाला शेतीत समृद्धी आणली आहे.

पीक पद्धती व व्यवस्थापन

गुंजाळ कुटुंब पूर्वी एक-दोन एकरांवर भाजीपाला उत्पादन घेत. संदीप यांनी टप्प्याटप्प्याने क्षेत्रात वाढ केली. पॉली मल्चिंग, ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला. सुमारे नऊ एकर शेती कराराने कसण्यासही घेतली आहे. दोन एकर ऊस, उर्वरित क्षेत्रावर भाजीपाला, फूल उत्पादन घेण्यात येते. सध्या चार एकर झेंडू, दोन एकर, टोमॅटो, १० एकर फ्लॉवर व दोन एकर काकडी आहे.

बाजारातील मागणीचा अभ्यास करून हंगामनिहाय पिकांची निवड होते. फेब्रुवारीत टोमॅटोची लागवड होते. पॉली मल्चिंगवर टोमॅटो त्यानंतर काकडी व त्यानंतर झेंडू अशी तीन सलग पिकेही घेतली आहेत. खरिपातच टोमॅटो पीकही घेण्यात येते. पाण्याची सर्वच भागात मेमध्ये टंचाई असते. फ्लॉवरची लागवड त्या काळात होते. काढणीच्या काळात त्याला चांगला दर मिळतो.

श्रावण, गणपती, दसरा आदी सणांच्या काळात फुलांना असलेल्या मागणीचा विचार करून जूनच्या दरम्यान दरवर्षी चार ते पाच एकरांवर कोलकता लाल व अन्य वाणाच्या झेंडूची लागवड होते. नोव्हेंबरपर्यंत तोडणी सुरू राहतो.

दरवर्षी आडवी व उभी नांगरणी करून पाच फुटी सरी पाडून शेणखताचा दरवर्षी एकरी चार ट्रॉलीपर्यंत वापर होतो. कोंबडी खताचाही वापर होतो. टोमॅटो पिकात आधार म्हणून डबल तारेचा मंडप करण्यात येतो. टोमॅटो काढणी झाल्यानंतर वेलवर्गीय भाजीपाल पिकांनाही त्याचा फायदा होतो. त्यासाठी वेगळे पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही.

पाण्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे असली तरी २०१९ मध्ये कृषी विभागाच्या मदतीने वीस गुंठे क्षेत्रावर एक कोटी लिटरचे शेततळे उंचवट्यावर घेतले आहे. सायफन पद्धतीने १५ एकर क्षेत्राला विना विद्युत पंप पाणी देणे त्यामुळे शक्य झाले. प्रवरा नदीवरून पाइपलाइन करून पाणी आणले आहे. भाजीपाला व फूलशेतीत मजूरबळ जास्त प्रमाणात लागते. कुटुंबातील सर्व सदस्य हा भार उचलतातच. शिवाय दररोजच्या कामांसाठी साधारण पंचवीस ते तीस मजूर कायमस्वरूपी असतात. त्यामुळे परिसरातील व्यक्तींना कायम रोजगार मिळाला आहे.

उत्पादन, उत्पन्न

सुधारित तंत्र व व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने ठेवून गुणवत्ता नेहमीच चांगली ठेवण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. सुमारे ७५ टक्के मालाची विक्री याच पद्धतीने होते. टोमॅटोचे एकरी ३५ ते ४० टन, फ्लॉवरचे १०, १५ ते २० टन तर काकडीचे १० ते १५ टन उत्पादन मिळते. झेंडूला प्रति किलो २५ ते ३५ रुपये, फ्लॉवरला १५, २० ते ३० , ३५ रुपयांपर्यंत, तर काकडीला २० ते ४० रुपये दर मिळतो. एका हंगामात झेंडूला किलोला १८० रुपयांपर्यंतही दर मिळाला होता. वर्षभरात भाजीपाला पीक पद्धतीतून काही लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्यापर्यंत गुंजाळ यांनी यश मिळवले आहे.

शेतकऱ्यांच्या भेटी, मार्गदर्शन

संदीप यांचा सुमारे पंधरा वर्षांहून अधिक काळ अनुभव पाहता शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात. उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, ‘आत्मा’चे समन्वयक वैभव कानडे, कृषी सहायक अर्चना आंबरे वीरेंद्र थोरात यांचे मार्गदर्शन संदीप यांना मिळते. दोन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीला भेट दिली आहे.

कीटकरोधक नेटचा प्रयोग

अकोले, संगमनेर तालुक्यात अलीकडील वर्षांत टोमॅटो पिकात कुकुंबर मोझॅक व अन्य विषाणूजन्य रोगांची समस्या शेतकऱ्यांना भेडसावते आहे. या पार्श्‍वभूमीवर एका बहुराष्ट्रीय कंपनीने संदीप यांच्या दहा गुंठे टोमॅटो क्षेत्रावर इन्सेक्ट नेट प्रूफ (कीटकरोधक नेट) उभारण्याचा प्रयोग यंदाच्या उन्हाळ्यात केला. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आढळले.

यंदाच्या उन्हाळ्यात ११ एकर टोमॅटो व तीन एकर कारले घेतले होते. विषाणूजन्य रोगामुळे टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. पण कारले पिकाचे उत्पादन चांगले मिळाले. शिवाय किलोला ४० ते ४५ रुपये दर मिळून मोठा आर्थिक आधार मिळाला.

संदीप गुंजाळ, ८००७४८९८२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com