
Jalgaon News : जगभरात महागाई व मंदीच्या संकटात कापूस पीक (Cotton Crop) सापडले आहे. प्रमुख कापूस उत्पादक देशांत पिकाला फटका बसला आहे. नव्या हंगामात लागवडीत (Cotton Cultivation) मोठी घट शक्य आहे. एकट्या भारतातील क्षेत्र १२९ लाख हेक्टरवरून १२१ ते १२२ लाख हेक्टरवर येऊ शकते, असाही जाणकारांचा अंदाज आहे.
मागील दोन हंगामांत कापूस पिकाची स्थिती बरी होती. पण यंदा या पिकाने शेतकऱ्यांना अडचणीत आणले. अर्थात, पिकाचा उत्पादन खर्च वाढला. एक क्विंटल कापूस घरात आणण्यासाठी भारतात कमाल पाच हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागले.
खर्च वजा करून नफा सध्याच्या दरानुसार हवा तसा हाती राहत नाही. देशात नव्या म्हणजेच २०२३-२४ च्या हंगामात कापूस लागवड सुरू होऊनही स्थिती सुधारलीच नाही.
यामुळे लागवडीत मोठी घट शक्य आहे. त्यातच पाऊस सरासरीएवढा राहील, असे म्हटले आहे. गुलाबी बोंड अळीला अटकाव करणारे गुणवत्तापूर्ण वाण शेतकऱ्यांच्या हाती आलेले नाही. याचा परिणाम कापूस लागवडीवर यंदा होईल.
उत्तर भारतात म्हणजेच हरियाना, पंजाब व राजस्थानात कापूस लागवड सुरू झाली आहे. या भागात भाकरा सिंचन प्रकल्पाचा आधार आहे. ९५ टक्के कापसाखालील क्षेत्राला पाणी उपलब्ध होते.
उत्तर भारतात हरियाना व पंजाबमध्ये मिळून १० ते ११ लाख हेक्टरवर कापूस लागवड केली जाते. तर राजस्थानसह पंजाब, हरियानात एकूण लागवड १४ ते साडेचौदा लाख हेक्टरवर असते. परंतु हरियानात भाकरा प्रकल्पातून कापूस लागवडीसंबंधी हरियानात अनेकांना पाणी मिळालेले नाही.
यातच शेतकरी वाढत्या खर्चाने या भागात कापूस लागवड कमी करण्याच्या भूमिकेत आहेत. या भागातील कापसाखालील क्षेत्र अडीच ते तीन लाख हेक्टरने कमी होऊ शकते, असा अंदाज आहे. तेथे कापसाऐवजी तेलबिया पिकांचा पर्याय शेतकरी शोधत आहेत.
खानदेशात यंदा कापसाखाली क्षेत्र नऊ लाख हेक्टर एवढे असते. खानदेशातही जळगाव जिल्ह्यातील लागवड देशात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच पाच लाख ६५ ते पाच लाख ७० हजार हेक्टरवर असते.
२०२२-२३ मध्ये जळगाव जिल्ह्यात पाच लाख ६७ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यात सुमारे ८० हजार हेक्टर एवढे क्षेत्र ओलिताखाली किंवा पूर्वहंगामी कापसाखाली होते.
यंदा पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र कमी होईल. जळगाव जिल्ह्यातील लागवड २० ते २१ हजार हेक्टरने कमी होईल, असा अंदाज नुकताच शासनाच्या कृषी विभागाने व्यक्त केला.
महाराष्ट्रातील लागवड ४२.६८ लाख हेक्टरवरून ४१ लाख हेक्टरवर येऊ शकते. गुजरातमध्येही लागवड दोन ते अडीच लाख हेक्टरने कमी होईल व क्षेत्र २३ ते २४ लाख हेक्टरवर स्थिरावेल.
तेलंगणातील लागवडदेखील ६० ते ७० हजार हेक्टरने घटून १६ लाख हेक्टरवर येऊ शकते, असे संकेत आहेत. देशात प्रमुख कापूस उत्पादक राज्ये अर्थात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा व उत्तर भारतात क्षेत्र घटणार असल्याने कापूस उत्पादनासही त्याचा थेट फटका बसेल.
अमेरिकेतील लागवड घटली
अमेरिकेतील लागवड पूर्ण झाली आहे. तेथे टेक्सासमध्ये लागवड अधिक घटली आहे. अमेरिकेतील एकूण लागवड ४२ लाख हेक्टरवरून ३९ लाख हेक्टरवर खाली आली आहे.
अमेरिकेची उत्पादकता ९०० किलो रुई प्रतिहेक्टरी आहे. शिवाय नैसर्गिक समस्यांमुळे अमेरिकेतून २५ ते ३० लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन कमी येईल.
मागील दोन हंगाम अमेरिकेतून अपेक्षित म्हणजेच २५० लाख गाठी आलेले नाही. तेथील उत्पादन जेमतेम २०० लाख गाठींपर्यंतच पोचत आहे. त्यात पुढे (२०२३-२४) मध्ये आणखी घट येईल, हे निश्चित आहे.
पाकिस्तान, चीन सरासरीएवढेच
पाकिस्तानात पंजाब भागात कापूस लागवड पूर्ण झाली आहे. तेथे एकूण लागवड २४ लाख हेक्टरवर आहे. तेथे २०२३-२४ मध्ये १२५ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे.
चीनमध्ये सरकारी धोरणामुळे लागवडीत वाढ शक्य नाही. तेथील लागवड ३३ लाख हेक्टरवर स्थिरावेल आणि तेथे ३४९ लाख गाठींचे उत्पादन हाती येऊ शकते,
असा अंदाज आहे. तसेच ब्राझीलमधील कापूस लागवड काहीशी कमी होऊन ११ ते साडेअकरा लाख हेक्टरवर येईल. ५० ते ५२ लाख गाठींचे उत्पादन तेथे शक्य आहे. ऑस्ट्रेलियाची कापूस लागवड सुमारे अडीच लाख हेक्टरवर राहील.
तेथे लांब धाग्याच्या किंवा ३१ मिलिमीटर लांब धाग्याच्या कापूस वाणांची कमाल क्षेत्रात लागवड केली जाते. ऑस्ट्रेलियाची कापूस उत्पादकता १२०० किलो रुई प्रतिहेक्टरी राहील, अशी माहिती आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.