
Banana Market Update : खानदेशात कमी दरात केळी खरेदीचा (Banana Procurement) प्रकार मागील पाच ते सात दिवसांपासून सुरू झाला आहे. जे दर जाहीर होत आहेत, त्यापेक्षा निम्म्या दरात खरेदी अनेक भागांत केली जात आहे.
केळीच्या दरांवर (Banana Rate) मागील काही दिवसांपासून दबाव तयार झाला आहे. मध्य प्रदेश, गुजरात व इतर भागांत केळीची काढणी सुरू झाली आहे. खानदेशातही आवक वाढली आहे.
केळीचे दर रावेर (जि. जळगाव) बाजार समिती जाहीर करते. सध्या बाजार समितीकडून किमान १९५० ते २०५० आणि कमाल २१५० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीच्या दर्जानुसार जाहीर केला जात आहे.
रावेर बाजार समितीमधील केळी दरांच्या आधाराने खानदेशात केळीची खरेदी केली जाते. याच दरांचे अनुकरण धुळे, नंदुरबारात केले जाते.
परंतु काही खरेदीदार नफेखोरी करीत आहेत. अनेक दिवस केळीची खरेदी टाळली जाते. यानंतर कमी दरात खरेदीची तयारी दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.
दर्जेदार केळी खानदेशात सध्या उपलब्ध होत आहे. २१०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल या दरातील केळीची १२५० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी केली जात आहे.
खानदेशात केळीची बाजार समित्यांत खरेदी अपवादानेच होते. ९९ टक्के केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते.
ही खरेदी करणारी मंडळी मध्य प्रदेश, रावेर, यावल, चोपडा, पाचोरा आदी भागांतील असतात. अनेक एजंट त्यासाठी खरेदीदार नेमतात.
या खरेदीदारांकडून बाजार समित्या सुरक्षा अनामत, परवाना घेत नाहीत. अनेक खरेदीदार विनापरवाना खरेदी करीत आहेत. कुठेही बाजार समित्या चौकशी, तपासणी करीत नाहीत.
फसवणुकीचा प्रकार
चोपडा (जि. जळगाव) तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या १६ टन केळीची खरेदी रावेर भागातील एजंटच्या मदतीने एका व्यापाऱ्याने केली. त्या वेळेस दर २८५० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला होता.
परंतु केळीचा ट्रक संबंधित खरेदीदाराकडे पोहोचलाच नाही. ट्रक घेऊन चालक पसार झाला. याबाबत चौकशी सुरू आहे.
पण शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. याबाबत बाजार समित्या काहीएक चौकशी करीत नाहीत किंवा शेतकऱ्यांना मदत करीत नाहीत, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.