
Amravati News : कापसाच्या हंगामाची उलंगवाडी होत आली असतानाही बाजारातील दरांमधील चढ-उताराने शेतकरी संभ्रमित आहेत. बाजारात चढ-उचार असला तरी कापसाचे दर सध्या सात ते साडेसात हजारांवर स्थिरावले आहेत.
गेल्या आठवड्यात कापूसदरात थोडी सुधारणा झाल्याने आवक वाढली होती. शेतकऱ्यांकडे सध्या किती कापूस शिल्लक असेल याचा अंदाज व्यापारी घेत असून, भाव वाढण्याची शक्यता मात्र धुसर आहे.
अमरावतीच्या बाजारात सोमवारी (ता. १५) कापसाला ७६०० ते ७७०० प्रतिक्विंटल भाव मिळाला. राज्यात या वर्षी सुमारे ७८ लाख क्विंटल कापसाच्या उत्पादनाचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने वर्तविला होता. त्यात आता घट झाली असल्याने शेतकऱ्यांकडील कापूस संपत आल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
दरवाढीची अपेक्षा ठेवून असणारे मात्र आता अधिक काळ कापूस न ठेवता कापूस विकू लागले आहेत. येत्या दोन ते तीन आठवड्यांत बाजारात मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
मार्चमध्ये कापसाचे दर दबावात होते. पर्याय नसलेल्या शेतकऱ्यांनी मार्चमध्ये कापूस विकला, पण अधिक काळ शेतकरी थांबू शकत नाहीत, हे हेरून व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पडते ठेवले.
शेतकऱ्यांनीही बाजारात अंदाज घेत भाववाढीची शक्यता दिसत नसल्याने विक्री केली. साठवणुकीची क्षमता असणारे शेतकरी भाव वाढल्याशिवाय विक्री करणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी भाव वाढवले. अजूनही शेतकऱ्यांकडे २० ते २५ टक्के कापूस असल्याचा अंदाज आहे.
गतवर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ९५०० हजार रुपयांच्या आसपास भाव मिळाला. काही ठिकाणी १० हजारांवरही भाव गेलेत. यंदा मात्र कापसाला या भावाची झळाळी मिळाली नाही.
सर्वच बाजारात सरासरी आठ हजार रुपये दर राहिल्याने आता दरवाढीची शक्यता फार कमी आहे. सध्या तर हा दर सात ते साडेसात हजारांवर आला आहे. आगामी खरीप हंगाम जवळ आला असल्याने शेतकरी ठेवलेला कापूस बाजारात आणतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.