
पुणे ः राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात (Cotton Sowing) किंचित वाढ झालेली आहे. मात्र बेकायदेशीर बियाण्यांमुळे (Illegal Seed) बियाणे उद्योगातील (Seed Industry) दर्जेदार कंपन्यांच्या बियाणे विक्रीत (Seed Sale) अपेक्षित वाढ झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बियाणे कंपन्यांकडून यंदा खरिपात बीटी कपाशी बियाण्यांची (BT Cotton Seed) २.३८ कोटी पाकिटे पुरवण्याचे नियोजन केले गेले होते. प्रत्यक्षात पुरवठा १.६० कोटी पाकिटांपर्यंत झालेला आहे. त्यातही पुन्हा विक्री ६५ लाख पाकिटांपर्यंत झालेली होती. ‘‘अनेक कंपन्यांकडून विक्रीचे अहवाल उशिरा येतात. त्यामुळे विक्रीचा आकडा कमी दिसतो. परंतु यंदा अपेक्षेप्रमाणे जादा विक्री झालेली नाही. अनधिकृत बियाणे बाजारात आमच्या पुरवठ्यापूर्वीच पोचलेले होते,’’ असे एका बियाणे कंपनीच्या संचालकाने सांगितले.
खासगी कंपन्यांकडून यंदाच्या खरिपासाठी कपाशी बियाण्यांचा ९८ हजार ४७८ क्विंटलपर्यंत पुरवठा अपेक्षित होता. मात्र इच्छा असूनही कंपन्यांना जादा बियाणे विकता आलेले नाही. ‘‘खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीपासून बाजारात कपाशीचे भाव तेजीत होते. त्यामुळे शेतकरी कपाशीला जास्त पसंती देत होते. मात्र कृषी विभागाने एक जूननंतर बियाणे विक्रीला परवानगी दिली देण्याचे घोषित केले. त्यामुळे जवळपास तीन आठवडे वाया जाणार असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी परराज्यांतून तसेच खासगी एजंटांकडून बियाणे मिळवले. त्यात पुन्हा अनधिकृत एचटीबीटी, फोर-जी अशा बियाण्यांचाही सुळसुळाट झाला. त्यामुळे कंपन्यांच्या अधिकृत बियाणे विक्रीवर प्रतिकूल परिणाम झाला,’’ अशी माहिती बियाणे उद्योगातून देण्यात आली.
बीटी कापूस बियाण्यांच्या किमतीदेखील यंदा वाढल्या होत्या. पूर्वी ७६७ रुपयांना मिळणारे ४७५ ग्रॅमचे बियाणे पाकिट यंदा ८१० रुपये झाले. अर्थात, काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना ५५० ते ६५० रुपये दरानेदेखील बियाणे विकले. मात्र किमती कमी करूनसुद्धा कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ झालेली नाही. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांनी यंदा योग्य वेळेत कपाशीचा पेरा केला असून बियाणे विक्रीदेखील अपेक्षित पद्धतीनेच झालेली आहे. उलट काही भागांमध्ये सोयाबीनला प्राधान्य दिल्यामुळे तेथे कपाशीचा पेरा कमी दिसतो आहे. मात्र, कपाशीच्या मुख्य लागवड पट्ट्यांमध्ये एकूण लागवडीत ५ ते १० टक्के वाढ झालेली आहे.
कपाशीचा पेरा ३९ लाख हेक्टरच्या पुढे
खरिपाच्या पेरण्या राज्यभर अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. कपाशीचा यंदाचा पेरा ४२ लाख हेक्टरवर जाईल, असा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, १८ जुलैअखेर ३९.४१ लाख हेक्टरच्या पुढे गेलेला होता. अद्याप पेरणीचा अंतिम अहवाल आलेला नाही. गेल्या हंगामात अंतिम पेरा एकूण ३९.५४ लाख हेक्टरवर झालेला होता. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांनी देशाच्या जिनिंग प्रेसिंग उद्योगाला ७१.१२ लाख गाठी (एक गाठ प्रति १७० किलो) कापूस पुरवला होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.