
Cotton Market Update : कापूस हंगाम अखेरच्या टप्प्यावर असताना कापूस बाजारात सध्या चढ -उतार सुरू असला, तरी तो ७५०० रुपयांच्या सरासरीवर स्थिरावला आहे. गेल्या आठवड्यात कापूसदरांमध्ये थोडी सुधारणा झाल्याने बाजारातील आवक थोडी वाढली होती.
आता शेतकऱ्यांकडे किती कापूस शिल्लक आहे याचा अंदाज व्यापारी घेत असून, भाव वाढण्याची शक्यता थोडी धूसर झाली आहे. दरम्यान, हिंगणघाट बाजार समितीत ७००० ते ७५०० रुपये प्रतिक्विंटल दर कापसाला मिळाला आहे.
राज्यात यंदा ७८ लाख कापूस गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने वर्तविला आहे. गेल्या महिन्यात ८० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. त्यात आता घट झाली आहे. त्यातून आता शेतकऱ्यांकडील कापूस संपत आल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
दरवाढीची अपेक्षा असणारे, मात्र जास्त दिवस थांबू न शकणारे शेतकरी कापूस विकत आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यांत शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस आणतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. मार्च महिन्यात कापसाचे दर दबावात होते.
कापूस विकल्याशिवाय पर्याय नसलेल्या शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत कापूस विकला, पण शेतकरी जास्त दिवस थांबू शकत नाहीत, हे माहीत असल्याने व्यापाऱ्यांनी बाजारात दर पडते ठेवले. शेतकऱ्यांनीही दर वाढत नाहीत हे दिसू लागल्याने विक्री वाढविली.
पण साठवणूक क्षमता असलेले शेतकरी दरवाढ केल्याशिवाय कापूस विकणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर भाव वाढवण्यात आले. सध्याही शेतकऱ्यांकडे २० ते २५ टक्के कापूस शिल्लक असल्याचा अंदाज आहे.
गेल्या वर्षी मार्च व एप्रिलमध्ये कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ९,३०० रुपये भाव मिळाला होता. काही ठिकाणी तर हे दर १० हजारांवर गेले. यंदा कापसाला तो भाव अजूनही मिळालेला नाही.
या वर्षी ती अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण दरात होत असलेला चढ-उतार त्यांना संभ्रमित करणारा ठरू लागला आहे.
आता ८ हजार रुपयांच्या सरासरीतच सर्व बाजारपेठेत दर असल्याने आगामी काळात त्यात वाढ होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे आगामी खरीप हंगाम बघता साठवून ठेवलेला कापूस बाजारात येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.