
Onion Market Update नाशिक : चालूवर्षी लेट खरीप कांद्याला (Let Kharif Onion) गेल्या दीड महिन्यांपासून उत्पादन खर्चाच्या खाली दर (Onion Rate) मिळत आहेत. अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली.
अशातच मार्चच्या दुसऱ्या सप्ताहात जिल्ह्यात काही बाजार समित्यांमध्ये नवीन रब्बी उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे.
लेट खरीपच्या तुलनेत उन्हाळ कांद्याला २०० ते २५० रुपये अधिक दर मिळत आहे. असे असले तरी मागील वर्षाच्या तुलनेत मिळणारे दर कमी असल्याची स्थिती आहे. त्यामुळे लेट खरीप कांद्यानंतर उन्हाळ कांद्याच्याही दरात कोंडी झाल्याची स्थिती सुरुवातीलाच पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात किरकोळ आवक सुरू झाली असून ती हळूहळू वाढत असल्याची स्थिती आहे. त्यानुसार सोमवारी (ता. १३) कांद्याला कमाल १,४५६ तर किमान ५००, सरासरी १,००० रुपये दर मिळाला.
कांद्याला जवळपास १,५०० रुपये प्रति क्विंटल खर्च येत असताना नवीन कांद्याला मिळणारा हा दरही उत्पादन खर्चाच्या खाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
चालू वर्षी लेट खरीप हंगामात कांद्याची लागवड केलेली कमी झाली आहे. तर उन्हाळ कांद्याची लागवड वाढल्याची स्थिती आहे.
कसमादे भागात प्रामुख्याने शेतकऱ्यांनी आगाप लागवडी केल्या होत्या. त्या काढणीयोग्य होऊन काही शेतकरी आर्थिक गरजेपोटी नवा माल बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.
त्यामध्ये पिंपळगाव बसवंत, सटाणा, लासलगाव, कळवण, चांदवड व उमराणे बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक सुरू झाली आहे. मात्र दराने सुरुवातीलाच शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निराशा केली आहे.
लेट खरीप रांगडा कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची टिकवणक्षमता अधिक असते. मात्र असे असतानाही दरात फटका बसत असल्याने शेतकरी नाराज आहेत. यंदा उन्हाळ कांद्याच्या लागवडीमध्ये झालेला खर्च अधिक आहे.
एकरी लागवडीला जवळपास १४ हजार रुपये शेतकऱ्यांनी मोजले, तर खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्च हा एक लाखांवर पोहोचलेला आहे.
लेट खरीपच्या तुलनेत निर्यातीत उन्हाळी मालाला मागणी आहे. मात्र म्हणावा तसा उठाव नाही. अनेक राज्यात स्थानिक माल उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील एक दोन महिने चित्र असेच राहील.
- खंडुकाका देवरे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन.
बाजारात येणाऱ्या नव्या उन्हाळ कांद्याची गुणवत्ता चांगली आहे. त्यानुसार चांगला दरही मिळत आहे. मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा दर कमीच आहे. हा चांगला कांदा सध्या निर्यातीसाठी बाहेर जात आहे.
- मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक.
वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर काहीच नाही. उत्पादन खर्चावरील रास्त भावासाठी दीर्घकालीन धोरण राबविणे गरजेचे आहे. केंद्र, राज्य सरकारने समन्वय ठेवणारी यंत्रणा निर्माण करावी.
- पंडीत वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण.
बाजार समितीत होणारी आवक (ता. १३ अखेर)
बाजार समिती आवक किमान कमाल सरासरी
पिंपळगाव बसवंत ८४७ ७०० १,४५६ ११५०
लासलगाव ५०० ७०० १,२२६ ९५०
सटाणा १२१० ६५० १,३०५ १,०५०
चांदवड १५० ६०१ १,३२१ १,१५०
कळवण ७५० ९०० १,३०० १,१००
उमराणे २०० ५०० ९०० ७००
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.