Turmeric : हळदीच्या वायद्यांवर बंदी नकोच !

मागील वर्षी सोयाबीन, कापूस, मोहरी, तूर, हरभरा या शेतीमालाच्या बाबतीत हा अनुभव आलाय. आता हळदीच्या वायदेबंदीची मागणी होतेय. अन् आश्चर्य म्हणजे ही मागणी करताना शेतकरी हिताचं कारण दिलं जातंय.
Turmeric
TurmericAgrowon

पुणेः आस्मानी संकटातून कसबसं पीक हाती आलं आणि त्या पिकाला चांगला दर (Turmeric Rate) मिळत असल्यास सुल्तानी संकट सुरु होतात. मागील वर्षी सोयाबीन (soybean), कापूस (Cotton), मोहरी (Mustard), तूर, हरभरा या शेतीमालाच्या बाबतीत हा अनुभव आलाय. आता हळदीच्या वायदेबंदीची (Turmeric Future Ban) मागणी होतेय. अन् आश्चर्य म्हणजे ही मागणी करताना शेतकरी हिताचं कारण दिलं जातंय.

बाजारात कमी दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत असतो. त्यातच बदलत्या वातावरणामुळं उत्पादन घटतंय. हाती आलेल्या तुटपुंज्या मालाला तरी चांगला दर मिळावा हीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते. मात्र शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडले की लगेच व्यापारी आणि उद्योग पातळीवर लाॅबिंग सुरु होतं. सरकारही ग्राहक कल्याणाच्या नावाखाली शेतकरीविरोधी निर्णय घेतं. मागीलवर्षी सरकारनं सोयाबीन, हरभरा, तूर, मोहरी आदी शेतीमालाच्या वायद्यांवर याच कारणांमुळं बंदी आणली. सोयाबीनवर बंदी असल्यानं शेतकऱ्यांना दराची माहिती मिळत नाही. त्यामुळं व्यापारी मागतील त्या भावात सध्या सोयाबीन विकलं जातंय.

आता हळदीच्या बाबतीतही तोच कित्ता गिरवला जातोय. नेहमीप्रमाणं आताही शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं सांगितलं जातं. मात्र शेतकऱ्यांच्या हिताची टिमकी वाजवली जात असली तरी प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्यांना सोयीस्कर लुटता यावं, यासाठीचं वायदेबंदीची मागणी केली जातेय, अशी प्रतिक्रियाही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

Turmeric
Turmeric : देशात हळदीच्या क्षेत्रात ३३ हजार हेक्टरने वाढ

हळदीच्या वायद्यांमध्ये मोजकेच व्यापारी आणि कंपन्या काम करतात, असा दावा मराठवाडा विदर्भ हळद व्यापारी असोसिएननं केलाय. शेतकरी या वायदे बाजारामध्ये खरेदी-विक्रीचा व्यापार करत नाहीत. म्हणजेच या वायद्यांचा फायदा एक विशिष्ट वर्गाला होतो. त्यामुळं हळदीच्या वायद्यांवर बंदी आणावी, अशी मागणी या असोसिएशननं केलीये.

Turmeric
Turmeric : हळदीची झळाळी वाढणार की मंदावणार?

हळदीच्या वायद्यांमुळं शेतकऱ्याचं नुकसान होतंय, हे सुध्दा खोटं असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. वायद्यांमुळं शेतकऱ्यांना पुढील काळात काय दर राहू शकतात, याची कल्पना येते. गावांमध्ये व्यापारी हळद खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या दारात जातात. तेव्हा व्यापारी देत असलेल्या दरात हळद द्यायची की नाही हे शेतकरी वायद्यांमधील दरांवरू ठरवतो. विक्रीचे नियोजन असलेल्या काळात वायद्याचे दर कमी असतील तर शेतकरी व्यापाऱ्याला हळद देईल. याउलट त्या काळातील वायद्यातील दर जास्त असतील तर हळद देणार नाही. चांगले नियोजन केले तर वायद्यांमधून शेतकऱ्यांना चांगला दर मिळवता येतो, असं परभणी येथील सुर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड यांनी सांगितलं.

तसं पाहीलं तर वायद्यांचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापारीच जास्त घेतात, असंही शेतकऱ्यांनी सांगितलं. मात्र एखाद्या वेळी व्यवहार तोट्यात जायला लागला किंवा कमी दरात शेतकरी माल द्यायला तयार नसला की वायदेबंदीची मागणी केली जाते. वायद्यांमध्ये कमी दर असेल तेव्हा व्यापारी तेथून खरेदी करतात. मात्र वायद्यांमध्ये दर वाढले आणि बाजारही वाढला की वायदेबंद करण्यासाठी लाॅबींग केले जाते, असं शेतकऱ्यांनी सांगितलं. शेतकरी आता वायद्यांचा अभ्यास करायला लागला. बाजारात व्यापाऱ्यांना वायद्यांचा दर सांगत चांगला दर मागू लागला. त्यामुळं व्यापाऱ्यांना वायदे नको आहेत, असं वाशीम येथील परिवर्तन ऑरगॅनीक फार्मर्स प्रोडूसर्स कंपनीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढेकडे यांनी सांगितलं.

त्यामुळं हळदीच्या वायद्यांमुळं शेतकऱ्यांना नुकसान होतंय, हे व्यापारी असोसिएशनचं म्हणणं चुकीचं आहे. वायद्यांमधून शेतकऱ्यांना दराची माहिती मिळते. यामुळं शेतकरी विक्रीचं नियोजन करू शकतात. वायद्यांमधून दर कमी जास्त केले जाते, असं व्यापाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी तेथे व्यवहार करावा. व्यापाऱ्यांनी वायदेबंदीची मागणी करण्याऐवजी वायद्यांतून कमी दर असेल तेव्हा खरेदी करावा. मात्र शेतकऱ्यांचं नाव पुढे करून शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं काम करु नये, असा सल्लाही शेतकऱ्यांनी दिलाय.

एनसीडीईएक्स या एक्सचेंज प्लॅटफाॅर्मवर शेतमालाचे वायदे हे चोख नियमानुसार चालतात. तसेच एक्सचेंजवर हळदीचे वायदे व्यापक आणि मूल्यसाखळीतील सर्वच घटकांच्या मोठ्या सहभागाने चालतात. एनसीडीईएक्सवर सर्वांना पुरेशा व्यवहारासह किमतीची माहिती मिळते. आपली किंमत निश्चित करण्यासाठी सर्व घटकांना सक्रिय आणि पारदर्शक मार्केट एनसीडीईएक्सने उपलब्ध करून दिले आहे.

- कपील देव, मुख्य व्यवसाय अधिकारी, एनसीडीईएक्स

एनसीडीईएक्सच्या वायद्यांमध्ये मोजके व्यापारी सट्टेबाजी करतात. सकाळीच्या सत्रात असलेल्या दरात मोठी वाढ किंवा घट केली जाते. त्यामुळं प्रत्यक्ष बाजारात व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना अडचणी येतात. तसेच एनसीडीईएक्सच्या गोदामांमध्ये ओळखीच्या व्यापाऱ्यांचा कमी गुणवत्तेचाही माल स्विकारला जातो. सामान्य व्यापाऱ्यांचा मात्र चांगल्या गुणवत्तेचाही माल नाकारला जातो.

- गजानन घुगे, अध्यक्ष, मराठवाडा विदर्भ हळद व्यापारी असोसिएशन, हिंगोली

वायद्यांतील दर पाहून शेतकरी चांगल्या दरासाठी व्यापाऱ्यांशी भांडू शकतो. वायद्यांतील भाव माहीत पडल्यास शेतकरी कमी दरात व्यापाऱ्यांना माल देत नाही. हेच मुळात वायदेबंदीच्या मागणीचं कारण आहे. प्रत्यक्षात वायद्यांचा व्यापाऱ्यांनाच अधिक फायदा होतो. मात्र शेतकऱ्यांना फायदा व्हायला लागला की लगेच बंदीची आरोळी ठोकली जाते. सरकरानं कोणत्याही शेतीमालाच्या वायद्यांवर बंदी घालू नये.

- ज्ञानेश्वर ढेकडे, अध्यक्ष, परिवर्तन ऑरगॅनीक फार्मर्स प्रोडूसर्स कंपनी, वाशीम

शेतकरी वायद्यांमध्ये व्यवहार करून फायदा मिळवू शकतात. मात्र शेतकऱ्यांसाठी गुणवत्तेचे निकष शिथिल करणं गरजेचं आहे. मात्र वायदे पूर्णपणे बंद करण्याची मागणी योग्य नाही. एनसीडीईएक्सनं शेतीमालाचे वायदे शेतकऱ्यांसाठी सुकर कसे होतील याकडं लक्ष द्यावं.

- प्रल्हाद बोरगड, अध्यक्ष, सुर्या शेतकरी उत्पादक कंपनी, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com