Turmeric Market : हळदीचे दर घसरल्याने उत्पादक मोठ्या संकटात

हमखास उत्पादन व उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून गेल्या काही वर्षांत या भागात विस्तारलेली हळद यंदा उत्पादकांना रडवत आहे. हळदीला गेल्या काही वर्षांतील नीचांकी दर तसेच वादळी पावसाने नुकसान झाले.
Turmeric Processing
Turmeric ProcessingAgrowon

Akola News हमखास उत्पादन व उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून गेल्या काही वर्षांत या भागात विस्तारलेली हळद यंदा उत्पादकांना (Turmeric Producer) रडवत आहे. हळदीला गेल्या काही वर्षांतील नीचांकी दर तसेच वादळी पावसाने नुकसान झाले. त्यामुळे अनेकांना उत्पादन खर्चही भागविणे अवघड झाले आहे. याचा परिणाम येत्या हंगामात लागवडीवर होईल, असे शेतकरी सांगत आहेत.

दरवर्षी खरीप हंगामात पर्यायी पीक म्हणून हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. मागील काही वर्षे दरही समाधानकारक मिळत होते. उत्पादनातही सातत्य राहिल्याने शेतकरी इतर पिकांसोबतच हळद लागवडीकडे वळत होते. वऱ्हाडातील वाशीम जिल्हा हळद लागवडीत विदर्भात अग्रेसर झाला.

Turmeric Processing
Turmeric Cultivation : राज्यात हळदीची १५ टक्के लागवड

अकोला, बुलडाणा जिल्ह्यांमध्येही या पिकाची लागवड केली जाते. यंदाच्या वर्षात हळद पिकाला मागील दोन महिन्यांतील वादळी पावसाचा फटका बसला. पीक काढणीला आले तेव्हा पाऊस झाला.

काही शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात हळदीची काढणी सुरू केली. त्याच काळात पाऊस झाला. यामुळे हळदीला वाळवता आलेले नाही. परिणामी, काहींची हळद खराब झाली. कुठे बुरशी लागण्याचेही प्रकार झाले आहेत.

Turmeric Processing
Turmeric Cultivation : लागवडीसाठी हळदीच्या योग्य जाती कोणत्या?

चार वर्षांतील नीचांकी दर

हळदीला मागील चार वर्षांतील नीचांकी दर सध्या मिळत आहे. पाच हजारांपासून ते साडे सहा हजारांदरम्यान विक्री होत आहे. बहुतांश माल हा सहा हजारांच्या आतच विकला जात आहे. यंदा हळदीचा उतारा काही भागांत १५ क्विंटलपासून २५ क्विंटलदरम्यान लागला.

मात्र तयार झालेली हळद उकळल्यानंतर वाळवणे न जमल्याने प्रचंड नुकसान झेलावे लागले. मालाचा दर्जासुद्धा खालावला. यामुळे बाजारात ही हळद कमी दराने विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

यंदा क्षेत्र घटीची चिन्हे

कमी दर, निसर्गाचा फटका पाहता यावर्षी हळदीची लागवड किमान २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी हळदीचे बेणे मोडून टाकले. पुढील हंगामात लागवडच करायची नसल्याने काहींनी बाजूला ठेवलेले बेणेही उकळून घेतले.

हळद काढणीवेळेस पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. सध्या बाजारात सरासरी साडेपाच हजारांपासून भाव मिळत आहे. या वर्षी आधीच पीक शेतातच खराब झाले. नुकसानाचे प्रमाण खूपच वाढले आहे. याचा विचार करता लागवडीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
- डॉ. गजानन ढवळे, हळद उत्पादक, शिरपूर जैन, जि. वाशीम
शिरपूर येथे हळदीचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी पुरते मेटाकुटीस आले आहेत. ऐन काढणीवेळी वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्पादनात घट आली. त्यातच बाजाराने हळदीचा आजवरचा निच्चांकी दर गाठल्याने पुढील वर्षी हळद लागवड क्षेत्रामध्ये घट येईल.
- महिंद्र काळे, हळद उत्पादक,शिरपूर जैन, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com