
Grape Market News औरंगाबाद : जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील द्राक्ष आगारात (Grape Hub) दराला थंडीमुळे (Cold) उठाव नसल्याची स्थिती आहे. महाशिवरात्री आधी ३५ ते ४० रुपये प्रति किलो असणारे दर (Grape Rate) आता २० ते ३० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरूडी, बोरखेडी आदी शिवारांत मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सटाणा, दरकवाडी, पळशी परिसरातही द्राक्ष बागांचा विस्तार आहे.
जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारात एरवी २५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या छाटण्या यंदा जवळपास ५ डिसेंबरपर्यंत चालल्या. पहिल्या टप्प्यात अर्ली छाटण्या २५ टक्के, ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत जवळपास ६० टक्के तर त्यानंतर ५ डिसेंबरपर्यंत जवळपास ३० टक्के झाल्या.
एकूण भागांपैकी जवळपास ४० ते ५० टक्के बागा हातच्या गेल्या. दरम्यान जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारातील काळ्या द्राक्षाला जानेवारीच्या मध्यात १२६ रुपये प्रति किलो तर इतर द्राक्षांना ४५ ते ६५ रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत होते.
ते आता २० ते ३२ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. डाऊनी, भुरी, घडकुज आदी आक्रमण द्राक्ष बागांवर झाल्याने खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला.
अनेक भागांतील बागा फेल गेल्याने उत्पादनात घट येते आहे. परंतु आपल्या भागातील द्राक्षाची मागणी असलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांत तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप थंडी कायम असल्याने द्राक्षाच्या मागणीत वाढ होत नसल्याची स्थिती आहे.
त्याचा थेट परिणाम दरावर होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एरवी बांगलादेश व अरब राज्यात द्राक्ष पाठवणारे व्यापारी त्या देशातील मागणी फारशी नसल्याने तिकडे द्राक्ष पाठवावी की नाही, या विवंचनेत आहेत.
त्याचाही परिणाम दरावर झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. महाशिवरात्रीनंतर तर काही दिवस व्यापारी द्राक्षबागांकडे फिरकतही नव्हते. त्यामुळे उत्पादनात फटका बसूनही उत्पादकाच्या पदरी निराशाच होती.
थंडी जशी कमी होते आहे, तसे व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी बागांकडे येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
आधीचे ४० क्विंटल द्राक्ष ३४ रुपये किलोने गेले. आता २० ते ३० रुपये प्रति किलो दरम्यानच व्यापारी मागत आहेत.
- दत्ता म्हस्के, द्राक्ष उत्पादक, वरुड, जि. जालना.
शिवरात्रीपूर्वी आमच्या परिसरात ३२ ते ३६ रुपये प्रति किलोने व्यापारी द्राक्ष मागत होते. आता दर २० ते २८ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. महाशिवरात्रीनंतर काही दिवस तर व्यापारी बागांकडे फिरकतही नव्हते. थंडीचा वाढलेला मुक्काम दराचे मोठे नुकसान करतोय. थंडी कमी झाली की मागणी वाढेलच.
- नंदकिशोर साळुंके, द्राक्ष उत्पादक गोलटगाव, जि. औरंगाबाद
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.