
Ethanol Production कोल्हापूर ः यंदाच्या हंगामात (Sugar Season) इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्यांच्या उत्पन्नात ८ ते १२ टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज केअर एज अॅडव्हायजरी अॅण्ड रिसर्च या संस्थेने वर्तविला आहे. सर्वाधिक साखर इथेनॉलकडे (Sugar for Ethanol) वळविण्यासाठी केंद्राने या हंगामात प्रयत्न केले.
अनेक नव्या योजनांना परवानगी दिल्याने इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) वेगात होत आहे. अनेक कारखान्यांनी नवे प्रकल्प उभे करत इथेनॉल तयार करण्याचे प्रमाण वाढविले, याचा सकारात्मक फायदा कारखान्यांना यंदा होत असल्याचे चित्र आहे.
केंद्राने नव्या प्रकल्पांना मंजुरी दिली. परिणामी, अतिरिक्त साखर उत्पादनाचा धोका टळला. यंदा सुमारे ४५ लाख टन साखर इथेनॅालकडे वळविण्यात येत आहे. याचा फायदा साहजिकच कारखानदारीला होणार आहे.
साखरेला सध्या स्थानिक बाजारपेठेत फारसा दर नाही. विशेष करून महाराष्ट्र, कर्नाटकातील कारखान्यांनी निर्यातीचा आधार घेऊन शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
यामुळे साखर विक्रीतून आलेली रक्कम ही कारखान्यांना फारशी फायदेशीर ठरणार नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर इथेनॉल बनवणे कारखान्यांना समाधानाचे ठरत असल्याचे चित्र आहे.
इथेनॉलवरील करात कपात करण्याबरोबरच विक्री दरातही वाढ करण्यात आल्याने या सर्वांचा फायदा कारखानदारांना होण्याची शक्यता असल्याचे केअर एज अॅडव्हायजरी अॅण्ड रिसर्च या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
इथेनॉलवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आली आहे. तसेच मळीचा रस आदीपासून तयार होणाऱ्या इथेनॉल दरामध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
दोन ते तीन वर्षांपर्यंत साखर कारखानदारांना इथेनॉल निर्मितीत फारसा उत्साह नव्हता. पण गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलली. केंद्राने इथेनॉल प्रकल्पाला परवानगी देण्यात सुलभता आणली. यामुळे इथेनॉल निर्मितीही झपाट्याने वाढत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
२०२३ अखेरपर्यंत १००० कोटी लिटर क्षमता
सध्याची देशाची इथेनॉल उत्पादनक्षमता सुमारे ९४७ कोटी लिटर आहे. ज्यात ६१९ कोटी लिटर मोलॅसिस आधारित उत्पादनक्षमता आणि ३२८ कोटी लिटर धान्य आधारित उत्पादनक्षमता आहे.
केंद्राने देशातील २२५ इथेनॉल प्रकल्पांना अलीकडच्या कालावधीत परवानगी दिली आहे. २०२३ अखेरपर्यंत १००० कोटी लिटर क्षमतेचे इथेनॉल प्रकल्प उभे राहतील, असा अंदाज केंद्राचा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.