वायदेरक्षणासाठी शेतकऱ्यांनीही भूमिका घ्यावी

चीन सध्या प्रचंड दुष्काळाचा सामना करीत आहे. तेथील ६६ नद्या आटल्या आहेत. कृषी सिंचन करणारे महत्त्वाचे तलाव ६०-७० टक्के आटले आहेत. काही प्रांत ५०० वर्षांतील सर्वांत जास्त उष्णतेची लाट सहन करत आहेत. शेती धोक्यात आली आहे. अशा वेळी चीनच्या राज्यकर्त्यांनी शेंगदाणा तेल आणि मोहरी तेल यांच्या ऑप्शन्स व्यवहारांना त्वरित मान्यता देऊन टाकली आहे. भारताच्या सोयाबीन उत्पादनाच्या दहा पट म्हणजे १०० दशलक्ष टन आयात करणाऱ्या चीनने पुढील धोका ओळखून जनुकीय बदल केलेल्या म्हणजे जीएम सोयाबीन आणि मोहरीच्या उत्पादनाला देखील त्वरित मंजुरी देऊन टाकली आहे. आणि आपल्या देशात मात्र नऊ शेतीमालाच्या वायद्यांना बंदी, जीएम बियाण्यांवर बंदी, आणि आता हळदी वायद्यांना बंदीची मागणी हे चित्र कितपत योग्य आहे?
Turmeric
TurmericAgrowon

दोन आठवड्यांपूर्वी या स्तंभामधून हळद बाजाराचा कल (Turmeric Future Rate) या विषयावर चर्चा केली होती. हळद बाजारात (Turmeric Market) प्रथम आलेली तेजी आणि त्यानंतर अलीकडील काळातील मंदी याची कारणेदेखील त्यामध्ये दिली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी एका व्यापारी संस्थेने हळदीचे वायदे बंद करण्यासाठी सरकारला विनंतीवजा पत्र पाठवल्याचे समजले. त्यानंतर ॲग्रोवनने आयोजित केलेल्या वेब संवादामध्ये असे समजले, की शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या संस्थेने वायदे बंद करण्याची विनंती केली आहे. त्याच वेब संवादामध्ये सहभागी झालेल्या एका शेतकरी प्रतिनिधीने मात्र वायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते हा दावा सोदाहरण खोडून काढला. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना हळूहळू वायदे बाजार कसा वापरावा हे समजू लागले आहे याची ग्वाही दिली. मात्र वरवर एक रूटीन वाटणाऱ्या या चर्चेमध्ये एक मोठा अर्थ दडला असल्याचे दिसून येते.

Turmeric
Turmeric : हळदीच्या वायद्यांवर बंदी नकोच !

एक म्हणजे इतर कोठल्याही बाजारा प्रमाणे वायदे बाजारामध्ये देखील काही गैरकृत्ये होत असले तरी एकंदर हा बाजार पारदर्शी आणि खचितच शेतकरीधार्जिणा आहे, असे म्हणता येईल. एकदा या बाजाराचे तंत्र समजले की त्यातून जोखीम व्यवस्थापन अथवा हेजिंग बरोबरच वेळोवेळी केवळ ट्रेडिंग करून देखील फायदा कमावता येतो हे शेतकऱ्यांना वाढत्या प्रमाणात समजू लागले आहे. तर शेतकऱ्यांची नवी पिढी परंपरागत पद्धतीने पिकवत बसण्यापेक्षा ते विकण्यासाठी नवनवीन वाटा चोखाळताना दिसत आहे. ही पिढी हळूहळू का होईना, परंतु वायदे बाजाराचा डोळसपणे स्वीकार करताना दिसत आहे. यातून माल साठवणूक, तारणकर्ज या साधनांचा वापर करून शेतकरी बाजारातील पुरवठ्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसू लागला आहे. हा कल जसजसा वाढत जाईल तसतशी बाजारात शेतीमालाची किंमत निश्‍चिती मूठभर व्यापाऱ्यांच्या हातातून निसटून शेतकऱ्यांच्या पारड्यामध्ये जाऊ लागेल. मागील काळात आपण सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये हा अनुभव घेतला आहे. हळदीचे वायदे बंद करण्याच्या मागणीमागे नेमकी हीच धोक्याची घंटा काही व्यापारी गटांना अस्वस्थ करत नसेल ना, अशी शंका येऊ लागली आहे.

दुर्दैवाने राष्ट्रीय माध्यमामध्ये कमोडिटी बाजाराचे सुमार ज्ञान असलेल्या प्रतिनिधीने हळद वायदे बंदी मागणी केवळ एक संस्था करीत असताना बहुवचन वापरून अनेक संस्थांनी अशी मागणी केल्याचे चित्र उभे केले. बरे असे करताना बातमीमध्ये समतोल येण्यासाठी शेतकरी संस्था किंवा इतर व्यापारी संस्था, कमोडिटी एक्स्चेंज अथवा सेबीचे मत घेण्याची तसदी घेतलेली नाही. अशा बेजबाबदार वार्तांकनामुळे अर्थव्यवस्थेमधील अनेक घटकांचे नुकसान होऊ शकते, याचे भान ठेवण्याची गरज आहे.

वायदे बाजारासंबंधी नेमल्या गेलेल्या आजवरच्या प्रत्येक समितीने कुठे ना कुठे मान्य केले आहे, की वायदे बाजारामधील अनेक कमोडिटीजमध्ये काही काही छोट्या शहरांमध्ये असे गट असतात जे बाजार चुकीच्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत त्यांना फायदा होत असतो तोपर्यंत त्यांना वायदे बाजार चांगला वाटत असतो. मात्र जेव्हा अतिरिक्त सट्टेबाजी अंगाशी येऊन त्यांना तोटा होतो तेव्हाच ते वायदे बंदीची मागणी करतात. अलीकडे हळदीच्या किमती खाली आल्यामुळे असा तोटा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु बाजारात नेहमीच फायदा होत नाही तर कधी तोटा देखील होताच असतो. मात्र वायदे बाजाराचा उपयोग हा हजर बाजारात झालेला तोटा जोखीम व्यवस्थापनामार्फत भरून काढता यावा म्हणूनच केला जायला हवा. वेब संवादाचा सूर पाहता बंदीची मागणी करणाऱ्या घटकांनी याबाबतचा खुलासा केलेला नाही. तर नेमक्या कुठल्या शेतकऱ्यांना तोटा झाला तेही समोर आले नाही. एकंदर परिस्थितीचा विचार करता हळद वायदेबंदीची मागणी ही वस्तुस्थितीवर आधारित नसून ती पूर्वग्रहदूषित किंवा काही हेतूने केली गेली असावी, असा संशय घ्यायला वाव आहे.

Turmeric
Turmeric : हळदीची झळाळी वाढणार की मंदावणार?

हळदीवर वायदेबंदीची मागणी करताना निष्काळजीपणा दाखवला गेला आहे. एखाद्या कमोडिटीमध्ये पर्यायी बाजार व्यवस्था, ती देखील वायदेबाजारासारखी राष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ, निर्माण करण्यासाठी कमोडिटी एक्स्चेंजेस अतोनात वेळ, संशोधन आणि पैसा खर्च करत असते. याचा फायदा त्या कमोडिटीशी संबंधित उत्पादक, दलाल, प्रक्रिया व्यावसायिक, व्यापारी आणि निर्यातदार यांच्याबरोबरच या कमोडिटीमध्ये वित्तपुरवठा करणाऱ्या बँका, साठवणूक करणारी गोदामे अशा अर्थ व्यवस्थेतील अनेक घटकांना होत असतो. त्यातून अनेक नोकरीधंदे निर्माण होऊन एक प्रणाली आकाराला येत असते. अशी मोठी व्यवस्था कोणा एका गटाचे सट्टेबाजीमध्ये नुकसान होतेय म्हणून एका क्षणात बंद केल्याने काय परिणाम होतील, याचा तरी विचार बंदीची मागणी करणाऱ्यांनी करावा. फार मागे न जाता आपण मागील एक वर्षात हरभरा, सोयाबीन, मोहरी, सोयातेल यासारख्या महत्त्वाच्या कमोडिटीजच्या वायद्यांवर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. वायदेबंदीच्या मागण्या किती बेजबाबदार आहेत, हे यावरून लक्षात यावे.

आज अशी परिस्थिती आहे, की वायदे बाजारामध्ये आपले हितच आहे याची जाणीव शेतकऱ्यांमध्ये वाढीस लागलेली दिसून येत आहे. केवळ एनसीडीईएक्सचा विचार केल्यास २०१६ नंतर मोठ्या संख्येने शेतकरी उत्पादक संस्था वायदे बाजारामध्ये जोखीम व्यवस्थापनाबरोबरच ट्रेडिंग शिकू लागल्याचे दिसून येत आहे.

दोन वर्षांपूर्वी कोरोना साथीमुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीमध्ये तर केवळ वायदे बाजारामुळे शेतकर्‍यांना आपला माल विकणे शक्य झाले होते. त्यामुळे त्यानंतरच्या काळात वायदे बाजारामध्ये शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्थांचा सहभाग वेगाने वाढू लागला आहे. आकडेवारीच द्यायची तर सुमारे ४५० शेतकरी कंपन्या आणि त्यांच्याशी जोडले गेलेले १०-१२ लाख शेतकरी कुठे ना कुठे या बाजाराचे फायदे जाणू लागले आहेत. याव्यतिरिक्त अनेक शेतकरी कृषी वायदे बाजारामध्ये आपापले खाते उघडण्यासाठी उत्सुक आहेत. एकदा का नऊ शेतीमालाच्या वायद्यांवरील बंदी उठली की ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल यात वाद नाही. या पार्श्‍वभूमीवर वायदेबंदीची मागणी करताना व्यापारी संस्थांनी विचार करण्याची गरज आहे. अर्थात, त्यांच्याही काही मागण्या असतील आणि त्या योग्य असतील तर त्याचा विचार एक्सचेंजने करावाच. मात्र हे प्रश्‍न चर्चेने सुटू शकतात. वायद्यांमधील काही अटी शर्ती बदलायच्या तर त्यासाठी सेबीशी चर्चा करणे गरजेचे आहे.

शेवटी व्यवस्था सर्वांच्या भल्यासाठी निर्माण केलेल्या असतात. परंतु त्या चालवणारे शेवटी माणसेच असतात. आणि माणूस म्हटले की कधी तरी मोहाला बळी पडून व्यवस्थेचा दुरुपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी केला जाऊ शकतो. त्यावर त्वरित अंकुश ठेवणे व्यवस्थेला कठीण असते. म्हणून ती व्यवस्थाच बंद करणे योग्य नाही. तर अशी प्रवृत्ती योग्य त्या मार्गाने दूर केल्या जाऊ शकतात, एवढेच याबाबत म्हणता येईल.

हळद वायदयांबाबत निर्माण केलेल्या या गोंधळामुळे एक वेगळ्याच मुद्द्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे असेही म्हणता येईल. वस्तुत: २००३ साली वायदे चालू झाल्यापासून त्यावर संपूर्ण वर्चस्व व्यापारी वर्गाचेच राहिले आहे. तरी देखील मागील सुमारे १५ वर्षांत थोड्या थोड्या अंतराने निदान १२-१५ वेळा तरी व्यापारी वर्गाकडूनच अमुक वायदा बंद करावा म्हणून मागणी आलेली आहे. शेतकऱ्यांनी अशी मागणी केल्याचे ऐकिवात नाही. कदाचित २०१६ पर्यंत वायद्यांमध्ये शेतकर्‍यांचे अस्तित्वच नगण्य होते, हेही एक कारण असेल. परंतु आज शेतकर्‍यांचे वायदे बाजारातील अस्तित्व जाणवू लागले आहे. अशा वेळी आता शेतकरी संस्थांनी वायदे बाजाराच्या संरक्षणासाठी पुढे येण्याची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन वायदे बंद करण्याची भूमिका सरकार घेणार नाही. शेतकरी संस्था आणि नेते यांनी देखील आता वायदे बाजाराबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. परंतु ती भूमिका आपली राजकीय बांधिलकी बाजूला ठेऊन घ्यावी लागेल. अन्यथा कृषी क्षेत्राचे नुकसान ठरलेलेच आहे.

जाता जाता एक अत्यंत महत्वाचे उदाहरण. चीन सध्या प्रचंड दुष्काळाचा सामना करीत आहे. तेथील ६६ नद्या आटल्या आहेत. कृषी सिंचन करणारे महत्त्वाचे तलाव ६०-७० टक्के आटले आहेत. काही प्रांत ५०० वर्षांतील सर्वात जास्त उष्णतेची लाट सहन करत आहेत. शेती धोक्यात आली आहे. अशा वेळी चीनच्या राज्यकर्त्यांनी शेंगदाणा तेल आणि मोहरी तेल यांच्या ऑप्शन्स व्यवहारांना त्वरित मान्यता देऊन टाकली आहे. भारताच्या सोयाबीन उत्पादनाच्या दहा पट म्हणजे १०० दशलक्ष टन आयात करणाऱ्या चीनने पुढील धोका ओळखून जनुकीय बदल केलेल्या म्हणजे जीएम सोयाबीन आणि मोहरीच्या उत्पादनाला देखील त्वरित मंजूरी देऊन टाकली आहे. आणि आपल्या देशात मात्र नऊ शेतीमालाच्या वायद्यांना बंदी, जीएम बियाण्यांवर बंदी, आणि आता हळदी वायद्यांना बंदीची मागणी हे चित्र कितपत योग्य आहे?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com