
पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात मागील तीन दिवसांमध्ये सोयातेलाच्या दरात (Soya Oil Rate) मोठी घसरण झाली. त्यामुळे सोयाबीनचे दरही (Soybean Rate) नरमले होते. याचा थेट परिणाम देशातील सोयाबीन दरावर झाला होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात आता सोयातेलाचे दर सुधारण्याचा अंदाज आहे. सोयाबीनचे दरही वाढतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
डिसेंबर महिन्याची सुरुवात सोयाबीन उत्पादकांना धास्ती भरवाणारी ठरली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलाच्या दर गुरुवारी एकाच दिवशी जवळपास ११ टक्क्यांनी घसरले होते. तर सोयाबीनही जळपास चार टक्क्यांनी नरमले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरल्याचा परिणाम देशातील सोयाबीन बाजारावरही झाला होता. देशातील सोयाबीनचा बाजार क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांनी तुटला होता.
अमेरिकेच्या जैवइंधन धोरणाचा परिणाम
अमेरिकेने इथेनाॅल आणि जैव इंधनाचा वापर वाढविण्यासाठी जैवइंधन धोरण लागू करणार असल्याचे जाहीर केले. आपल्या धोरणात अमेरिका सोयाबीन तेलाचा वापर जैव इंधनासाठी वाढविणार की घटविणार हे पाहणं महत्वाचं आहे.
अमेरिका सोयातेलाचा वापर कमीच करेल, हे गृहीत धरूनच सोयातेलाचे दर कमी झाले आहेत, असं जाणकारांनी सांगितलं. म्हणजेच अमेरिकेने वापर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला तरी सध्याच्या दरात फार बदल होणार नाही. मात्र अमेरिकेने सोयातेलाचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतल्यास सोयातेलाचे दर पुन्हा वाढतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
अर्जेंटीनाचा सोया डाॅलर
अर्जेंटीनाने पुन्हा एकदा सोया डाॅलर धोरण जाहीर केले. त्यामुळे सोयाबीनचे गाळप वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन गाळप वाढल्यास सोयातेलाची उपलब्धताही वाढेल. याचा परिणाम सोयातेलाच्या दरावर झाला. त्यामुळे दर नरमले आहेत. म्हणजेच सोयातेलाचे दर पडण्यामागे अर्जेंटीनाचे सोया डाॅलर हे धोरणही कारणीभूत आहे.
स्वस्त सूर्यफुल तेल
तसेच रशिया आणि अर्जेंटीनाने स्वस्त दरात सूर्यफुल तेल उपलब्ध करून दिले आहे. एरवी सोयाबीन तेलापेक्षा सूर्यफुल तेलाचे दर जास्त असतात. मात्र चालू आठवड्यात सूर्यफुल तेल स्वस्त पडत होते. त्यामुळं सोयाबीन तेलाच्या दरावर दबाव आला. परिणामी सोयाबीन तेलाचे दर कमी होण्यास सूर्यफुल तेलाने हातभार लावला होता.
सर्व घटकांचा परिणाम
बाजारातील सर्व घटकांच्या परिणामी सोयातेल नरमले होते. त्याचा परिणाम सोयाबीन दरावरही झाला होता. मात्र आता सोयातेलाच्या दरावर या घटकांचा परिणाम जाणवणार नाही. पुढील आठवड्यात सोयातेलाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
दरवाढीस पुरक स्थिती
सोयाबीन बाजाराचा विचार करता दरवाढीस अनुकूल स्थिती आहे. अर्जेंटीना आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये काही भागांमध्ये उष्ण हवामान आहे. अर्जेंटीनामध्ये बऱ्याच भागात उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे सोयाबीन पेरणीवर परिणाम होत आहे. मागीलवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४८ टक्के पेरणी झाली होती. ती यंदा २८ टक्क्यांवर अडकली आहे. त्यामुळे अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटणार असल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. तसेच चीनकडूनही मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सुधारु शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
देशात काय स्थिती राहील?
देशात सध्या सोयाबीनला सरासर ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर सुधारले आहेत. त्यामुळे देशातून सोयापेंड निर्यातीचे करार सुरु आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल आणि सोयाबीन दरातील नरमाईमुळे देशातील बाजारावर परिणाम झाला होता. मात्र पुढील आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातील बाजारातही सोयाबीनचे दर क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत सुधारु शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.