
सिंधुदुर्गनगरी ः एकीकडे देवगड हापूसचा हंगाम (Hapus Season) महिनाभर लांबण्याची शक्यता असताना दुसरीकडे जिल्ह्यातील कातवण (ता. देवगड) येथील दिनेश शिंदे व प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांच्या (Mango Farmer) बागेतून या हंगामातील देवगड हापूसची पहिली दोन डझनांची पेटी वाशी मार्केटला पाठविण्यात आली आहे. बदलत्या वातावरणातही मोहोर टिकवून ठेवण्याचे कौशल्य आत्मसात करीत त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे.
या वर्षी देवगड हापूसचा हंगाम महिनाभर लांबण्याची शक्यता बागायतदारातून व्यक्त होत असतानाच, कातवण येतील आंबा बागायतदार प्रशांत शिंदे व दिनेश शिंदे यांच्या गोरक्ष गणपती मंदिर या ठिकाणी असलेल्या आंबा बागेत आंबा परिपक्व झाला आहे.
त्यांनी परिपक्व झालेल्या आंब्याची काढणी गुरुवारी (ता. २४) देवदिवाळीच्या मुहूर्तावर केली. काढणी केलेल्या आंब्याचे पूजन करीत दोन डझनांची पेटी वाशी मार्केट येथील व्यापारी अशोक हांडे यांना पाठविली आहे. या हंगामातील देवगड हापूसची ही पहिली पेटी आहे.
श्री. शिंदे यांच्या हापूसच्या झाडांना १५ ऑगस्टपासून मोहोर येण्यास सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे काही कलमावरील आलेला मोहर गळून पडला. मात्र चार ते पाच कलमांवरील मोहरा तसाच टिकून राहिला.
तो टिकवण्यासाठी शिंदे बंधूंनी प्रचंड मेहनत घेतली. नोव्हेंबरमध्ये झाडावरील आंबा आकार घेऊ लागला. दरम्यान, गुरुवारी आंब्याची काढणी करण्यात आली. बदलत्या वातावरणात आणि पावसाळ्यातील मोहोर टिकविणे हे एक कौशल्य आहे. ते कौशल्य त्यांनी आत्मसात करीत पहिली पेटी पाठविण्याचा मान मिळविला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.