
सातारा : मागील चार वर्षांपासून झालेल्या दरातील (Ginger Rate) घसरणीनंतर अल्प प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. आले खोडवा पिकांची सध्या काढणी (Ginger Harvesting) सुरू असून, नवा जुना माल अशी विभागणी करून शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट (Loot From traders) केली जात आहे.
आले पीक गेल्या चार ते पाच वर्षांपासून संकटाच्या गर्तेत सापडले होते. कोरोनाचा संसर्ग राहिल्याने दरात कायम घसरण, वाढलेल्या किडी व रोगामुळे वाढलेला भांडवली खर्च यामुळे आले उत्पादक शेतकरी तोट्यात गेले आहेत. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून प्रतिगाडीस चार ते सहा हजार रुपयांवर दर गेले नव्हते. हा न परवडणारा दर व उत्पादनात झालेल्या घटीमुळे काही शेतकऱ्यांनी आले न काढता, तसेच जमिनीत ठेवले होते. सध्या मात्र जून महिन्यापासून दरात अल्प वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
बाजारभाव नसल्यानं गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली आले उत्पादकांची परवड आता दर वाढू लागल्याने थांबण्याची चिन्हे आहेत. मागील १५ दिवसांपासून पिकांच्या दरात अल्प सुधारणा झाली आहे. सध्या आले पिकाच्या ५०० किलोच्या गाडी मागे सहा ते सात हजार रुपयांनी सुधारणा झाली असून, सध्या प्रतिगाडीस १२ ते १६ हजार रुपये दर मिळू लागला आहे. मात्र आले व्यापाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळे दरवाढ होऊनही आले उत्पादक शेतकऱ्यांची परवड सुरू आहे.
गेले अनेक वर्षे आल्याची खोडवा पिकाची काढणी करताना जुने आणि नवीन आले अशी विभागणी होत नव्हती. मात्र व्यापाऱ्यामधल्या संघर्षाचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. जुने आणि नवीन मालाची खरेदी करताना एकतर जुना नवीन मालं तसाच शेतात टाकून दिला जातो अथवा त्याला कवडीमोल दर दिला जातो. सध्या ७० टक्के जुना माल आणि ३० टक्के नवा माल अशी परिस्थिती आहे. जुन्या मालास प्रतिगाडीस १२ ते १६ हजार तर नव्या मालास चार हजार रुपये तर बासा (खराब) तीन हजार रुपये प्रतिगाडीस दर दिला जात आहे. म्हणजे नवा निघाणाऱ्या मालास जवळपास खराब आल्याच्या दरात करून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. पुढे हे दोन्ही माल एकत्र करून चांगल्या दराने विक्री करून शेतकऱ्यांच्या दुप्पट, तिप्पट पैसे कमवण्याचे धंदे केले जात आहेत. व्यापाऱ्यांच्या या धोरणामुळे दरात सुधारणा होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असून, लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
‘स्वाभिमानी’ घेणार पुढाकार
अलीकडे व्यापाऱ्यांनी नवीन पायंडा पाडला असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. व्यापाऱ्यांनी विभागणी न करता एकत्रित आल्याचा दर शेतकऱ्यांना द्यावा. यापूर्वीही असाच व्यापारी होत होता नवीन लोक या व्यापारात आल्यानं संपूर्ण आले पिकाची आणि दराची वाट लावली आहे. त्यामुळे आले पीक वाचवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सरसकट दर मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
काही व्यापाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
कोरेगाव येथे आले खरेदीदार व्यापारी आणि शेतकऱ्यांत बैठक झाली असून एक ऑगस्टपासून नवा जूना माल स्वंतत्र विभागणी न करता एकत्र खरेदी व एकाच दराने खरेदी करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती कृषिभूषण मनोहर साळुंखे यांनी दिली. मात्र हा निर्णय राज्यभरातील सर्वच व्यापाऱ्यांनी घेतला तर शेतकऱ्यांची लूट थांबणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.