Fruit Market : गणेशोत्सवामुळे सोलापूर, पंढरपुरात केळीसह फळांचा बाजार फुलला

श्रावणानंतर आता गणेशोत्सवासाठी सोलापूर आणि पंढरपुरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. केळीसह डाळिंब, मोसंबी, पेरू, सीताफळ या फळांना चांगला उठाव मिळतो आहे. विशेषतः केळीला सर्वाधिक मागणी आहे.
Fruit Market Solapur
Fruit Market SolapurAgrowon

श्रावणानंतर आता गणेशोत्सवासाठी सोलापूर आणि पंढरपुरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. केळीसह डाळिंब (Banana, Pomegranate), मोसंबी, पेरू, सीताफळ या फळांना चांगला उठाव मिळतो आहे. विशेषतः केळीला सर्वाधिक मागणी आहे. पण दर (Fruit Market Rate) काहीसे स्थिर आहेत. आगामी काळात नवरात्रोत्सव आणि दिवाळीही येते आहे. त्यामुळे केळीचा बाजार (Banana Market) आणखी वधारण्याची चिन्हे आहेत. सध्या केळीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक एक हजार रुपये दर (Banana Rate) मिळतो आहे.

Fruit Market Solapur
Banana Crop Insurance : केळी पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात वर्ग करू नये

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, मोहोळ या भागात केळीचे उत्पादन सर्वाधिक होते. उसाचे वाढते क्षेत्र, मिळणारा दर आणि नफा यांचे गणित जुळत नसल्याने अनेक ऊस उत्पादक शेतकरी केळीकडे वळत आहेत. जिल्ह्यात अनेक भागांत आज उसाला पर्याय म्हणून केळीकडे पाहिले जाते. जिल्ह्यात सुमारे पाच हजार एकरांवर केळीचे क्षेत्र विस्तारले आहे. माळशिरसमधील अकलूज, माळीनगर, श्रीपूर, माढ्यातील बेंबळे, निमगाव, घोटी, कुर्डुवाडी, करमाळा तालुक्यातील कंदर, केम, जेऊर या भागात केळीचे उत्पादन होते आहे. यापैकी अनेक भागाला उजनी धरणाचे पाणी मिळते आहे. त्यामुळे उसानंतर या भागात दुसऱ्या स्थानावर केळी आहे.

कंदर केळीचे हब

करमाळ्यातील कंदर हे गाव तर केळीचे हब म्हणूनच ओळखले जाते. या गावात जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे केळी आहे. उजनी धरणाच्या ‘बॅकवॅाटर’च्या कार्यक्षेत्रात हे गाव येत असल्याने इथे पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. शिवाय केळीला आवश्यक असणारे वातावरणही पोषक आहे. इथले शेतकरी केळीची विक्री स्थानिक भागात करतातच. शिवाय निर्यातक्षम उत्पादनातही त्यांची आघाडी आहे. त्यामुळेच निर्यातदार कंपन्यांनी थेट कंदरमध्येच आपली कार्यालये थाटली आहेत. यावरुन इथल्या केळी उत्पादनाचे महत्त्व लक्षात येते.

Fruit Market Solapur
Banana Farming : सोलापूर जिल्ह्यात वेलची, ‘रेड बनाना’ केळीवाणांचा यशस्वी प्रयोग

केळीला उठाव, पण दर स्थिर

जिल्ह्यात ग्रॅंड नैन केळी वाणाचेच सर्वाधिक उत्पादन होते. सोलापूर, पंढरपूर या बाजार समित्यांमध्ये केळीचे लिलाव होतात. आठवड्यापूर्वी संपलेला श्रावण आणि आता सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवामुळे केळीला बाजारात चांगला उठाव मिळतो आहे. तुलनेने आवक जेमतेमच आहे. पण दर मात्र स्थिर आहेत. सोलापुरात केळीची रोज साधारणपणे २५ ते ५० क्विंटल आवक होत आहे. तर प्रति क्विंटल किमान ६०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये दर मिळतो आहे. पंढरपुरात रोज ५० ते २०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. दर प्रति क्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक ९५० रुपये दर मिळतो आहे.

डाळिंब, मोसंबी, पेरूचीही रेलचेल

गणेशोत्सवामुळे केळीसह बाजारात डाळिंब, सीताफळ, मोसंबी, पेरू आदी अन्य फळांचीही रेलचेल वाढली आहे. त्यांची आवक स्थानिक भागातून होत आहे. सीताफळाला प्रति क्विंटल किमान २५०० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये, पेरू किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये, मोसंबी किमान १५०० रुपये, सरासरी २५०० रुपये, सर्वाधिक ३५०० रुपये दर मिळतो आहे. डाळिंबाला मात्र सर्वाधिक दर मिळतो आहे. प्रतिक्विंटल किमान १५०० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक १५ हजार रुपये असे हे दर आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com