Cotton Rate: स्थानिक कापूस बाजारातील तेजी किती दिवस टिकणार ?

शेतकऱ्यांना कापसाचे दर (Cotton Rate) आणखी वाढण्याची, गेल्या वर्षीइतका विक्रमी दर मिळण्याची अपेक्षा आहे.
Cotton
CottonAgrowon

शेतकऱ्यांना कापसाचे दर (Cotton Rate) आणखी वाढण्याची, गेल्या वर्षीइतका विक्रमी दर मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ते सध्या कापूस विकायला तयार नाहीत. त्यामुळे स्थानिक आवक घटली आहे. जागतिक बाजारपेठेतील (International Market) मागणी-पुरवठ्याचं चित्र आणि देशातील कापूस उत्पादन लक्षात घेता कापसाच्या दरात फार मोठी तेजी येण्याची शक्यता नाही, असं बाजार अभ्यासकांनी सांगितलं आहे. अर्थात कापसाच्या दरात मोठी पडझड होऊन मंदी येणार नाही; परंतु किंमती स्थिर राहतील, गेल्या वर्षीइतकी तेजी येण्यासारखी परिस्थिती सध्या नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

चीनकडून मागणी नाही
चीनकडून कापसाला मागणी अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. त्यातच चीनमध्ये सध्या सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. तिथे कोरोनाचा पुन्हा फैलाव होत असून सरकारने घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. चीनसारख्या देशात जनआंदोलन होणं ही अपवादात्मक घटना मानली जाते. तेथील जनतेमध्ये सरकारच्या धोरणांमुळे आर्थिक आघाडीवर उडालेल्या घसरगुंडीबद्दल संतापाची भावना आहे. त्यामुळेच तिथे आंदोलनाचे लोण पसरले आहे. अशा राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात चीनकडून कापसाला लगेच मागणी वाढण्याची शक्यता नाही.

निर्यातीची गोची

जागतिक बाजारातील दरपातळीच्या तुलनेत भारतीय कापूस महाग पडतोय. त्यामुळे निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. बांगलादेश आणि व्हिएतनामसारखे आपले प्रमुख ग्राहक देश ब्राझीलसारख्या देशांमधून कापूस आयात करायला पसंती देत आहेत. कारण वाहतुक खर्च पकडूनही तिथला कापूस भारतापेक्षा स्वस्त पडतोय. 

त्यातच डॉलरच्या तुलनेत रूपयातील घसरण आता कमी झाली आहे. रूपया आता स्थिर झाला आहे. त्याचाही प्रतिकूल परिणाम निर्यातीवर होत आहे. निर्यात थंडावल्याने कापूस दरातील वाढीला लगाम बसला आहे.

आवक रोडावली

महाराष्ट्रात कापूस आवक कमी आहे. तसेच गुजरातमध्येही कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत. तेथील कापूस उत्पादक शेतकरी भाववाढीसाठी आक्रमक झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी असल्याने त्यांच्यात संतापाची भावना आहे. त्यांनी अपेक्षित भाव मिळेपर्यंत माल बाजारात न्यायचा नाही, असं ठरवलं आहे. त्यामुळे सध्या बाजारात आवक खूपच कमी झाली आहे.

Cotton
Cotton Rate : शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची आशा

सीएआयच्या अंदाजावरून वाद

यंदा देशात कापूस उत्पादनात १२ टक्के वाढ होऊन ते ३४४ लाख गाठीपर्यंत जाण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सीएआयने दिला आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांकडून सीएआयवर टीका होत आहे. गेल्या वर्षी सीएआयचा कापूस उत्पादनवाढीचा अंदाज चुकला होता. त्याचा दाखला देत सीएआय यंदाही कापसाचे भाव पाडण्यासाठी वाढीव उत्पादनाचा अंदाज देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय. 

परंतु गुजरातमध्ये पिकाची स्थिती चांगली आहे. तसेच महाराष्ट्रातही गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन घटण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा उत्पादनवाढीसाठी खतं-किटकनाशकांवर चांगला खर्च केला आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता कापसाची उत्पादकता चांगली राहण्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे सीएआयने कापूस उत्पादनाचा अंदाज मुद्दामहून फुगवल्याच्या आरोपात फारसे तथ्य नाही, असे बाजार अभ्यासकांनी सांगितलं आहे.

एकंदर देशातील उत्पादनाचा अंदाज, निर्यातीसाठीची पडतळ, चीनमधील अस्थिरता, जागतिक बाजारातील मागणी-पुरवठ्याचं चित्र लक्षात घेता शेतकऱ्यांनी किमान दरासाठी प्रति क्विंटल ९ हजार रूपयांच्या भावपातळीवर लक्ष ठेऊन टप्प्याटप्प्याने माल विकण्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला बाजार अभ्यासकांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com