Gold Market : शिखरावर असलेल्या सोन्याची वाटचाल कशी राहील?

भारतातील सोन्याच्या एकूण वार्षिक मागणी ११०० ते १२०० टन आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप हा ग्रामीण भागात होत असतो. जागतिक पातळीवर स्वीकारला गेलेला हा घटक आहे.
Gold Market
Gold MarketAgrowon

सोने (Gold) ही कमोडिटी कृषिमाल नसली, तरी कृषिमाल क्षेत्रासाठी म्हणजेच ग्रामीण भारतासाठी सर्वांत जास्त महत्त्वाची कमोडिटी आहे. भारतातील सोन्याच्या एकूण वार्षिक मागणी ११०० ते १२०० टन आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप हा ग्रामीण भागात (Rural Areas) होत असतो.

जागतिक पातळीवर स्वीकारला गेलेला हा घटक आहे. त्यामुळेच ज्या वर्षात कृषिमालाचे भाव (Agricultural Prices) आकर्षक असतात, त्या वर्षी सोन्याला भारतात चांगली मागणी असते, असे गृहीत धरले जाते.

मागील आठवड्याअखेर सोन्याच्या किमतीने ५६,२०० रुपयांचा विक्रम केला. बाजारधुरीण यापुढे सोन्याची वाटचाल तेजीतच राहील असे सांगत असून, आता पुढचे शिखर ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि नंतर एक-दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने ६२,००० ते ६५,००० रुपयांची पातळी गाठेल असे सांगत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर २०२३ मध्ये सोन्याची चमक कशी राहील याचा ऊहापोह करण्याची योग्य वेळ आली आहे. त्यामुळेच कृषिमाल बाजारपेठेपेक्षा थोडी वेगळी वाट पकडून या आठवड्यासाठी सोने हा विषय घेतला आहे.

अर्थात, सोने ही कमोडिटी कृषिमाल नसली, तरी कृषिमाल क्षेत्रासाठी म्हणजेच ग्रामीण भारतासाठी सर्वांत जास्त महत्त्वाची कमोडिटी आहे. भारतातील सोन्याच्या एकूण वार्षिक मागणी ११०० ते १२०० टन आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप हा ग्रामीण भागात होत असतो.

जागतिक पातळीवर स्वीकारला गेलेला हा घटक आहे. त्यामुळेच ज्या वर्षात कृषिमालाचे भाव आकर्षक असतात, त्या वर्षी सोन्याला भारतात चांगली मागणी असते, असे गृहीत धरले जाते.

यामागील दुसरे कारण असे आहे, की भारतासारख्या महाकाय देशात ५ मेट्रो सिटी आणि १२-१५ मोठी शहरे सोडली तर आजही ७० टक्के प्रदेशांत आर्थिक गुंतवणुकीच्या विविध साधनांचा प्रसार झालेला नाही.

त्यामुळे गुंतवणुकीचे परंपरागत साधन म्हणून सोन्यातच किंवा फार तर चांदीमध्ये पैसे गुंतवणे-खरे तर अडकवणे-हीच पद्धत रूढ आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जेव्हा पेरणी आणि मशागतीच्या हंगामात पैसे लागतात, तेव्हा हेच सोने विकून पैसे उभे करतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे कृषिमालाबरोबरच शेतकऱ्यांना सोन्याच्या किमतीबाबत देखील कुतूहल असते.

Gold Market
Gold Market : ग्रामीण भागात सोने खरेदी रोडावणार

गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केल्यास सरत्या वर्षात म्हणजे २०२२ मध्ये जिरे या मसाला पिकाने ९६ टक्के म्हणजे जवळपास दुप्पट परतावा दिला आहे. तर एरंडी बी आणि गवार या दोन कमोडिटीजनी अनुक्रमे १८ टक्के आणि १७ टक्के परतावा दिला आहे.

त्या तुलनेत सोन्याने फक्त १४ टक्के परतावा दिला आहे. चांदीमध्ये तर केवळ ११ टक्के परतावा दिला आहे. असे असले तरी सोन्याची गोष्टच वेगळी असते.

संपूर्ण जगात सोन्याकडे कधी एक कमोडिटी तर कधी चलन म्हणून पाहिले जात असले, तरी विशेषत: भारतात सोन्याकडे भाव नाही तर भावनेने पाहिले जाते. म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून ते अगदी निधन होईपर्यंतच्या प्रवासात प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात सोन्याचे काही ना काही काम असतेच. त्यामुळे भारतात सोनाराकडे जाऊन किमतीची विचारपूस करून सोन्याची खरेदी करणारे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत.

दर आठवड्यात किंवा अगदी दर दोन दिवसांनी घडणाऱ्या जागतिक घटनांमुळे बाजाराचा कल सतत बदलत असतो. आजच्या वेगवान जगात संपूर्ण २०२३ मधील बाजार वाटचाल देणे कठीण असते.

परंतु ऐतिहासिक माहितीच्या आधारे आपण याचा वेध घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला आठवत असेल, की ऑगस्ट २०२० मध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी सोन्यामध्ये जी जागतिक तेजी आली, त्या वेळी सोने भारतातील वायदे बाजारात ५६,१९० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले.

Gold Market
Gold Rate : सोने दर प्रति तोळा ५६ हजार रुपयांपर्यंत

तर जागतिक भाव त्या वेळी २,०७५ डॉलर प्रति आउन्सच्या शिखरावर गेला होता. त्या वेळी सोने ६०,००० ते ६५,००० रुपयांना गेले, तर आपण जगाच्या मागे राहू असे वाटून प्रत्येक जण सोन्याच्या मागे लागला होता.

प्रत्यक्षात झाले उलटेच. सोने तिथून जे घसरू लागले ते दोन वर्षांत म्हणजे मागील जुलैमध्ये ४९,००० पर्यंत येऊन थांबले. जर भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाले नसते, तर सोने ४८,००० रुपयांच्या खाली देखील आले असते.

त्यामुळे अनेक भारतीय ग्राहकांना सोन्यात अडकल्यासारखे झाले होते. परंतु नंतरच्या पाच-सहा महिन्यांत सोन्याने ही पिछाडी भरून काढत परत नवीन विक्रम नोंदवला आहे.

त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता सोन्याच्या बाबतीत परत सावध होण्याची गरज आहे. त्याच्या पूर्वीदेखील डॉलर परिमाणामध्ये पाहिल्यास २००५ मध्ये सुरू झालेल्या तेजीमध्ये सोने ४०० डॉलर्सवरून २०११ अखेरीस १,८२१ डॉलर्सवर पोहोचले होते.

नंतर परत १,२०० डॉलर्सवर येऊन २०२० मध्ये २,०७५ डॉलर्सवर पोहोचले. सोन्यामध्ये पुढील काळात नफारूपी विक्रीचे दडपण असेल. विशेषतः ५६,००० रुपयाने खरेदी केलेल्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून हळूहळू विक्री होत राहील.

डॉलरमध्ये आज सोने १९१५ डॉलर्सवर असून, टेक्निकल चार्ट आणि अर्थतज्ज्ञ १९४२-१९५० डॉलर्स किंवा १९७४ डॉलर्सवर सोन्याला मोठा अडथळा आहे, असे सांगत आहेत. म्हणजे रुपयांमध्ये पाहिल्यास सोने ५७,२०० ते ५७,५०० या कक्षेपलीकडे जाणे कठीण आहे.

मागील सहा महिन्यांतील सोन्यातील तेजीची कारणे पाहताना एक लक्षात घेणे गरजेचे आहे, की सोन्याची मागणी आणि किंमत ही भारतातील सणवार, लग्नसराई किंवा पितृपक्ष अशा गोष्टींवर अजिबात अवलंबून नसते.

तर सोने हे अनेकदा कमोडिटीपेक्षा चलन म्हणून वापरले जात असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा कल अवलंबून असतो. महागाई, मग व्याजदर वाढीमुळे तेजीत आलेला डॉलर या काळात हळूहळू पूर्ववत होत गेला.

जगावर मंदीच्या संकटाची चाहुल, आंतरराष्ट्रीय बाजारात कमोडिटीजच्या मागणीमध्ये झालेली जोरदार घट, युक्रेन-रशिया युद्धाबाबत अजूनही असलेली अनिश्‍चितता, पाकिस्तान, बांगलादेश सारख्या अनेक अशक्त अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतात असणे.

तर चीनच्या अर्थव्यवस्थेवर अजूनही असलेले प्रश्‍नचिन्ह अशा वातावरणात सोनेखरेदी हा एकाच पर्याय प्रत्येक देशासमोर उभा राहतो. म्हणूनच जगातील मध्यवर्ती बँका सोने खरेदी करीत आहेत. अलीकडील काळात सोन्यात आलेली तेजी हा त्याचाच परिणाम असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

२०२० या कोविड वर्षात जगातील मध्यवर्ती बँकांनी २७३ टन सोने खरेदी केले होते. २०२१ मध्ये ही खरेदी चक्क ८२ टक्क्यांनी वाढून ४६३ टनांवर गेली.

तर २०२२ वर्षातील आकडेवारी प्रसिद्ध झाली नसली तरी केवळ जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्येच ४०० टन असल्यामुळे वार्षिक आकडेवारी नवीन उच्चांक गाठेल, हे नक्की.

विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेनेच मागील तीन वर्षांत सुमारे १३४ टन सोने घेतले आहे.

Gold Market
Gold Rate : सोने दरात एका दिवसात चारशे रुपयांची वाढ

या वर्षात निदान पहिल्या सहामाहीमध्ये तरी हाच कल चालू राहील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच जरी सोने अधिक महागणार असले, तरी मागील सहा महिन्यांतील ७,००० रुपयांची वाढ पाहता हत्ती निघून गेला आहे.

त्यामुळे पूर्वीच सोने खरेदी केलेल्या ग्राहकांना अजून थांबायला हरकत नाही. परंतु आता नवीन खरेदी करून एक-दीड हजार रुपयांचे हत्तीचे शेपूट पकडण्यापेक्षा सोने परत ५२,५०० ते ५३,००० रुपयांवर येण्याची वाट पाहणे योग्य ठरेल.

शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा. खनिज तेल मागील दोन महिन्यांत घसरले असून, जागतिक मंदी आल्यास अजून घसरेल. तर नैसर्गिक वायू मागील तीन महिन्यांत ६५ टक्के घसरला आहे.

या दोन गोष्टींमुळे युरोप आणि पाश्‍चिमात्य देशांची ऊर्जा खर्चात मोठी बचत होऊन तेथील अर्थव्यवस्था लवकर रुळावर येऊ शकेल. तसे झाल्यास सोन्याचे आकर्षण थोडे तरी कमी होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com