Urad : उडदाचा हंगाम साधणार का?

भारत जागतिक पातळीवर उडीद उत्पादन आणि वापरात आघाडीवर आहे. देशात उडदाचा वापर वाढत आहे. मात्र मागील काही वर्षांपासून उडदाचे उत्पादन कमी झालेले दिसते. त्यामुळे भारताला आयात करावी लागते. यंदा तर उडदाची लागवड गेल्या वर्षीपेक्षा साडेपाच टक्क्यांनी कमी झाली. त्यातच पावसाचा पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे यंदा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. मग या परिस्थितीत उडदाचा हंगाम कसा राहू शकतो? याचा आजच्या उकलमधून घेतलेला आढावा
Urad
UradAgrowon

उडीद उत्पादनात (Urad Production) भारत जगात आघाडीवर आहे. जगाच्या एकूण उडीद उत्पादनापैकी तब्बल ७० टक्के उत्पादन भारतात होते. त्यानंतर म्यानमार आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो. मात्र उडीद उत्पादनात जगात आघाडीवर असूनही भारताला उडीद आयात (Urad Import) करावी लागते. कारण जगातील एकूण उडीद उत्पादनापैकी (Global Urad Production) जवळपास ८० टक्के वापर हा भारतात होतो. भारतानंतर चीन आणि पाकिस्तानमध्येही उडीद आहारात वापरला जातो. मात्र देशात गरजेपेक्षा उत्पादन कमी असतं. त्यामुळं भारताला आयातही करावी लागते. भारतात प्रामुख्याने म्यानमारमधून उडदाची आयात होते.

Urad
खरिपात शेतकऱ्यांकडून तूर, उडीद लागवडीस पसंती

देशातील कडधान्ये उत्पादन

देशात रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामांमध्ये कडधान्ये उत्पादन होते. उन्हाळी हंगामातही काही प्रमाणात कडधान्य पिकांची लागवड होते. मात्र कडधान्यांचा मुख्य हंगाम हा रब्बीच आहे. रब्बीत उत्पादन घटलं की देशातील एकूण उत्पादनावर लगेच परिणाम होतो. तर रब्बीतील उत्पादन वाढले की देशाचे कडधान्ये उत्पादन वाढलेले दिसते. खरिपात तूर, मूग आणि उडीद ही महत्त्वाची कडधान्य पिके आहेत. तर रब्बीत हरभरा आणि मसूर या पिकांचे उत्पादन घेतले जाते. देशात पावसाचं प्रमाण कमी-जास्त झाल्यावर खरिपातील कडधान्य उत्पादनात चढ-उतार होतात. २०१६-१६ मध्ये खरिपातील कडधान्य उत्पादन ५५ लाख ३० हजार टन झालं होतं. या वर्षी दुष्काळ असल्यानं उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यानंतरच्या वर्षात मात्र विक्रमी ९५ लाख ८० हजार टनांपर्यंत उत्पादन पोहोचलं. मात्र त्यानंतर उत्पादनात घट होत गेली. मागील हंगामात ८२ लाख ५० हजार टन उत्पादनाचा अंदाज सरकारने व्यक्त केला. रब्बी उत्पादनाचा विचार करता २०१५-१६ मध्ये १०७.९ लाख टन उत्पादन झाले होते. त्यानंतर उत्पादनात चढ-उतार होत आहेत. मागील हंगामात विक्रमी १९३.१ लाख टनांवर उत्पादन पोहोचले होते.

देशातील कडधान्ये उत्पादन (लाख टनांत)

वर्ष…खरीप…रब्बी

२०१५-१६…५५.३…१०७.९

२०१६-१७…९५.८…१३५.५

२०१७-१८…९३.१…१६१.१

२०१८-१९…८०.९…१३९.८

२०१९-२०…७९.२…१५१

२०२०-२१…८६.२…१६८.४

२०२१-२२…८३.७…१९३.१

देशातील कडधान्ये आयात

कडधान्ये वापरात भारत जगात आघाडीवर आहे. भारतात कडधान्यांमध्ये हरभऱ्याचा वापर सर्वाधिक होतो. तर तूर, मसूर, मूग, उडीद आदी कडधान्येही देशात वापरली जातात. भारतात मागील काही वर्षांत लोकसंख्या वाढीबरोबर कडधान्यांचीही मागणी वाढली. मात्र मागणीच्या तुलनेत उत्पादन वाढले नाही. त्यामुळे भारताला कडधान्ये आयात करावी लागते. यात मसूर, तूर, मूग, उडीद, हरभरा या कडधान्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

देशातील कडधान्ये आयात (लाख टनांत)

२०१६-१७…६६

२०१७-१८…५६

२०१८-१९…२५.२८

२०१९-२०…२९.१७

२०२०-२१…२४.६६

२०२१-२२…२९

Urad
तूर, उडीद आणखी भाव खाणार का?

देशातील उडीद उत्पादन

देशात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये उडदाचे उत्पादन होते. खरिपात मध्य भारत आणि उत्तर भारतात प्रामुख्यानं उडीद उत्पादन होते. यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान ही खरिपातील मुख्य राज्ये आहेत. तर रब्बीत प्रामुख्याने दक्षिणेतील राज्यांमध्ये उडीद उत्पादन होते. यात तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश होतो. मात्र रब्बीतील उडीद उत्पादन कमी आहे. म्हणजेच उडदाचा मुख्य हंगाम हा खरीप मानला जातो.

देशातील उडदाची लागवड (लाख हेक्टर)

वर्ष…पेरणी

२०१६-१७…३७

२०१७-१८…३२

२०१८-१९…२८

२०१९-२०…३३

२०२०-२१…२८

२०२१-२२…२८

राज्यनिहाय उडदाची पेरणी

मध्य प्रदेशात देशातील एकूण उत्पादनापैकी तब्बल ४० टक्के उत्पादन होते. तर उत्तर प्रदेशचा वाटा १८ टक्क्यांपर्यंत आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही काही प्रमाणात उडदाची लागवड होते. तर रब्बीत तमिळनाडूमध्ये सर्वाधिक उडदाचा पेरा होतो. त्यानंतर आंध्र प्रदेश आणि ओडिशाचा नंबर लागतो.

राज्यनिहाय उडीद लागवड (लाख हेक्टर)

राज्य/वर्ष…२०२२…२०२१…२०२०

मध्य प्रदेश१३.७४…१२.८३…१४.७९

उत्तर प्रदेश…४.४५…३.४६…६.३१

महाराष्ट्र…३.३९…३.९९…३.६१

राजस्थान…३.१०…३.०६…३.१८

गुजरात…०.६१…१.२३…०.६८

देशातील उडदाचे उत्पादन

देशात मागील काही वर्षांपासून उडीद उत्पादन ३० लाख टनांपेक्षा कमीच दिसते. २०१६-१७ मध्ये उडदाचे २८.३ लाख टन उत्पादन झाले होते. तर २०१७-१८ मध्ये विक्रमी ३४.९ लाख टन उत्पादन हाती आले. मात्र त्यानंतर उत्पादनात सतत घट होत गेली. काढणीच्या काळात पावसाने होणारे नुकसान आणि कीड-रोगामुळे पिकाचे नुकसान होते. त्यामुळे उत्पादनाला फटका बसत आहे. तसेच उत्पादनात घट होत असल्याने मागील काही वर्षांपासून उडदाची लागवड कमी झालेली दिसते. त्यामुळे उत्पादनही कमी-जास्त झाले आहे.

देशातील उडदाचे उत्पादन (लाख टनांत)

वर्ष…खरीप…रब्बी…एकूण

२०१६-१७…२१.८..६.६…२८.३

२०१७-१८…२७.५…७.४…३४.९

२०१८-१९…२३.६…७…३०.६

२०१९-२०…१३.३…७.५…२०.८

२०२०-२१…१५.१…७.२…२२.३

२०२१-२२…१९.४…९…२८.४

राज्यनिहाय उडीद उत्पादन

देशात मध्य प्रदेश उडीद लागवडीत आघाडीवर आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात उत्पादनही जास्त होते. मागील वर्षी देशातील एकूण उडीद उत्पादनापैकी तब्बल ४३ टक्के उडीद उत्पादन मध्य प्रदेशात झाले होते. त्यानंतर उत्पादनात राजस्थानचा क्रमांक लागतो. राजस्थानने देशातील एकूण उत्पादनापैकी १७ टक्के उडदाचे उत्पादन घेतले होते. तर उत्तर प्रदेशाचा वाटा १२ टक्के होता. तर महाराष्ट्राने ७ टक्के उडीद उत्पादन घेतले.

राज्यनिहाय उडीद उत्पादन (टक्क्यांत)

राज्य…उत्पादनातील हिस्सा

मध्य प्रदेश…४३

राजस्थान…१७

उत्तर प्रदेश…१२

महाराष्ट्र…७

गुजरात…३

इतर…१८

हमीभावातील वाढ

देशात उडदाचा वापर वाढत आहे. उडदापासून ताजे पदार्थ आणि प्रक्रियायुक्त पदार्थांना मागणी वाढत आहे. मात्र देशातील उडीद उत्पादन मागील काही वर्षांत एका टप्प्याच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे देशाची उडदाची आयात वाढलेली दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उडदाचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे यासाठी सरकारने मागील चार वर्षांत उडदाच्या हमीभावात प्रत्येक वर्षी ३०० रुपये वाढ केलेली दिसते.

उडदाचा हमीभाव (रुपये प्रतिक्विंटल)

२०१६-१७…५०००

२०१७-१८…५४००

२०१८-१९…५६००

२०१९-२०…५७००

२०२०-२१…६०००

२०२१-२२…६३००

२०२२-२३…६६००

उडदाची आयात

देशात दरवर्षी उडदाचा ३३ लाख टनांच्या दरम्यान वापर होतो, असे उद्योगातील सूत्रांनी सांगितले. मात्र देशातील उत्पादन मागील काही वर्षांमध्ये ३० लाख टनांपेक्षाही कमी होत आहे. त्यामुळे भारताला आयात करून गरज पूर्ण करावी लागते. भारताला प्रामुख्याने म्यानमारमधून उडीद मिळतो. भारताने २०१९-२० मध्ये ३ लाख १२ हजार टन उडीद आयात केला होता. मात्र २०२१-२२ मध्ये विक्रमी ६.११ लाख टन आयात झाली.

भारताची उडदाची आयात (लाख टनांत)

वर्ष…आयात

२०१९-२०…३.१२

२०२०-२१…३.४४

२०२१-२२…६.११

२०२२.२३*...१.००

(*२०२२-२३ ची आयात एप्रिल ते जुलै २०२२ या काळातील आहे)

म्यानमार मुख्य निर्यातदार

भारताला उडीद आणि तुरीची सर्वाधिक निर्यात म्यानमार करतो. कडधान्य निर्यातीत कॅनडा आणि ऑस्ट्रेलियानंतर म्यानमार तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण जागतिक कडधान्य निर्यातीत म्यानमारचा वाटा ८ टक्के आहे. म्यानमारमध्ये दरवर्षी ४० ते ४२ लाख हेक्टरवर कडधान्याचा पेरा असतो. त्यापैकी जवळपास १० ते ११ लाख हेक्टर क्षेत्र उडदाखाली असते. तर म्यानमारमध्ये उडदाचे उत्पादन १४ ते १५ लाख टनांच्या दरम्यान असते. म्यानमारच्या उडदाचा सर्वांत मोठा ग्राहक हा भारत आहे. तर त्यानंतर पाकिस्तान, यूएई, बांगलादेश, थायलॅंड, सिंगापूर आणि व्हिएतनाम या देशांना म्यानमार उडीद निर्यात करतो.

यंदाची स्थिती काय?

देशात १९ ऑगस्टपर्यंत एकूण कडधान्याचा पेरा जवळपास साडेपाच टक्क्यांनी घटला. तर उडदाचेही क्षेत्र घटलेले दिसते. यंदा जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस अनेक भागांमध्ये झाला नाही. जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने पेरण्या सुरू झाल्या. मात्र तरीही उत्तरेतील काही राज्यांमध्ये काही भागांत पाऊस कमी होता. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. यंदा खरीप लागवडीच्या सुरुवातीपासूनच उडदाचा पेरा पिछाडीवर होता. सध्या मागील वर्षीपेक्षा ५.१० टक्क्यांनी उडदाची पेरणी कमी झाली. मागील वर्षी १९ ऑगस्टपर्यंत ३७ लाख १० हजार हेक्टरवर पेरा झाला होता. मात्र यंदा केवळ ३५ लाख १० हजार हेक्टरवर लागवड पोहोचली. केवळ लागवड कमी झाली यावरच उडदावरचं संकट दूर झालं नाही. तर मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने फटका बसला. तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर व्यापारी, मिल्स आणि उद्योगही यंदा उत्पादनात घट होण्याचा अंदाज गृहीत धरूनच व्यवहार करत असल्याचे जाणकारांनी सांगितले. उत्पादनात घट झाली तरी भारताला उडदासाठी जास्त पर्याय नाहीत. भारताला म्यानमार हाच प्रमुख उडीद पुरवठादार देश आहे. बर्मामधूनही आयात होते. मात्र त्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे यंदा उत्पादनात जास्त घट झाल्यास दराला आधार मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com