
जळगाव ः चीनमधील कोविडचा उद्रेक कापूस बाजारावर (Cotton Market) परिणामकारक ठरला. परंतु चीनचा बाजार (China Cotton Market) ८ जानेवारीनंतर खुला होत आहे. तसेच देशातील बाजारात सरकीच्या दरात क्विंटलमागे ४०० रुपयांची सुधारणा झाली असून, परिणामी कापूस दरातही (Cotton Rate) वाढ दिसत आहे.
कापूसदर साडेसात ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यात मागील तीन ते चार दिवसांत हळूहळू सुधारणा झाली असून, खेडा खरेदीत (थेट खरेदी) कापसाला आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर खानदेश व पश्चिम विदर्भात आहेत.
सरकीच्या दरात मोठी घट मध्यंतरी झाली होती. परंतु कापूस आवक कमी असल्याने सरकीचे उत्पादन कमी झाले. सरकीच्या दरात मागील पाच ते सात दिवसांत क्विंटलमागे ४०० रुपयांची वाढ झाली असून, कापूसदराला याचा आधार मिळाला आहे.
कापूस आवक कमी
देशात मागील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रतिदिन सव्वादोन लाख गाठींची आवक झाली होती. परंतु यंदा जानेवारीच्या सुरुवातीला रोज एक लाख १० हजार गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक दिसत आहे. राज्यात सध्या प्रतिदिन सरासरी २२ ते २३ हजार गाठींची आवक होत आहे. आवक निम्म्याने कमी दिसत आहे. यामुळे कापूस दरातही सुधारणा झाली आहे.
चीनचे कोविड धोरण बदलल्यानेही सकारात्मकता
चीनने जानेवारी २०२० पासून झिरो कोविड धोरण राबविले. यात उद्योग, बाजार, व्यापार मर्यादित स्वरूपात काम करीत होता. तेथे लॉकडाउन कायम होते. यातच तेथील नागरिकांमध्ये झिरो कोविड धोरणाबाबत उद्रेक झाला. यामुळे ऑक्टोबरमध्ये तेथे लॉकडाउन दूर करण्यात आले. पण यामुळे कोविडचा तेथे उद्रेक झाला.
यामुळे जगभरातील कापूस उद्योगासह इतर व्यावसायिकांत संभ्रम, तणाव होता. परंतु चीनने झिरो कोविड धोरण दूर ठेवले आहे. तेथे बाजार, उद्योग, व्यापार १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची घोषणा झाली आहे. तसेच तेथील आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवेवरील निर्बंधही दूर झाले आहेत. आगामी काळात चीन जगातून १०० लाख गाठींची आयात करील, असेही संकेत आहेत. यामुळे कापूस बाजारातील दबाव अलीकडे काहीसा दूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कापूस दरात किंचित सुधारणा झाली आहे. परंतु ही सुधारणा कायम राहील, याची हमी सध्या देता येणार नाही. बाजारात कापूस आवक कमी असल्याने सरकी दरात वाढ झाली आहे. याचा आधार कापूस दरांना मिळाला आहे.
- अरविंद जैन, संचालक, खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.