महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला दरवाढीची ‘फोडणी’ यंदा १३० ते १४५ दरम्यान किलोला दर

‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्यांची दरवाढ यंदा १३० ते १४५ रुपये प्रतिकिलो दर
महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला दरवाढीची ‘फोडणी’ यंदा १३० ते १४५ दरम्यान किलोला दर
Mahbeej SoybeanAgrowon

अकोला ः यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना सर्वच बाबतींत महागाईला सामोरे जावे लागत आहे. आधीच रासायनिक खतांची भरमसाट दरवाढ, डिझेल महागल्याने मशागतीचा वाढलेला खर्च आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांचे महामंडळ म्हटल्या जाणाऱ्या ‘महाबीज’चे बियाणेही अपेक्षेपेक्षा जास्त महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी झळ सोसावी लागणार आहे. गेल्या हंगामात साधारणतः ७५ रुपयांपर्यंत विकलेले सोयाबीन बियाणे यंदा तब्बल १३० ते १४५ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.

महाबीज प्रशासनाने नुकतेच दर जाहीर केले आहेत. हे दर पाहून शेतकऱ्यांना धक्का बसावा, अशी परिस्थिती आहे. सोयाबीनचे वाढलेले भाव, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतुकीचा खर्च असे विविध प्रकारचे वाढीव खर्च पाहता यंदा सोयाबीनची दरवाढ अपरिहार्य होती, असे महाबीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगत दरवाढीचे समर्थनच केले.

आगामी हंगामासाठी नुकतेच महाबीज प्रशासनाने दर जाहीर केले आहेत. यात प्रामुख्याने सोयाबीन या वाणाचे दर बघितले असता गेल्या हंगामाच्या तुलनेत मोठी वाढ दिसून आली. मागील वेळी सोयाबीनची ३० किलोची बॅग साधारणपणे २२५० रुपयांपर्यंत मिळत होती. यंदा आता हीच बॅग तब्बल २ हजारांनी महागली आहे. आता ३० किलो वजनाची बॅग ३९०० ते ४३५० रुपयांना घ्यावी लागेल. गेल्या हंगामात काढणी दरम्यान झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे अपेक्षित कच्चे बियाणे मिळाले नाही. बियाणे मिळविण्यासाठी उन्हाळी सोयाबीन लागवडीचा प्रयोग केला गेला. अति उष्णतेमुळे या उन्हाळी हंगामातूनही अपेक्षित सोयाबीन मिळू शकलेले नाही. परिणामी मागणीच्या तुलनेत महाबीजचा सोयाबीन बियाणे पुरवठा कमीच राहणार, हे निश्‍चित झाले आहे. शिवाय बाहेरून बियाणे खरेदी न करण्याबाबत शासनाने महाबीजला आधीच सुचवलेले असल्याने उपलब्ध बियाण्यावरच हंगाम साधण्याची कसरत करावी लागणार, हे स्पष्ट आहे.

...यामुळे वाढले दर

महाबीज हे भागधारकांकडून बीजोत्पादन करून घेते. डिसेंबर-जानेवारीमध्ये बाजार समित्यांत सोयाबीनला जे दर मिळतात, त्यावर काही टक्के बोनस देऊन कच्चे बियाणे विकत घेतले जाते. या बियाण्यांवर प्रक्रिया, त्याची पॅकिंग, विक्रेत्यापर्यंत वाहतूक, विक्रेत्याचा मोबदला व इतर खर्च गृहीत धरून बियाण्याचा भाव निश्‍चित होत असतो. यंदा डिसेंबर-जानेवारीत सोयाबीन महागले होते. त्यामुळे भागधारकांना त्या कालावधीचा दर दिला जाणार आहे. तसेही सोयाबीन काही महिन्यांपासून महाग विकत आहे. याचा परिणाम आता बियाण्याच्या दरावर झाला आहे.

इतर कंपन्यांही दरवाढ करण्याची शक्यता ः

हंगामात बहुतांश कंपन्यांचे दर महाबीज बियाण्याच्या दरांवर ठरवले जातात. महाबीजनेच यंदा दर वाढविल्याने आता खासगी कंपन्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. बाजारात सोयाबीन बियाणे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. पाऊस वेळेपूर्वीच दाखल झाला, तर बियाणे खरेदीसाठी गर्दीसुद्धा वाढू शकते. महाबीजच्या वाढीव दरांचा फायदा आता कंपन्यासुद्धा घेऊ शकतात. राज्यात सोयाबीनचे यंदा सुमारे ४६ लाख हेक्टर लागवड क्षेत्र अपेक्षित आहे. त्यासाठी १७ लाख ९५ हजार क्विंटल बियाणे आवश्‍यक आहे. महाबीजकडे किती बियाणे राहील, याची अद्यापही निश्‍चित माहिती मिळत नाही. उन्हाळी हंगामातून येणाऱ्या बियाण्यावर हे ठरणार आहे.

...असे आहेत दर

१० वर्षांच्या आतील वाण ः फुले किमया, एएमएस-१००१, फुले संगम, एमएयुएस ६१२, एमएसीएस १२८१ ११८८, ईव्हीएस २१ या वाणांसाठी किलोला १४५ रुपये दर काढण्यात आला.

...

१० ते १५ वर्षांच्या आतील वाण ः एमएयूएस १५८ हा वाण १४५ रुपये किलो.

.....

१५ वर्षांवरील वाण ः डीएस २२८ (फुले कल्याणी), जेएस ९३०५, एमएयुएस ७१ या वाणांचा दर १४५ रुपये किलो,

तर जेएस ३३५ हा वाण १३० रुपये किलोने घ्यावा लागेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com