
Maize Market Update खानदेशात मक्याची आवक (Maize Arrival) दर आठवड्यात वाढत आहे. त्यामुळे कमाल दर कमी झाले असून कमाल दर १९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. थेट खरेदीत किमान १६०० ते कमाल १९२५ रुपये प्रतिक्विंटल आहेत.
बाजार समित्यांतही दर्जानुसार १९५०, १९००, १७८०, १७०० व १५७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. मागील सात ते आठ दिवस सरासरी दर (Maize Rate) १८०० रुपये राहिला आहे.
मक्याची मळणी ७० टक्के क्षेत्रात पूर्ण झाली आहे. सध्या जानेवारीत लागवड केलेल्या मक्याची कापणी, मळणी सुरू आहे. ही मळणी आणखी १० ते १२ दिवस सुरू राहील. परंतु कमाल क्षेत्रातील मक्याची मळणी पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन आले आहे.
यंदा सुमारे ४५ हजार हेक्टरवर मक्याची लागवड खानदेशात झाली होती. सर्वाधिक सुमारे ३१ हजार हेक्टरवर जळगाव जिल्ह्यात लागवड झाली होती.
तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे साडेचौदा हजार हेक्टरवर मका पीक होते. खानदेशात यंदा सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्टरने मक्याचे क्षेत्र वाढले होते. लागवड ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अधिक झाली. जानेवारीतील लागवड कमी होती.
सध्या ऑक्टोबर व नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीला लागवड केलेल्या मका पिकात कापणी व मळणी जवळपास पूर्ण झाली आहे. यंदा उत्पादन एकरी २२ ते २५ क्विंटल येत आहे.
मक्याची थेट खरेदीदेखील अनेक खरेदीदार करीत आहेत. तसेच जळगाव, चोपडा अमळनेर येथील बाजारात आवकही होत आहे. धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील बाजारात आवक अधिक आहे. तर नंदुरबारात नंदुरबार बाजार समितीत आवक बऱ्यापैकी आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मिळून सध्या रोज पाच हजार क्विंटल आवक होत आहे. धुळ्यात ही आवक प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल आहे. जळगावात सर्वाधिक आवक अमळनेर व चोपडा येथे होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.