Maize Export : देशातून मका निर्यात वाढली

आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला चांगली मागणी आहे. दरही तेजीत आहेत. त्यामुळे भारतातून मका निर्यात वाढली. सध्या देशातील बाजारात मक्याचे दर हमीभावापेक्षा जास्त आहेत.
Maize
MaizeAgrowon

Maize Export News पुणे ः आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला (Maize Market) चांगली मागणी आहे. दरही तेजीत आहेत. त्यामुळे भारतातून मका निर्यात (Maize Export) वाढली. सध्या देशातील बाजारात मक्याचे दर (Maize Rate) हमीभावापेक्षा जास्त आहेत. पुढील दीड महिन्यात रब्बीतील मका बाजारात येईल; मात्र निर्यातीसाठी मागणी असल्याने मक्याचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

यंदा जागतिक मका उत्पादन ५ टक्क्यांनी कमी राहील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात ‘यूएसडीए’ने व्यक्त केला.

जागतिक पातळीवरील मका उत्पादन ११ हजार ५१३ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. गेल्या हंगामातील उत्पादन १२ हजार १६० लाख टन होते. त्यातच रशिया आणि युक्रेन युद्धामुळे मका पुरवठा साखळी विस्कळीत झाली.

यंदा अमेरिका, अर्जेंटिना, रशिया आणि युक्रेन या महत्त्वाच्या देशांमधील मका उत्पादन घटले. अमेरिकेतील उत्पादन यंदा ४११ लाख टनाने कमी झाले.

तर अर्जेंटिनात २५ लाख टन, रशियात १२ लाख टन आणि युक्रेनमधील मका उत्पादन १५१ लाख टनांनी घटल्याचे ‘यूएसडीए’ने म्हटले आहे.

Maize
Maize Arrival : खानदेशात मक्याची आवक सुरू

जगातील या महत्त्वाच्या देशांमधील मका उत्पादन घटले. त्यातच पुरवठा साखळीतील अडचणी, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि वाढलेल्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे दर तेजीत आहेत.

तसेच रशिया आणि युक्रेन युद्ध, अमेरिकेतील उशिरा झालेली लागवड आणि दक्षिण अमेरिकेतील कमी पाऊस यामुळे मका दराला आणखी आधार मिळाला. मागील हंगामात भारताने जवळपास ३७ लाख टन मका निर्यात केली होती.

तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये जवळपास २० लाख टन निर्यात झाली; मात्र नोव्हेंबरनंतर मका निर्यातीचा वेग जास्त होता, असे निर्यातदारांनी सांगितले.

दर २३०० ते २५०० रुपये

मक्याला निर्यातीसाठी मागणी वाढल्याने दरातही महिनाभरात वाढ झाली. सध्या बाजार समित्यांमध्ये मक्याला प्रति क्विंटल २ हजार ते २ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

तर निर्यातीसाठी मक्याचे दर २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या भारताला अग्नेय आशिया आणि पूर्व आशियातील देशांना निर्यातीसाठी वाहतूक खर्च कमी लागत आहे. त्यामुळे या देशांना मका निर्यात वाढली.

Maize
Maize Market : मका निर्यात वाढली; दर वाढतील का?

दर टिकून राहणार

भारताचा मका आंतरराष्ट्रीय बाजारात ३१० डॉलर प्रतिटन पडतो. यापूर्वी हा भाव २९० डॉलर होता. पण वाहतूक खर्च कमी झाल्याने व्हीएतनाम, मलेशिया आणि ओमान देशांमध्ये निर्यात वाढली.

आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला मागणी असल्याने दरही तेजीत आहेत. तसेच देशातील मका उत्पादन अंदाजापेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. सोयापेंड आणि इतर पेंडेचे दर सध्या काहीसे अधिक आहेत.

त्यामुळे मक्याला चांगला उठाव मिळेल. या स्थितीत रब्बीतील मक्याची आवक वाढली तरी सध्याच्या भावात जास्त नरमाई दिसणार नाही, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केला.

रब्बीतील मका पिकाची स्थिती चांगली आहे; मात्र निर्यातही वाढत आहे. सध्या निर्यातीसाठी चांगली मागणी असल्याने मक्याचे भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत. बाजारात मक्याची आवक वाढली तरी सध्याच्या दरावरून १०० रुपयांपेक्षा जास्त नरमाई दिसणार नाही.

- शांतिलाल बाफना, शेतीमाल बाजार अभ्यासक, मध्य प्रदेश

आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्याने यंदा मका निर्यात २० ते २५ टक्क्यांनी वाढू शकते. पुढील एक ते दीड महिन्यात बाजारात रब्बीतील मक्याची आवक सुरू होईल. या काळात मक्याचे सध्याचे दर काही दिवस दबावात येऊ शकतात. पण दबाव जास्त दिवस राहणार नाही.

- अभिजित नाईक, मका प्रक्रियादार, सांगली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com