
Maize Market Update जळगाव ः खानदेशात आगाप हंगामातील मक्याची आवक (Maize Arrival) सुरू झाली आहे. आवक कमी किंवा रखडत सुरू असून, कमाल दर (Maize Rate) २२५० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. सध्या अमळनेर (जि. जळगाव) येथील बाजार समितीत आवक बरी दिसत आहे.
मक्यासाठी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, चोपडा, अमळनेर या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत.
धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), साक्री, नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा या बाजार समित्यांतही मक्याची बऱ्यापैकी आवक होते. आगाप लागवडीतील किंवा ऑक्टोबरमध्ये लागवड केलेल्या मका पिकात मळणी झाली आहे.
काही शेतकरी या आठवड्यात मळणी करतील. सुरुवातीला दर बऱ्यापैकी असल्याचे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी बाजारात मक्याची पाठवणूक केली असून, कमाल दर २२५० व किमान २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.
मध्य प्रदेशातील बडवानी, बऱ्हाणपूर येथील बाजारात कमाल दर २३१० रुपयांपर्यंत मिळाला आहे. या तुलनेत जळगाव व धुळ्यातील बाजारांत दर कमी आहेत.
यामुळे नंदुरबार व रावेर, मुक्ताईनगरातील काही शेतकरी मका विक्रीसाठी मध्य प्रदेशातील बाजारांना पसंती देत आहेत. मध्य प्रदेशातील काही खरेदीदार थेट खरेदी किंवा शिवार खरेदी करून घेत आहेत.
यात वाहतूक, हमाली, प्रतवारी आदींचा खर्च वाचत असल्याने शेतकरी थेट किंवा जागेवरदेखील विक्री करीत आहेत. यात क्विंटलमागे ५० रुपये कमी दर दिला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, रावेर, जळगाव व चोपडा या बाजारांत मिळून सध्या किंवा मागील चार ते पाच दिवसांपासून प्रतिदिन सरासरी मिळून एक हजार क्विंटल मक्याची आवक झाली आहे. पुढे ही आवक वाढणार आहे.
परंतु यंदा शिवार खरेदी अधिक होत असल्याने बाजार समितीमधील मक्याचे व्यवहार कमी दिसत आहेत. मक्याला उठाव असल्याने दर हमीभावापेक्षा सध्या अधिक आहेत. खानदेशात मक्याची सुमारे ४० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील लागवड सुमारे ३२ हजार हेक्टर एवढी आहे. ही लागवड अपेक्षेपेक्षा कमी आहे. आवक एप्रिलमध्ये अधिक राहील, असेही संकेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.