खाद्यतेलाच्या किमतीत दहा रूपयांची घट

खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्क कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर बाजारात त्याची प्रतिक्रिया उमटली आहे.
खाद्यतेलाच्या किमतीत दहा रूपयांची घट
Edible Oil Agrowon

खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्क (Edible Oil Import Duty) कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर बाजारात त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. अदानी विल्मर कंपनीने (Adani Wilmar) सरकारच्या निर्णयाला प्रतिसाद देत आपल्या खाद्यतेलाच्या (Edible Oil Price) किंमती १० रूपयांनी कमी केल्या आहेत. याआधी मदर डेअरीनेही (Mother Dairy)आपल्या खाद्यतेलाच्या किमती कमी केल्या होत्या.

मदर डेअरी ही दिल्लीतील प्रमुख दुध पुरवठादार संस्था आहे. ती दुधाबरोबरच धारा या ब्रॅंडनेमने खाद्यतेलाची विक्री करते. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर कमी झाल्यामुळे मदर डेअरीने, तेलाच्या किमती प्रति लीटर 15 रुपयांनी कमी केल्या. त्यानंतर लगेचच अदानी विल्मरच्या फॉर्च्यून रिफाइंड सनफ्लॉवर या खाद्यतेलाच्या एक लिटर पॅकची किंमत २२० वरून २१० रूपये करण्यात आली. अदानी विल्मरने फॉर्च्युन सोयाबीन आणि फॉर्च्युन कच्ची घाणी (मोहरी तेल) एक लिटर पॅकेटची किमत २०५ रूपयांवरून १९५ रूपये केली आहे.

खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांकडून तेलाची मागणी वाढेल, असा कंपनीचा कयास आहे. केंद्र सरकारच्या खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी करण्याच्या निर्णयानंतर तेलाच्या किमतींत घट झाली आहे. साहजिकच या घसरणीचा फायदा सामान्यांना होणार असून तेलाचे नवे दर लोकांच्या खिशाला परवडणारे असतील असं कंपनीने म्हटलं आहे.

अदानी विल्मर एक फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) कंपनी आहे. अदानी विल्मर खाद्यतेलांव्यतिरिक्त तांदूळ, आटा, साखर, बेसन, तयार खिचडी, सोया चंक्स आणि इतर वस्तुंची विक्री करते.

खाद्यतेलांच्या किंमती कशा वाढल्या ?

तर तेलबियांच कमी उत्पादन आणि खाद्यतेलचं अधिक उत्पादन आणि वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे २०२१-२२ मध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारने आयात वाढण्यासाठी घेतलेले निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेलाची उपलब्धता वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत सध्या कपात झाली आहे.

भारत तेलबिया उत्पादनात स्वयंपूर्ण नाही. त्यामुळे देशाची खाद्यतेलाची गरज भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. देशाच्या गरजेच्या ६० ते ६५ टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. यंदा रशिया-युक्रेन युध्दामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात अभुतपूर्व तेजी आली. त्याआधीही जागतिक पातळीवर मागणी-पुरवठ्याचे संतुलन बिघडल्यामुळे खाद्यतेलाचे दर चढेच होते. युध्दामुळे त्याचा भडका आणखी वाढला. या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या दरात झालेली कपात महत्त्वाची मानली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com