खरबूज, कलिंगडाची वाढली आवक अन् उलाढालही मोठी

सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्या आहेत. रमजान महिन्याचा काळही सुरू आहे. अशावेळी पाणीदार, रसाळ, गोड खरबूज व कलिंगड फळांची मागणी व आवक देखील वाढली आहे. या काळात फळांचे ‘मार्केट’ साधण्यासाठी शेतकरी लागवडीचे नियोजन देखील करीत असतात. पुणे बाजार समितीत दोन्ही फळांची आवक व उलाढालही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यादृष्टीने बाजारपेठेचा घेतलेला आढावा.
Watermelon
Watermelon Agrowon

उन्हाळा म्हटले की विविध पाणीदार फळांचा हंगाम जोरदार सुरू असतो. उन्हाच्या तीव्र झळा सोसणारे नागरिक फळांच्या फोडी, ज्यूस आदींच्या आधारे स्वतःला ताजेतवाने ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. सध्या कलिंगड (Watermelon) आणि खरबुजाचा हंगाम देखील तेजीत असून द्राक्षाचा (Grape Season) हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. रमजान सण जवळ आला आहे. रोजेही सुरू आहेत. त्यामुळे कलिंगड, खरबुजाची मागणी मोठी आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे गुलटेकडी येथील बाजार समितीतही फळांची आवक (Fruit Arrival Pune APMC) मोठ्या प्रमाणात झाली

आहे. येथील फळांचे प्रमुख अडतदार नितीन कुंजीर म्हणाले, की खरबुजाचा हंगाम साधारण जानेवारी महिन्यात सुरू होतो. तो जूनपर्यंत चालतो. जानेवारीत तुरळक आवक असते. या काळात थंडी असल्याने मागणी देखील कमी असते. उन्हाळ्याची चाहूल लागली आणि वातावरणातील तापमान वाढू लागल्यानंतर मग मात्र मागणी आणि आवकही वाढू लागते. या दरम्यान खरबुजाचे प्रति किलो सरासरी दर १५ ते २० रुपये असतात. उन्हाळ्यात ते २० ते २५ रुपयांदरम्यान असतात.

हंगामाच्या पहिल्या टप्प्यात खरबुजाची १० ते १२ टन सरासरी आवक असते. एप्रिल, मे महिन्यात ती ३० ते ३५ टनांवर पोहोचते. खरबुजाचे विविध वाण आता विविध कंपन्यांनी विकसित केले आहेत. यातील तुलनेने अधिक गोड, चविष्ट वाणाला अन्य वाणांपेक्षा किलोला तीन ते चार रुपये अधिक दर मिळतो. खरबुजाची आवक प्रामुख्याने इंदापूर, दौंड, फलटण, नगर, कर्जत, श्रीगोंदा, तुळजापूर, सोलापूर, उस्मानाबाद आदी भागांतून होते. पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यांतील विविध तालुक्यांमधील किरकोळ आणि ठोक फळविक्रेते, स्टॉलधारक, फिरते विक्रेते यांच्याकडून खरेदी होते.

थायलंडच्या वाणांची भुरळ

पुणे बाजार समितीमध्ये थायलंड येथील खरबुजाच्या दोन वाणांचीही तुरळक आयात होत आहे. हे फळ दिसण्यास आकर्षक, चवीला गोड आणि पॅकिंगसह असल्याने काही ग्राहकांकडून त्यास निश्‍चित मागणी असल्याचे प्रमुख विक्रेते प्रीतम परदेशी यांनी सांगितले. या वाणाची दिवसाला एक ते दीड टनापर्यंत आवक होते. त्यास १०० ते १२० रुपये प्रति किलो दर मिळतो. अर्थात, एकूण विक्री नगण्य स्वरूपात आहे. या वाणाची सध्या बीड आणि औरंगाबाद येथे शेडनेटमध्ये तुरळक प्रमाणात लागवड होत असून, बाजारपेठेत त्यांची आवक होत आहे.

कलिंगडाचा हंगाम

पूर्वी कलिंगड ठरावीक काळातच बाजारात दिसायचे. आता जवळपास वर्षभर त्याची उपलब्धता होऊ लागली आहे. तरीही मार्च ते मे हाच कालावधी मुख्य हंगामाचा असतो असे व्यापारी कल्याण वधडे यांनी सांगितले. या हंगामात पुणे बाजार समितीत नगर, सातारा, सोलापूर, टेंभुर्णी, इंदापूर, लातूर, उस्मानाबाद या भागांमधून दररोज साधारण ७० ते ८० टन आवक होते. हीच आवक बिगरहंगामात सुमारे १० ते १५ टन असते. हंगामात प्रति किलोला ३० ते ३५ रुपये, तर बिगर हंगामात हा दर ८ ते १० रुपये मिळतो. रमजान महिन्यात मागणीमध्ये ४० टक्क्यांनी वाढ होऊन दर देखील २० टक्‍क्यांपर्यंत वाढलेले असतात.

थायलंडमधील खरबूज वाणांबाबत आपला अनुभवाबाबत सांगताना शेतकरी राधेश्‍याम घुमक (निरगाव, ता. देवराई, जि. बीड) म्हणाले, की अर्धा एकर क्षेत्रावर शेडनेटमध्ये यंदा दोन वाणांची लागवड केली होती. नुकताच प्लॉट संपला असून, दोन्ही वाणांपासून प्रत्येकी सहा ते साडेसहा टन उत्पादन मिळाले. पुणे बाजार समितीमध्ये प्रति किलोला ५५ रुपये तर मॉल उद्योगातील आघाडीच्या कंपनीला ७० रुपये दराने विक्री केली. या वर्षीचा हा पहिलाच प्रयत्न होता.
संपर्क ः राधेश्‍याम घुमक, ९६५७१०२८९८
मी मागील नोव्हेंबरमध्ये व यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी अशी तीन टप्प्यांमध्ये कलिंगडाची सुमारे दीड ते दोन एकरांत लागवड केली. पहिल्या दोन प्लॉटमध्ये एकरी साधारण २० ते २५ टन उत्पादन मिळाले. दर सुमारे साडेदहा आणि साडे अकरा रुपये प्रति किलो मिळाले. आता शेवटच्या प्लॉटचे उत्पादन मे महिन्यात आणि रमजान सणात सुरू होईल. या काळात चांगली मागणी असल्याने दर १५ रुपये प्रति किलो मिळण्याचा अंदाज आहे.
दिलीप कदम, सातारा ९८६०५०७०१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com