हरभऱ्याची हमीभावाने खरेदी पुन्हा सुरू करण्याची प्रतीक्षा

उद्दिष्टपूर्तीमुळे खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी
हरभऱ्याची हमीभावाने खरेदी पुन्हा सुरू करण्याची प्रतीक्षा
Chana Agrowon

औरंगाबाद : दिलेल्या मुदतवाढीच्या आत मिळालेल्या खरेदीची उद्दिष्टपूर्ती झाल्याने आधारभूत किमतीने (Chana MSP) हरभरा खरेदी (Chana Procurement) थांबवली. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यातील हरभरा उत्पादक (Chana Farmer) शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य व केंद्र शासन काही पावले उचलेल का हा प्रश्न आहे.

बाजारातील हरभऱ्याचे दर शासनाने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत दरापेक्षा कमी असल्यामुळे राज्यभर आधारभूत दराने हरभरा खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आली. त्यानुसार सुरू असलेली खरेदी २३ मे रोजी खरेदीचे उद्दिष्टपूर्ती झाल्याने बंद पडली. दुसरीकडे हजारो शेतकऱ्यांचा हरभरा आधारभूत दराने खरेदी केला जावा म्हणून आवाज उठविला गेला. त्यानंतर हो नाही म्हणत पुन्हा ३० मे रोजी उद्दिष्टाची अट घालून १८ जून पर्यंत हरभरा खरेदीची मुदत देण्यात आली. परंतु खरेदीसाठी दिलेले उद्दिष्ट दोन जूनला पूर्ण झाल्याने पुन्हा एकदा मुदतीपूर्वी आधारभूत दराने हरभरा खरेदी थांबली.

माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यात २३ मे पर्यंत ९९२३ क्विंटल ५० किलो हरभरा ९६१ शेतकऱ्यांकडून खरेदी केला गेला. त्यानंतर मुदातवाढीत ३० व ३१ मे तसेच १ व २ जूनपर्यंत हरभऱ्याची खरेदी ११ हजार ८८८ क्विंटलवर पोहोचली. जालना जिल्ह्यात २३ मे पर्यंत १२५४६ शेतकऱ्यांकडून १ लाख ८७ हजार ५८५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला होता. तो २ जून पर्यंत १४ हजार ६९३ शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या २ लाख २० हजार ९२० क्विंटल हरभऱ्याच्या खरेदीपर्यंत पोहोचला जो आजवरच्या हरभरा खरेदीचा रेकॉर्ड आहे. लातूर जिल्ह्यात २६ हजार शेतकऱ्यांकडून एकूण खरेदी ३ लाख ६० हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली.२३ मेपर्यंत खरेदीचा हा आकडा ३ लाख ४२ हजार क्विंटलपर्यंत होता. म्हणजे मुदतवाढीत तीन ते चार दिवसात केवळ १८००० क्विंटल हरभऱ्याची खरेदी होऊ शकली. जालन्यातही मुदतवाढीत अल्पच हरभरा खरेदी झाला ही वस्तुस्थिती आहे.

शेतकऱ्यांकडे हरभरा शिल्लक

काही जिल्ह्यात आधीची उत्पादकता कमी असल्याने शेतकऱ्यांना आपल्याकडील हरभरा आधारभूत किमतीने विकण्याची अडचण निर्माण झाली होती. ती उत्पादकता वाढल्यानंतर आता पुन्हा खरेदीच बंद पडल्याने शेतकऱ्यांची परवड कायम आहे. अजूनही औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे हरभरा शिल्लक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com