कापूस बियाण्यांचा काळाबाजार

जळगावात विविध वाणांचा कृत्रिम तुटवडा; सरळ वाणही मिळेना
कापूस बियाण्यांचा काळाबाजार
Cotton Seed Agrowon

जळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांची टंचाई (Fertilizer Shortage) असतानाच कापूस बियाण्याचा काळाबाजार (Black Marketing Of Cotton Seed) वाढला आहे. शेतकऱ्यांना जादा किंवा अधिकचे पैसे मोजून बियाण्यांची खरेदी (Seed Purchasing) करावी लागत आहे.

काही कापूस बियाणे पुरवठादार कंपन्यांनी (Seed Supplier Company) आपले बियाणे बाजारात पुरेसे पाठविले नाही. त्याची मागणी असल्याने तुटवडा तयार झाला. कंपनीकडे बियाणे साठा आहे, पण बाजारात तुटवडा आहे. यामुळे संबंधित बियाण्यांची जादा दरात विक्री काही कृषी केंद्रचालक विनापावती करीत आहेत. जिल्ह्यात सुमारे २७ लाख कापूस बियाणे पाकिटांची गरज आहे. यात काही कंपन्यांच्या वाणांची अधिकची मागणी दरवर्षी असते. तसेच सरळ वाणांमध्येही एका कंपनीच्या वाणाची अधिक मागणी असते. परंतु या दोन्ही कंपन्यांच्या बियाण्यांचा पुरवठा विस्कळीत झाला.

कंपन्यांनी नफेखोरीसाठी हेतुपुरस्सर केली आहे. कृषी विभागानेही लक्ष दिलेले नाही. यामुळे हंगाम सुरू होताच या कंपन्यांच्या वाणांचा काळाबाजार सुरू झाला. हा काळाबाजार आता वाढला आहे. कृषी विभागाने या बाबत कृषी केंद्रांवर कुठलीही कारवाई अद्याप केलेली नाही. अवैध बियाणे विक्रीबाबत तपासणी, गावोगावी पथके फिरत होती. परंतु कृषी केंद्रांवरील गैरप्रकार कृषी विभागाने थांबविला नाही. यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक झाली. एका बोलगार्ड २ प्रकारचे बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या ७५० रुपयांचे कापूस बियाणे एक पाकिट १२०० रुपयांत भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर भागांत शेतकऱ्यांना दिले जात आहे.

सरळ वाणांमध्ये एका कंपनीकडून फक्त दोन हजार पाकिटे कापूस बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. हा पुरवठा किमान २० ते २५ हजार पाकिटे अपेक्षित आहे. कारण दरवर्षी संबंधित कंपनीच्या सरळ वाणाला मोठी मागणी आहे. परंतु हा अनुभव दुर्लक्षित करून कृषी विभाग आपले नियोजन, कारभार करीत आहे.

मध्य प्रदेश, गुजरातमधील अवैध देशी, ‘बोलगार्ड ४’ किंवा ‘बोलगार्ड ५’ (एचटीबीटी) कापूस बियाणे दाखल होतच आहे. त्याचीही बिनबोभाटपणे विक्री चोपडा, मुक्ताईनगर, अमळनेर, पारोळा, जामनेर आदी भागात सुरू आहे. यात शेतकऱ्यांची मात्र मोठी फसवणूक, वित्तीय लूट सुरू असल्याचे चित्र आहे.

कृषी विभागाचा चालढकलपणा

जिल्ह्यात फक्त ‘बोलगार्ड २’ प्रकारातील कापूस बियाण्यांची मागणी आहे. ९९ टक्के शेतकरी ‘बोलगार्ड २’ किंवा बीटी कापूस लागवड करतात. देशी किंवा सरळ वाणांची लागवड करीतच नाहीत, असा दावा करून कृषी विभाग आपल्या चालढकलपणावर पांघरूण घालत असल्याची स्थिती आहे.

एका कंपनीच्या ‘बोलगार्ड २’ कापूस बियाण्यांचा पुरवठा जिल्ह्यात कमी झाला आहे. त्याची एवढी किंवा अधिक मागणी वाढेल, असे चित्र सुरवातीला नव्हते. पण कृषी केंद्रांकडून काळाबाजार केला जात असेल तर कृषी विभाग तपासणी करील. कृषी केंद्रचालकांची बैठक घेऊन तंबी दिली जाईल.
वैभव शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com