
अनिल जाधव
Pune Cotton News : देशातील बाजारात कापूस आवकेचा (Cotton Arrival) दबाव आजही कायम आहे. तर दुसरीकडे कापसाला उठाव नसल्याचे सांगत उद्योगांकडून कापसाचे भाव (Cotton Rate) दबावात ठेवले जात आहेत.
खरिपाची लागवड तोंडावर आल्याने शेतकरी कापूस विकत आहेत. याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारात सध्या कापूस दरावरील दबाव जास्त वाढला आहे. कापसाचे भाव सध्या हंगामातील निचांकी पातळीवर पोचले आहेत. कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांचा भाव मिळत आहे.
कापसाचे भाव दबावात आल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. देशातील काही भागांमध्ये खरिपातील कापूस लागवड आता सुरु झाली. जून महिन्यापासून पाऊस पडल्यानंतर सगळीकडे लागवडी सुरु होतील. त्यामुळे खरिपाच्या लागडीसाठी शेतकरी कापूस विकत आहेत.
तसेच कापसाच्या काळात कापूस साठवण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकावाच लागत आहे. याचा फायदा व्यापारी आणि उद्योग घेताना दिसत आहेत.
यंदा देशातील कापूस उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. गेल्या हंगामात ३०७ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. तर यंदा देशातील कापूस उत्पादन २९८ लाख टनांवरच स्थिरावल्याचे उद्योगांच्या वतीने सांगण्यात आले.
तर देशातील कापसाचा वापर ३१२ लाख गाठींवर राहील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला. पण असं असतानाही देशातील कापसाचे भाव सातत्याने दबावात ठेवण्यात आले.
कापसाचे भाव शेतकऱ्यांची नड लक्षात घेऊनच वाढवले जात नाहीत, असे विश्लेषक सांगत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचे वायदे ८२ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत. कापूस वायदे मागील दोन महिन्यांपासून ८० ते ८५ सेंटच्या दरम्यान फिरत आहेत.
तर जगातील प्रत्यक्ष कापूस खरेदी दराची सरासरी म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स ८२ सेंट प्रतिपाऊंडवर होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात चीनची मागणी येत असल्याचे सांगितले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सुधारण्याचा अंदाज आहे, असे जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारात सध्याही कापसाची आवक जास्त आहे. मे महिन्यात एरवी कापसाची बाजारातील आवक प्रतिक्विंटल सरासरी २५ हजार गाठींच्या दरम्यान असते.
पण सध्याची आवक ९० हजार गाठींच्या दरम्यान आहे. त्यामुळं कापूस दरावर दबाव आहे, असे जाणकारांनी सांगितले.
कापसाचे भाव सध्या ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील आवक जास्त आहे तोपर्यंत कापसाचे भाव दबावातच राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.